पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ते नवी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे नमो ड्रोन दिदीद्वारे केलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.देशभरातील 10 वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या नमो ड्रोन दीदींनीही एकाच वेळी ड्रोन प्रात्यक्षिकात भाग घेतला.कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी 1000 नमो ड्रोन दीदींना ड्रोनही सुपूर्द केले.पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यात बँकांनी स्थापन केलेल्या बँक जोडणी शिबिराद्वारे बचत गटांना अनुदानित व्याजदरावर सुमारे 8,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित केले.पंतप्रधानांनी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधी बचतगटांना वितरित केला. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला.
ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यशाचे नवे अध्याय लिहित आहेत त्यामुळे आजचा प्रसंग ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.अशा यशस्वी महिला उद्योजकांशी संवाद साधल्याने देशाच्या भवितव्याबद्दल विश्वास निर्माण होतो, असे ते म्हणाले. त्यांनी स्त्री शक्तीच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतुक केले. ‘यामुळे मला 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला ’, असे ते म्हणाले.
“कोणताही समाज स्त्री शक्तीसाठी संधी निर्माण करून आणि त्यांचा सन्मान सुनिश्चित करूनच प्रगती करू शकतो”, असे पंतप्रधान म्हणाले. थोड्याशा पाठिंब्याने देखील स्त्री शक्ती पाठबळ मिळवते आणि इतरांसाठी आधार बनते.महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड, आरोग्यासाठी हानिकारक धुराने भरलेले स्वयंपाकघर, महिलांची दैनंदिन गैरसोय टाळण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी, प्रत्येकासाठी जनधन खाते, महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अवमानकारक भाषेच्या विरोधात आणि आणि स्त्री शक्तीप्रती योग्य वर्तनाबद्दल मुलांना शिक्षित करण्याची आवश्यकता यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून बोलणारे ते पहिले पंतप्रधान असल्याचे पंतप्रधान म्हणाले .
“दैनंदिन जीवनात तळागाळातून आलेल्या अनुभवांतून मोदींची संवेदनशीलता आणि मोदींच्या योजना उदयास आल्या आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.जीवनातील प्रत्यक्ष अनुभवावरच ही संवेदनशीलता आणि योजना आधारलेल्या आहेत , म्हणूनच, या योजनांमुळे देशातील माता आणि मुलींचे जीवन सुसह्य होते आहे.
देशातील नारी शक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरील समस्या सोडवण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या योजनांविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली. स्त्री-भ्रुण हत्या थांबवण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान, गर्भवती महिलांच्या पोषणासाठी 6,000 रुपयांची मदत, शालेय जीवनादरम्यान आर्थिक सुनिश्चिततेसाठी सुकन्या समृद्धी योजना, उद्योजकतेच्या क्षेत्रात पाय रोवता यावे म्हणून मदत करण्यासाठी मुद्रा योजना, बाळंतपणाच्या रजेचा विस्तार, मोफत वैद्यकीय सेवा, परवडणाऱ्या दरात औषधे तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरांची नोंदणी महिलांच्या नावे करून त्यांच्या मालकी हक्कात वाढ इत्यादी सरकारी योजनांनी जुन्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणला आहे असे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा परिवर्तनीय प्रभाव देशातील महिलांच्या नेतृत्वाखाली घडून येतो आहे याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. ड्रोन दीदी महिलांशी साधलेल्या संवादाचे स्मरण करून पंतप्रधानांनी उत्पन्न, कौशल्य आणि मान्यता यांच्या माध्यमातून ड्रोन दीदी महिलांमध्ये सक्षमतेची भावना जागृत झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेल्या भरारीचा उल्लेख करून पंतप्रधान पुढे म्हणाले की, “देशातील तंत्रज्ञान विषयक क्रांतीचे नेतृत्व नारी शक्ती करेल यावर मला पूर्ण विश्वास आहे.” ड्रोन दीदींसाठी नवे मार्ग खुले करणाऱ्या, दूध आणि भाजीपाल्याची बाजारापर्यंत वाहतूक, औषधांचे वितरण इत्यादीसारख्या क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या विस्ताराबाबत पंतप्रधानांनी तपशीलवार माहिती दिली.
ते म्हणाले, “गेल्या दशकभरात भारतात स्वयं सहाय्यता बचत गटांचा झालेला विस्तार उल्लेखनीय आहे. या बचत गटांनी देशातील महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला आहे.” बचत गटांमध्ये महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “बचत गटात कार्यरत प्रत्येक भगिनीला मी आज मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे बचत गट देशाच्या उभारणीत आघाडीवर राहिले आहेत.” “बचत गटांमध्ये कार्यरत महिलांच्या संख्येने 10 कोटींचा टप्पा ओलांडला आहे,” असा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी बचत गटांतील महिलांच्या सहभागात प्रभावी वाढ झाल्याची बाब ठळकपणे नमूद केली. बचत गटांना पाठबळ पुरवण्यासाठी सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “गेल्या 10 वर्षांत,आपल्या सरकारने बचत गटांचा विस्तार केला असून त्यांच्यापैकी 98% बचत गटांची बँक खाती उघडण्याची सोय देखील करून दिली आहे.” अशा बचत गटांना देण्यात येणाऱ्या मदत निधीमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून या बचत गटांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत 8 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की आधुनिक पायाभूत सुविधांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे या बचत गटांचे उत्पन्न तिपटीने वाढले आहे.
आर्थिक सक्षमीकरणासोबतच पंतप्रधानांनी या बचत गटांच्या सामाजिक परिणामांचे देखील कौतुक केले. ते म्हणाले, “या गटांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास तसेच एकूणच ग्रामीण समुदायांच्या उत्थानामध्ये लक्षणीय योगदान दिले आहे.” बँक सखी, कृषी सखी, पशु सखी आणि मत्स्य सखी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आणि सेवांचा उल्लेख त्यांनी केला. “या दीदी देशातील आरोग्य ते डिजिटल भारत अशा सर्व प्रकारच्या राष्ट्रीय मोहिमांना नवी गती प्राप्त करून देत आहेत. पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये 50 टक्के महिला आहेत आणि या अभियानाच्या लाभार्थ्यांपैकी 50 टक्क्याहून अधिक महिला आहेत. सफलतेची ही शृंखला नारी शक्ती वरील माझा विश्वास अधिकच बळकट करतो", असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी होण्यासाठी बचत गटांनी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ते म्हणाले की ज्या ठिकाणी बचत गटाचे सदस्य हा उपक्रम हाती घेत असतील तेथे त्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, डॉ. मनसुख मांडवीय आणि गिरीराज यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
नमो ड्रोन दीदी आणि लखपती दीदी हे उपक्रम महिलावर्गामध्ये, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आणि वित्तीय स्वातंत्र्याची जोपासना करण्यासाठी पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेचा अविभाज्य भाग आहेत.या संकल्पनेचा आणखी विस्तार करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानाच्या पाठबळासह यशस्वी झाल्या आहेत आणि त्या बचत गटातील इतर सदस्य महिलांना मदत करून त्यांच्या उत्थानासाठी प्रेरणा देत आहेत अशा लखपती दीदींचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
कोई भी देश हो, कोई भी समाज हो, वो नारीशक्ति की गरिमा बढ़ाते हुए, उनके लिए नए अवसर बनाते हुए ही आगे बढ़ सकता है: PM @narendramodi pic.twitter.com/RS5a296wCg
— PMO India (@PMOIndia) March 11, 2024
हमारी बहनें देश को सिखाएंगी कि ड्रोन से आधुनिक खेती कैसे होती है: PM @narendramodi pic.twitter.com/eJ4HsFbiVf
— PMO India (@PMOIndia) March 11, 2024
मेरा विश्वास है, देश की नारीशक्ति, 21वीं सदी के भारत की तकनीकी क्रांति को नेतृत्व दे सकती है: PM @narendramodi pic.twitter.com/x3l8LXpqRA
— PMO India (@PMOIndia) March 11, 2024
बीते 10 वर्षों में जिस तरह भारत में महिला स्वयं सहायता समूहों का विस्तार हुआ है, वो अपने आप में अध्ययन का विषय है: PM @narendramodi pic.twitter.com/PvyeStwybk
— PMO India (@PMOIndia) March 11, 2024