पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला आणि उपस्थितांना संबोधित केले.
या कार्यक्रमामध्ये देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले. केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मध्यप्रदेश मधील देवास येथील रुबिना खान, या 1.3 लाख महिलांचा सहभाग असलेल्या स्वयं-सहाय्यता गटाच्या (बचत गट) सदस्य आहेत. त्यांनी आपल्या बचत गटाकडून कर्ज घेऊन कपडे विक्रीचा छोटा व्यवसाय सुरु केला, आणि मजुरीचे काम कायमचे सोडले. त्यानंतर त्यांनी आपल्या मालाच्या विक्रीसाठी जुनी मारुती व्हॅन खरेदी केली. यावर पंतप्रधान विनोदाने म्हणाले की, ‘मेरे पास तो सायकल भी नही है (माझ्याकडे तर सायकलही नाही)’. त्यानंतर रुबिना खान यांनी देवास मध्ये स्वतःचे दुकान सुरु करण्यापर्यंत प्रगती केली आणि त्यांना राज्य सरकार कडून कामही मिळाले.
साथ रोगाच्या काळात मास्क, पीपीपी किट आणि सॅनिटायझर यासारखी उत्पादने बनवून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले. क्लस्टर रिसोर्स पर्सन (सीआरपी ), म्हणून काम करताना आपण महिलांना उद्योजक बनण्याची प्रेरणा कशी दिली, याबद्दल त्यांनी माहिती दिली. यासाठी चाळीस गावांमध्ये गट स्थापन करण्यात आले.
पंतप्रधान म्हणाले की, बचत गटांच्या महिलांपैकी सुमारे दोन कोटी दीदींना ‘लखपती’ बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपण भागीदार बनू, असे आश्वासन देऊन रुबिना खान म्हणाल्या, ‘प्रत्येक दीदी लखपती व्हावी, अशी माझी इच्छा आहे’. उपस्थित सर्व महिलांनी आपला हात उंचावून प्रत्येक दीदीला लखपती बनवण्यामध्ये सहभागी होण्यासाठी दुजोरा दिला.
त्यांच्या आत्मविश्वासाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. "आपल्या माता-भगिनींचा आत्मविश्वास आपल्या देशाला स्वावलंबी बनवेल", ते म्हणाले. रुबिना खान यांच्या प्रवासाची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वयं-सहाय्यता गट महिलांसाठी स्वावलंबनाचे माध्यम ठरत आहे, आणि त्यांचा आत्मविश्वास, मला किमान दोन कोटी दीदींना लखपती बनवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा देत आहे. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे, असे पंतप्रधान म्हणाले. यावर रुबिना खान म्हणाल्या की, त्यांचे संपूर्ण गाव समृद्ध झाले आहे.