अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे केले उद्‌घाटन
“मॉरिशस हा भारताचा अनमोल मित्र आहे.आज उद्‌घाटन झालेले प्रकल्प या दोन देशांमधील भागीदारीला आणखी चालना देतील”
“मॉरिशस हा आमच्या शेजारी प्रथम धोरणातील महत्त्वाचा भागीदार आहे”
“भारताने नेहमीच मित्र देश मॉरिशसला सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे”
“भारत आणि मॉरिशस हे देश सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार आहेत”
“मॉरिशस हा आमच्या जन औषधी उपक्रमात सहभागी होणारा पहिला देश असेल. याद्वारे मॉरिशसच्या जनतेला भारतात निर्मित दर्जेदार जेनेरिक औषधांचा लाभ घेता येईल”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मॉरिशसच्या अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टी यांसह अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रकल्पांचे उद्‌घाटन हा भारत आणि मॉरिशस या दोन देशांमधील भक्कम आणि अनेक दशके जुन्या विकासात्मक भागीदारीचा दाखला  आहे. हे प्रकल्प मॉरिशसची मुख्य भूमी आणि अगलेगाबेट यांच्या दरम्यान अधिक चांगल्या वाहतुकीद्वारे संपर्क सुविधेची मागणी पूर्ण करेल, या भागातील सागरी सुरक्षा बळकट करेल आणि येथील सामाजिक आर्थिक विकासाला चालना देईल. नुकतेच 12 फेब्रुवारी 2024 ला या दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये युपीआय आणि रूपे कार्ड या सेवांची सुरुवात केली होती, त्यापाठोपाठ आज झालेले प्रकल्पांचे हे उद्‌घाटन महत्त्वपूर्ण आहे.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ म्हणाले की मॉरिशसच्या अगलेगा बेटावरील नवी धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टी यांसह अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे संयुक्त उद्‌घाटन करून भारत आणि मॉरिशस इतिहास रचत आहेत. हे उद्घाटन म्हणजे या दोन देशांदरम्यान असलेल्या अनुकरणीय भागीदारीचे प्रतीक आहेत अशा भावना व्यक्त करत त्यांनी मॉरिशस-भारत नातेसंबंधांना नवा आयाम दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले तसेच या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “अगलेगा बेटावर नवी धावपट्टी आणि जेट्टी सुविधेची उभारणी म्हणजे मॉरिशसच्या जनतेच्या आणखी एका स्वप्नाची पूर्तता आहे,” असे पंतप्रधान जुगनाथ म्हणाले. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांसाठी भारताने संपूर्ण अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांनी या योगदानाची प्रशंसा केली. भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून मॉरिशसला विशेष महत्त्व दिल्याबद्दल पंतप्रधान जुगनाथ यांनी मॉरिशसचे सरकार आणि जनतेतर्फे पंतप्रधान मोदी यांचे  आभार मानले. पंतप्रधान मोदी यांचे खंबीर नेतृत्व आणि मुत्सद्देगिरीची  प्रशंसा केली आणि भारतीय समुदायाने मूल्ये, ज्ञान आणि यशाचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे ही बाब अधोरेखित केली.भारताची ‘जन औषधी योजना’ स्वीकारणारा मॉरिशस हा जगातील पहिला देश ठरला आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की यातून मॉरिशसला  भारतीय औषधे आणि वैद्यकीय साधने मंडळाकडून सुमारे अडीचशे दर्जेदार औषधांचा पुरवठा केला जाणार असून, मॉरिशसच्या जनतेला त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. या दोन्ही देशांमधील भागीदारीला देखील यातून अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. विकासविषयक ध्येये साध्य करण्यासोबतच सागरी सर्वेक्षण तसेच सुरक्षेच्या क्षेत्रातील सामर्थ्य आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणारे हे परिवर्तनशील प्रकल्प साकार करण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानून मॉरिशसचे पंतप्रधान जुगनाथ यांनी त्यांचे भाषण संपवले.

 

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्याशी झालेली ही पाचवी भेट आहे आणि हाच भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यान असलेल्या चैतन्यमय, सशक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण भागीदारीचा पुरावा आहे.

मॉरिशस भारताच्या ‘शेजारी राष्ट्र प्रथम धोरणा’चा प्रमुख भागीदार आहे आणि सागर (SAGAR ) संकल्पनेअंतर्गत एक विशेष भागीदार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. "ग्लोबल साऊथचे सदस्य म्हणून, दोन्ही देशांची प्राधान्ये क्षेत्रे समान आहेत आणि गेल्या 10 वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध अभूतपूर्व गतीने दृढ होत आहेत आणि परस्पर सहकार्याची नवीन उंची गाठली आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही देशातील जुन्या भाषा आणि सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी यूपीआय आणि रुपे कार्डची आठवण सांगितली ज्यानी  परस्पर संबंधांना आधुनिक डिजिटल कनेक्टिव्हिटी  प्रदान केली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

विकास भागीदारी हा दोन राष्ट्रांमधील राजकीय भागीदारीचा पाया आहे आणि भारताने दिलेले विकासात्मक योगदान हे मॉरिशसच्या प्राधान्यक्रमांवर आधारित आहे, मग ती विशेष आर्थिक क्षेत्राची (EEZ) सुरक्षा असो अथवा आरोग्य सुरक्षा असो, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  “भारताने नेहमीच मॉरिशसच्या गरजांचा आदर केला आणि  कठीण प्रसंगी सर्वप्रथम प्रतिसाद दिला  आहे”, कोविड महामारी असो किंवा तेल गळती अशा संकटकाळात या मोठे बेट असलेल्या राष्ट्राला भारताने केलेल्या दीर्घकालीन मदतीवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले. मॉरिशसमधील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल हे भारताचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.  गेल्या 10 वर्षात, भारताने मॉरिशसच्या जनतेला 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या मदतीसह 1,000 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा कर्जपुरवठा केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.  मॉरिशसमधील मेट्रो रेल्वे सेवा, सामुदायिक विकास प्रकल्प, सामाजिक गृहनिर्माण, कान - नाक - घसा रुग्णालय, नागरी सेवा महाविद्यालये आणि क्रीडा संकुलातील पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान देण्याचे भाग्य भारताला लाभल्याचे  त्यांनी सांगितले.

2015 मध्ये अगालेगातील जनतेला दिलेले वचन आपण पूर्ण करू शकलो, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “आजकाल भारतात याला मोदी की गॅरंटी’ म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले.  आज संयुक्तरित्या उद्घाटन करण्यात आलेल्या या सुविधांमुळे लोकांचे राहणीमान उंचावेल ,” असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे मॉरिशसच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील संपर्क व्यवस्था सुधारेल तसेच मुख्य भूभागाशी प्रशासकीय संबंध देखील सुधारेल.  वैद्यकीय आणीबाणी प्रसंगी बचाव प्रयत्न सोपे  होतील आणि शालेय  विद्यार्थ्यांच्या प्रवास सुखकर होईल, असे ते म्हणाले.

 

भारत आणि मॉरिशस या दोन अर्थव्यवस्थांवर परिणाम करणाऱ्या हिंद महासागर क्षेत्रातील पारंपरिक आणि अपारंपरिक आव्हानांचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि मॉरिशस हे सागरी सुरक्षेतील नैसर्गिक भागीदार आहेत.  “आम्ही हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा, समृद्धी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत.  आम्ही विशेष आर्थिक क्षेत्राचे निरीक्षण, संयुक्त निगराणी, जलविज्ञान तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण यांसारख्या सर्व क्षेत्रात सहकार्य करत आहोत”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. आज उद्घाटन झालेल्या अगालेगा येथील हवाई पट्टी आणि जेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढेल आणि मॉरिशसची नील अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल यावर त्यांनी भर दिला.

मॉरिशसमध्ये जन औषधी केंद्रे स्थापन करण्याच्या मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ यांच्या निर्णयाचे कौतुक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या उपक्रमामुळे भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा मॉरिशस हा पहिला देश ठरला आहे. याचा फायदा म्हणून मॉरिशसच्या लोकांना उत्तम दर्जाची मेड-इन-इंडिया जेनेरिक औषधे उपलब्ध होतील.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टी आणि धाडसी नेतृत्वाबद्दल अभिनंदन केले.  भारत आणि मॉरिशस संबंध आगामी काळात नवीन उंची गाठतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi