पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित ‘ओदिशा पर्व 2024’ सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ओदिशातील सर्व बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावर्षी स्वभाव कवी गंगाधर मेहेर यांच्या पुण्यतिथीचे शताब्दी वर्ष आहे असे सांगत त्यांनी मेहेर यांना आदरांजली वाहिली . यावेळी त्यांनी भक्त दासिया भौरी , भक्त सालबेगा आणि उडिया भागवतचे लेखक जगन्नाथ दास यांना श्रद्धांजली वाहिली.
"ओदिशा ही नेहमीच संत आणि विद्वानांची भूमी राहिली आहे" असे मोदी म्हणाले. सरल महाभारत, ओडिया भागवत यासारखे महान साहित्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून सांस्कृतिक समृद्धीचे संवर्धन करण्यात संत आणि विद्वानांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, उडिया भाषेत महाप्रभू जगन्नाथ यांच्याशी संबंधित विपुल साहित्य आहे. महाप्रभू जगन्नाथ यांच्या एका गाथेचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की भगवान जगन्नाथ यांनी युद्धात आघाडीवर राहून युद्धभूमीत प्रवेश करताना मणिका गौदिनी नावाच्या भक्ताच्या हातातून दही घेतले होते. भगवान जगन्नाथ यांच्या या साधेपणाची त्यांनी प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की वरील गाथेतून खूप काही शिकायला मिळते. एक महत्त्वाचा धडा म्हणजे जर आपण चांगल्या हेतूने काम केले तर स्वतः देव त्या कार्याचे नेतृत्व करतो . देव नेहमीच आपल्या सोबत असतो आणि आपण कोणत्याही कठीण परिस्थितीत एकटे आहोत असे आपण वाटून घेऊ नये असे मोदी म्हणाले.
ओदिशाचे कवी भीम भोई यांची एक ओळ ' कितीही वेदना सहन कराव्या लागल्या तरी जगाचा उद्धार झालाच पाहिजे' याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की ही ओदिशाची संस्कृती आहे. पुरी धामने 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही भावना मजबूत केली . ओदिशाच्या शूर सुपुत्रांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन देशाला मार्ग दाखवला असे ते म्हणाले. पैका क्रांतीतील हुतात्म्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही असे ते म्हणाले. हे सरकारचे भाग्य आहे की त्यांना पैका क्रांतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्याची संधी मिळाली.
यावेळी उत्कल केसरी हरे कृष्ण मेहताब जी यांच्या योगदानाचे संपूर्ण देश स्मरण करत असल्याचा पुनरुच्चार करून मोदी म्हणाले की, सरकार त्यांची 125 वी जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करत आहे. भूतकाळापासून आतापर्यंत ओदिशाने देशाला दिलेल्या कुशल नेतृत्वाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज भारतात आदिवासी कल्याणासाठी हजारो कोटी रुपयांच्या योजना लागू केल्या जात आहेत आणि या योजनांचा लाभ केवळ ओदिशातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाला होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ओदिशा ही नारी शक्तीची भूमी आहे आणि माता सुभद्राच्या रूपातील तिच्या सामर्थ्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, ओदिशातील महिला जेव्हा प्रगती करतील तेव्हाच ओदिशा प्रगती करेल. ते पुढे म्हणाले की काही दिवसांपूर्वी ओदिशातील माझ्या माता आणि भगिनींसाठी सुभद्रा योजना सुरू करण्याचे भाग्य मला लाभले ज्याचा लाभ ओदिशातील महिलांना मिळेल.
मोदी यांनी भारताच्या सागरी सामर्थ्याला नवा आयाम देण्यात ओदिशाने दिलेले योगदान अधोरेखित केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कटक येथील महानदीच्या काठावर भव्य पद्धतीने आयोजित केलेल्या बाली जत्रेची ओदिशात काल सांगता झाल्याचे त्यांनी नमूद केले. बाली जत्रा हे भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. भूतकाळातील खलाशांच्या धाडसाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, आजच्यासारखे आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही समुद्र पार करण्याइतके धाडस त्यांच्यात होते. ते पुढे म्हणाले की, व्यापारी इंडोनेशियातील बाली, सुमात्रा, जावा यांसारख्या ठिकाणी जहाजाने प्रवास करत होते, ज्यामुळे व्यापाराला चालना मिळाली आणि विविध ठिकाणी संस्कृती पोहचवण्यात मदत झाली. आज विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात ओदिशाच्या सागरी सामर्थ्याची महत्त्वाची भूमिका आहे यावर मोदी यांनी भर दिला.
ओदिशा राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी गेली 10 वर्षे सातत्याने सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे आज ओदिशा राज्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.ओदिशाच्या जनतेने दिलेल्या अभूतपूर्व आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार मानत मोदी म्हणाले की त्यामुळे या आशेला नवे धैर्य मिळाले असून सरकारने भव्य स्वप्नांसह मोठी उद्दिष्ट्ये निश्चित केली आहेत.वर्ष 2036 हे ओदिशा राज्य स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे याची नोंद घेत ते म्हणाले की, देशातील सशक्त, समृद्ध आणि वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांमध्ये ओदिशाला स्थान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
एकेकाळी देशाच्या पूर्व भागातील ओदिशासारख्या राज्यांना मागासलेले समजले जात होते याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की ते मात्र देशाच्या या पूर्व भागाला भारताच्या विकासासाठीची प्रेरक शक्ती मानतात. आणि म्हणूनच सरकारने पूर्व भारताच्या विकासाला प्राधान्य दिले असून या संपूर्ण भागात संपर्क, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रांशी संबंधित सर्व प्रकारची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात आली असे त्यांनी पुढे सांगितले. दहा वर्षांपूर्वी केंद्र सरकार अर्थसंकल्पात ओदिशा राज्यासाठी जो निधी देत असे त्याच्या तिप्पट निधी आता या राज्याला मिळत आहे ही बाब पंतप्रधान मोदी यांनी ठळकपणे नमूद केले. ते पुढे म्हणाले की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ओदिशाच्या विकासासाठी 30 टक्के अधिक निधी देण्यात आला आहे. ओदिशा राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात वेगाने काम करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
“ओदिशा राज्यात बंदर-आधारित औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता आहे,”असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. आणि म्हणूनच, धामरा, गोपाळपूर, अस्तरंगा, पलूर आणि सुवर्णरेखा येथील बंदरांचा विकास करुन व्यापाराला चालना देण्यात येईल असे ते पुढे म्हणाले. ओदिशा राज्य हे खनिकर्म आणि धातूंच्या बाबतीत भारताचे शक्तीकेंद्र आहे अशी टिप्पणी करत पंतप्रधान मोदी म्हणाले की यातून पोलाद, अल्युमिनियम आणि उर्जा या क्षेत्रांमध्ये ओदिशाचे स्थान बळकट झाले आहे. ते पुढे म्हणाले की या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ओदिशामध्ये समृद्धीचे नवे मार्ग खुले करता येतील.
ओदिशा राज्यात काजू, ताग, कापूस, हळद आणि तेलबियांचे मुबलक प्रमाणात उत्पादन होते याकडे निर्देश करत पंतप्रधान मोदी म्हणाले की येथे पिकणारी ही उत्पादने मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचतील आणि त्यातून शेतकऱ्यांचा लाभ होईल याची सुनिश्चिती करणे हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. ते पुढे म्हणाले की, ओदिशामध्ये मस्त्यप्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराला मोठा वाव असून ओदिशाच्या मत्स्यउत्पादनांना जागतिक बाजारांमध्ये मागणी असलेल्या ब्रँडचे रूप देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
ओदिशाला गुंतवणूकदारांचे प्राधान्यक्रमाचे स्थान म्हणून घडवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की त्यांचे सरकार ओदिशामध्ये व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्याप्रती वचनबद्ध असून उत्कर्ष उत्कल उपक्रमाच्या माध्यमातून येथे गुंतवणुकीला चालना देण्यात येत आहे.ओदिशामध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर लगेचच, पहिल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात राज्यात 45 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. ते पुढे म्हणाले की आज ओदिशा राज्याकडे स्वतःची दूरदृष्टी तसेच आराखडा असून त्यायोगे गुंतवणुकीला चालना मिळणार असून राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की ओदिशा राज्यात असलेल्या क्षमतेचा योग्य दिशेने वापर करुन या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाता येईल. ओदिशाच्या मोक्याच्या स्थानाचा राज्याला फायदा होऊ शकतो यावर जोर देत पंतप्रधान म्हणाले की, या राज्यापासून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. “ओदिशा हे पूर्व आणि आग्नेय आशियासाठी व्यापाराचे महत्वाचे केंद्र आहे,”मोदी म्हणाले.येत्या काळात जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये ओदिशाचे महत्त्व आणखी वाढणार असून राज्याच्या निर्यातीत वाढ करण्याच्या उद्देशावर देखील सरकार काम करत आहे असे त्यांनी पुढे सांगितले.
“ओदिशामध्ये शहरीकरणाला प्रोत्साहन देण्याची अमर्याद क्षमता आहे,”पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि ते पुढे म्हणाले की, त्यांच्या सरकारने या दिशेने भक्कम पावले उचलली आहेत. ते पुढे म्हणाले की, चैतन्यपूर्ण आणि उत्तम प्रकारे एकमेकांशी जोडलेली शहरे मोठ्या संख्येने उभारण्याप्रती सरकार कटिबद्ध आहे.ओदिशा राज्यातील दुसऱ्या स्तरावरील शहरांमध्ये विशेषतः जेथे नव्या पायाभूत सुविधांच्या विकासातून नव्या संधींची निर्मिती होऊ शकेल अशा पश्चिम ओदिशातील जिल्ह्यांमध्ये देखील नव्या शक्यतांची निर्मिती करत आहे असे मोदी यांनी अधोरेखित केले.
उच्च शिक्षण क्षेत्राच्या मुद्द्याला स्पर्श करत पंतप्रधान मोदी म्हणाले की देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ओदिशा नवी आशा घेऊन आले असून येथे असलेल्या अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी राज्याला शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेण्यासाठी प्रेरित केले. हे प्रयत्न राज्यातील स्टार्ट अप परिसंस्थेला चालना देत आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.
ओदिशाच्या सांस्कृतिक समृध्दतेमुळे हे राज्य नेहमीच खास राहिले आहे यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले की ओदिशातील विविध कलाप्रकार प्रत्येकालाच मोहित करतात, मग ते ओडिसी नृत्य असो किंवा चित्रकला असो, पट्टचित्रांमध्ये दिसणारी सजीवता असो किंवा आदिवासी कलेचे प्रतीक असलेली सौर चित्रे असोत. ओदिशातील संबळपुरी, बोमकाई आणि कोटपद विणकरांची कलाकारी बघण्यासारखी असते असे त्यांनी आवर्जून नमूद केले.आपण येथील कला आणि कारागिरी यांचा जितकं जास्त प्रसार आणि जतन करू तितकं ओडिया जनतेबद्दलचा आदर वाढत जाईल अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.
ओदिशाची वास्तुरचनाकला आणि विज्ञान यांच्या प्रचंड वारशाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की कोणार्कचे सूर्यमंदिर, तसेच लिंगराज आणि मुक्तेश्वर यांसारख्या प्राचीन मंदिरांच्या उभारणीमागील विज्ञान, वास्तुरचना आणि त्यांची भव्यता प्रत्येकाला त्यांच्या उत्कृष्टता आणि कारागिरीने चकित करतात.
पर्यटनाच्या बाबतीत ओदिशाच्या भूमीत असलेल्या प्रचंड क्षमतेची नोंद घेत पंतप्रधान म्हणाले की या शक्यता वास्तवात आणण्यासाठी विविध आयामांमध्ये काम करण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की आज ओदिशासहसंपूर्ण देशात असे सरकार आहे जे ओदिशाच्या वारशाचा आणि ओळखीचा आदर करते.
गतवर्षी ओडिशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या G-20 मधील एका परिषदेचे स्मरण करत श्री मोदी म्हणाले की, सरकारने अनेक देशांचे प्रमुख आणि राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी सूर्य मंदिरची एक भव्य भेट आयोजित केली होती. मंदिराच्या रत्न भांडारासह महाप्रभू जगन्नाथ मंदिर परिसराचे चारही दरवाजे यावेळी उघडण्यात आल्याचा आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
जगाला ओडिशाची ओळख पटवून देण्यासाठी अधिक नाविन्यपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. बाली जत्रा अधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याचा प्रचार करण्यासाठी बाली जत्रा दिन घोषित करता येऊ शकतो आणि साजरा केला जाऊ शकतो, याचे उदाहरण त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की,विविध आदिवासी वारसा दिन साजरे करण्यासोबतच ओडिसी नृत्यासारख्या कलेसाठीसुद्धा एखादा ओदिशा दिन साजरा करणे आयोजित केले जाऊ शकते.श्री मोदी म्हणाले, की, यावेळी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते, ज्यामुळे लोकांमध्ये पर्यटन आणि लघु उद्योगांशी संबंधित संधींबद्दल जागरूकता निर्माण होईल.आगामी काळात भुवनेश्वर येथे प्रवासी भारतीय संमेलनही होणार आहे आणि ओदिशासाठी ही एक मोठी संधी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
जगभरातील लोक आपली मातृभाषा आणि संस्कृती विसरत चालले आहेत या वाढत्या प्रवृत्तीकडे लक्ष वेधत;ओरिया समुदाय, मग तो तो कोठेही राहत असो, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा आणि तिथले सण साजरे करण्याबाबत नेहमीच खूप उत्सुक असतो,असे सांगत मोदींनी आनंद व्यक्त केला.मातृभाषा आणि संस्कृती ही आपल्या सामर्थ्याने माणसाला त्याच्या मातृभूमीशी कसे जोडून ठेवते, हे त्यांनी त्यांच्या अलीकडील गयानाला दिलेल्या भेटीदरम्यान पाहिले आहे.ते पुढे म्हणाले की, सुमारे दोनशे वर्षांपूर्वी शेकडो मजूर भारत सोडून गेले, मात्र त्यांनी रामचरित मानस आपल्या सोबत ठेवले आणि आजही ते भारतभूमीशी जोडलेले आहेत. विकास आणि बदल घडत असतानाही आपला वारसा जतन करून,त्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचू शकतात यावर श्री मोदींनी भर दिला.ते पुढे म्हणाले की तशाच प्रकारे ओडिशाला नवीन उंचीवर नेले जाऊ शकते.
आजच्या आधुनिक युगात नवे बदल आत्मसात करत असताना,आपली मुळे मजबूत ठेवणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.ते पुढे म्हणाले की ओडिशा महोत्सवासारखे कार्यक्रम यासाठी एक माध्यम बनू शकतात.ते पुढे म्हणाले की,’ओडिशा प्रभा’(Odisha Parba) सारख्या कार्यक्रमांचा आगामी काळात आणखी विस्तार केला पाहिजे आणि तो फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहू नये. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावेत आणि शाळा आणि महाविद्यालयांचाही सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर मोदींनी भर दिला. त्यांनी दिल्लीस्थित इतर राज्यांतील लोकांना यात सहभागी होण्याचे आणि ओडिशाला अधिक जवळून जाणून घेण्याचे आवाहन केले.
येणाऱ्या काळात लोकसहभागाचे प्रभावी व्यासपीठ बनत या उत्सवाचे रंग ओडिशाच्या तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील,असा विश्वास श्री मोदींनी आपल्या संबोधनाचा समारोप करताना व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री श्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान, ओडिया समाजाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
‘ओदिशा पर्व’ हा ओडिया समाज या नवी दिल्ली येथील संस्थेने आयोजित केलेला,एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे.त्याद्वारे,ते ओदिशा राज्याच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करत आहेत.ही परंपरा पुढे चालू ठेवत यावर्षी 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ओडिशा पर्वचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनातून ओडिशाच्या समृद्ध वारशाचे विविधरंगी सांस्कृतिक रूप दाखवले जाते आणि राज्याच्या समृद्ध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नैतिकतेचे दर्शन होते.यावेळी विविध क्षेत्रांतील प्रमुख तज्ञ आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रीय चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले होते.