पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झेम्बर्गचे पंतप्रधान झेव्हिअर बिटल यांच्यात आज आभासी स्वरूपात द्विपक्षीय शिखर परिषद झाली.
कोविड-19 मुळे लक्झेम्बर्ग येथे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच, या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी बिटल यांच्या नेतृत्वाखाली लक्झेम्बर्गने केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.
कोविड नंतरच्या जगात, भारत- लक्झेम्बर्ग संबंध अधिक मजबूत करण्याबद्दल प्रामुख्याने दोन्ही पंतप्रधानांदरम्यान यावेळी चर्चा झाली. विशेषतः वित्तीय तंत्रज्ञान, हरित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा, अवकाश-साधने, डिजिटल संशोधने आणि स्टार्ट अप्स या क्षेत्रातील सहकार्यावर यावेळी भर देण्यात आला. दोन देशांमधील विविध करारांना अंतिम स्वरुप दिल्याबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः वित्तीय बाजार नियामक, शेअर बाजार आणि नवोन्मेष संस्था संदर्भातले करार पूर्णत्वाला आले आहेत.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रभावी बहुराष्ट्रीयत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य वृद्धिंगत करणे आणि कोविड-19 चा आजार, दहशतवाद तसेच हवामान बदल अश जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रित काम करण्याबाबत सहमती झाली. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य अभियानात सहभागी होण्याच्या लक्झेम्बर्गच्या घोषणेचे पंतप्रधानांनी स्वागत केले तसेच आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधा सहकार्यात सहभागी होण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.
कोविडच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यावर, लक्झेम्बर्गचे ग्रँड ड्युक आणि पंतप्रधान बिटल यांचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. पंतप्रधान बिटल यांनी देखील पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या सोईनुसार, लक्झेम्बर्गला येण्याचे आमंत्रण दिले.