>
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या (व्हीबीएसवाय) लाभार्थ्यांशी संवाद साधला. लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खातरजमा करून सरकारच्या प्रमुख योजनांच्या उद्देशाची परिपूर्णता करण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात येत आहे.
चंदीगडमधील विकसित भारत संकल्प यात्रेच्या ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) लाभार्थी मोना, या मूळच्या झारखंड मधील रांची येथील रहिवासी असून, त्यांनी पंतप्रधानांना आपण चंदीगडमध्ये चहाचे दुकान, संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालवत असल्याची माहिती दिली.
पंतप्रधानांनी विचारणा केली असता मोना यांनी सांगितले की त्यांनी पीएम स्वानिधी योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचे कर्ज घेतले, ज्यामुळे चहा स्टॉल उभारण्यात मदत झाली. मोना यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की कर्जाच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यासाठी शहरातल्या महानगरपालिकेकडून आपल्याला दूरध्वनी आला होता. मोना यांच्या चहाच्या स्टॉलवर जास्तीत जास्त व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून होतात हे समजल्यावर पंतप्रधान मोदी यांनी, आपल्याला अतिरिक्त कर्जासाठी बँकांकडून संपर्क साधला गेला होता का, याबाबत चौकशी केली. यावर मोना यांनी पंतप्रधानांना माहिती दिली की त्यांनी त्यानंतर अनुक्रमे 20,000 आणि 50,000 रुपयांचे कर्ज उचलले. मोना यांनी शून्य व्याजासह कर्ज उपलब्ध करणारा तिसरा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) समाजातील अधिकाधिक लोकांना अशा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ ही सरकारची भावना अधोरेखित केली, जिथे विकास समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचला आहे. मोना यांचे प्रयत्न आणि प्रगती बघता सरकारचे प्रयत्न योग्य दिशेने होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम रेल्वे स्थानकावरील सर्व दुकानांचे संचालन तृतीयपंथियांकडे सोपवण्याच्या रेल्वेच्या निर्णयाबद्दल माहिती दिली आणि आता हा व्यवसाय तेजीत सुरू आहे असे सांगितले. मोना यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदनही केले.