पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 20-21 नोव्हेंबर 2024 दरम्यानच्या गयाना दौऱ्यावर जॉर्जटाउन येथे पोहोचले.गेल्या 56 वर्षांत गयानाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. विशेष सन्मान म्हणून, विमानतळावर गयाना राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली आणि गयानाचे पंतप्रधान निवृत्त ब्रिगेडियर मार्क अँथनी फिलिप्स यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान देण्यात आला. गयाना सरकारच्या एक डझनहून अधिक कॅबिनेट मंत्र्यांनीही या समारंभात सहभाग घेतला.
हॉटेलवर आगमन झाल्यावर, पंतप्रधानांचे गयाना राष्ट्राध्यक्षांसह बार्बाडोसच्या पंतप्रधान महामहीम मिया अॅमॉर मोट्ले आणि ग्रेनेडाच्या पंतप्रधान महामहीम डिकॉन मिशेल यांनी स्वागत केले. याशिवाय, गयाना कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय समुदाय आणि इंडो-गयानी वंशाच्या लोकांनी पंतप्रधानांचे जल्लोषपूर्ण आणि विविधरंगी स्वागत केले.
विमानतळ आणि हॉटेल येथे झालेल्या स्वागत समारंभात गयानाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने उपस्थिती लावली.भारत-गयाना दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून, जॉर्जटाउनच्या महापौरांनी "जॉर्जटाउन शहराची चावी " पंतप्रधानांना प्रदान केली.