पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भूतानचे महामहिम राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानच्या महाराणी जेसन पेमा वांगचुक यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी भूतानच्या राजांना शुभेच्छा दिल्या आणि मार्च 2024 मधील भेटीदरम्यान भूतानचे सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या प्रेमळ आदरातिथ्याची आठवण करून दिली.
पंतप्रधान आणि महामहिम राजे यांनी उत्कृष्ट द्विपक्षीय संबंधांबाबत समाधान व्यक्त केले, ज्यामध्ये विकास सहकार्य, स्वच्छ ऊर्जा भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूक, अंतराळ आणि तंत्रज्ञान सहकार्य आणि लोकांमधील संबंध समाविष्ट आहेत. ही आदर्श भागीदारी सर्व क्षेत्रांमध्ये आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि भूतानच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि भारताच्या लगतच्या सीमावर्ती भागांशी संबंध मजबूत करण्यासाठी महामहिम राजे यांच्या नेतृत्वाखालील गेलेफू माइंडफुलनेस सिटी उपक्रमाबाबत आपले विचार मांडले.
भूतानच्या 13व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीसाठी भूतानला भारताचे विकास सहाय्य दुप्पट केल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी भूतानमधील आर्थिक विकासाप्रति भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भूतानच्या सुख, प्रगती आणि समृद्धीच्या आकांक्षांना निरंतर पाठिंबा दिल्याबद्दल महामहिम राजे यांनी पंतप्रधान आणि भारतातील जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या बैठकीनंतर महामहिम राजे आणि महाराणी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
या बैठकीने भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्च-स्तरीय आदानप्रदानाची परंपरा अधोरेखित केली, जी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणारी परस्पर विश्वास, सहकार्य आणि सखोल ज्ञानाची भावना प्रतिबिंबित करते.