पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राजस्थानमधल्या कोटा इथल्या रहिवासी, सेवानिवृत्त लष्करी अधिकारी प्रमिला सिंग यांना पत्र लिहून त्यांचा सेवाभाव आणि दयाळू वृत्तीचे कौतुक केले आहे.
कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात, मेजर प्रमिला सिंग (सेवानिवृत्त) आणि त्यांचे पिता श्यामवीर सिंग यांनी निराधार आणि गरजू प्राण्यांची काळजी घेतली, त्यांच्या वेदना समजून घेत, त्यांन मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मेजर प्रमिला आणि त्यांच्या वडलांनी रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांसाठी स्वखर्चाने अन्न आणि उपचारांची सोय केली. त्यांच्या या कार्याचे कौतुक करतांना, ही सेवाभावी वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “ गेल्या सुमारे एक ते दीड वर्षांपासून आपण सगळे एका अभूतपूर्व संकटाचा सामना करतो आहोत. सध्याचा हा काळ कोणीही आपल्या आयुष्यभर विसरणार नाही, असाच आहे. अशा या कठीण काळात केवळ मानवांनाच जगणे कठीण झाले आहे असे नाही, तर, मानवाच्या आसपास राहणाऱ्या इतर अनेक सजीवांना देखील हे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत, आपण निराधार मुक्या प्राण्यांचे दुःख समजून घेतलेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवले, त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला, वैयक्तिक पातळीवर त्यांचे कल्याण करण्यासाठी परिश्रम घेतलेत, हे कौतुकास्पद आहे.”
त्याच वेळी, पंतप्रधान मोदी यांनी, हे ही म्हटले की या संकट काळात अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळली, ज्यांच्या मानवतावादी कार्यांमुळे आपल्याला संपूर्ण मानवजातीविषयीच अभिमान वाटावा. मेजर प्रमिला आणि त्यांचे पिता यांचे हे प्रेरणादायी कार्य असेच पुढेही सुरु राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
त्याआधी, मेजर प्रमिला सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून आपल्या कामाची माहिती दिली होती. निराधार प्राण्यांचे संगोपन करण्याचे हे काम त्यांनी टाळेबंदीच्या काळात सुरु केले असून आजही ते सुरूच आहे. निराधार, दुर्बल प्राण्यांच्या वेदनांना वाचा फोडत, आणखी लोकांनी त्यांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमिला सिंग यांनी केले आहे.