अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी “2+2” स्वरूपात केलेल्या चर्चेची माहिती दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.
जूनमधील पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि नवी दिल्लीत जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने उभय देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर संरक्षण, सेमीकंडक्टर्स, उदयोन्मुख तंत्रज्ञान, अंतराळ , आरोग्य, यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा त्यांनी उल्लेख केला.
सर्व क्षेत्रांतील वाढत्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि भारत आणि अमेरिका यांच्यातील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक सहकार्य हे लोकशाही, बहुतत्ववाद आणि कायद्याच्या राज्याचा आदर यावर आधारित असल्याचे नमूद केले.
त्यांनी पश्चिम आशियातील चालू घडामोडींसह परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. त्यांनी या मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका यांच्यात निरंतर दृढ समन्वयाच्या गरजेवर भर दिला.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी निरंतर विचारविनिमय करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
Glad to receive @SecBlinken and @SecDef. The “2+2” Format is a key enabler for further strengthening the India-US Comprehensive Global Strategic Partnership. Our shared belief in democracy, pluralism and the rule of law underpins our mutually beneficial cooperation in diverse… pic.twitter.com/IGku8yJJsj
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2023