पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कझान येथे रशियाच्या अध्यक्षतेखाली आयोजित 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेतला.
ब्रिक्स नेत्यांनी बहुपक्षीयता बळकट करणे, दहशतवादाचा मुकाबला करणे, आर्थिक विकासाला चालना देणे, शाश्वत विकासाचा पाठपुरावा करणे आणि ग्लोबल साउथच्या समस्यांवर प्रकाश टाकणे यासारख्या मुद्यांवर फलदायी चर्चा केली. या नेत्यांनी 13 नवीन ब्रिक्स भागीदार देशांचे स्वागत केले.
ब्रिक्स शिखर परिषदेच्या दोन सत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी नमूद केले की ही शिखर परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा जग अनेक अनिश्चितता आणि संघर्ष, प्रतिकूल हवामान प्रभाव आणि सायबर धोके यासारख्या आव्हानांसह ब्रिक्स कडून मोठ्या अपेक्षा ठेवत आहे.या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समूहाने लोककेंद्रित दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.दहशतवादाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक अधिवेशन लवकरात लवकर आयोजित करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
पंतप्रधानांनी ब्रिक्स देशांना जागतिक प्रशासन सुधारणांसाठी सक्रीयपणे पुढे जाण्याचे आवाहन केले. जी-20 अध्यक्षपदी असताना भारताने आयोजित केलेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचे स्मरण करून, समूहाने ग्लोबल साउथच्या समस्यांना प्राधान्य दिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गिफ्ट शहरासह प्रादेशिक स्तरावर स्थापन झालेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेमुळे भारताने नवीन मूल्ये आणि प्रभाव निर्माण केला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स च्या उपक्रमांवर प्रकाश टाकताना कृषी, लवचिक पुरवठा साखळी, ई-कॉमर्स आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमधील व्यापार सुलभतेच्या प्रयत्नांमुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. लघु आणि मध्यम उद्योगांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारताने आरंभ केलेला ब्रिक्स स्टार्टअप मंच या वर्षी सुरू होणार आहे, ज्यामुळे ब्रिक्स आर्थिक कार्यसूचीत महत्त्वपूर्ण भर पडेल असे त्यांनी निदर्शनास आणले.
कॉप 28 दरम्यान जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती, मिशन लाइफ आणि ग्रीन क्रेडिट उपक्रम यासह भारताने अलीकडेच हाती घेतलेल्या हरित उपक्रमांची पंतप्रधानांनी माहिती दिली. त्यांनी ब्रिक्स देशांना या उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले.
16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन केले आणि ब्राझीलने समूहाचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी नेत्यांनी ‘कझान जाहीरनामा’ स्वीकारला.
समारोपाच्या पूर्ण सत्रातील पंतप्रधानांचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
उद्घाटनाच्या पूर्ण सत्रातील पंतप्रधानांचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.