पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेतील देशभरातील हजारो लाभार्थ्यांनी केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार आणि स्थानिक लोक प्रतिनिधींसमवेत या कार्यक्रमात भाग घेतला.
मिझोराम मधील ऐझवाल येथील शेतकरी शुय्या राल्टे यांनी आपण 2017 पासून सेंद्रीय शेती करत असून आले, मिझो मिरची आणि इतर भाज्यांचे उत्पादन घेत असल्याची माहिती पंतप्रधानांना दिली तसेच अगदी नवी दिल्ली मधील कंपन्यांना देखील ते आपल्या कृषीमालाची विक्री करत असून आता त्यांच्या उत्पन्नात आरंभीच्या 20,000 रुपयांपासून 1,50,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी राल्टे यांना त्यांच्या उत्पादनांच्या बाजारपेठेविषयी विचारले असता ते म्हणाले की ईशान्य भागात जैविक मूल्य श्रृंखला विकास योजनेअंतर्गत बाजारपेठ तयार करण्यात आली आहे जिथे शेतकरी आपली उत्पादने कोणत्याही अडथळ्याविना विकू शकतात. देशातील अनेक शेतकरी आता सेंद्रीय शेतीकडे वळू लागले आहेत आणि ईशान्य भारतातील अत्यंत दुर्गम भागात राहून शुय्या राल्टे अनेकांना दिशा दाखवण्याचे कार्य करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
सेंद्रीय शेती ही आरोग्य आणि भूमी या दोन्हींच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या नऊ वर्षात, रसायन विरहित उत्पादनांच्या बाजारपेठेने सात पटीने वृद्धी नोंदवत मोठी उसळी घेतली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तर वाढ झाली आहेच शिवाय ग्राहकांच्या उत्तम आरोग्याची ही काळजी घेतली जात आहे, असे ते म्हणाले. सेंद्रीय शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानले आणि यात पदार्पण करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले.