पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेला संबोधित केले. 'भारत: उत्तुंग झेप घेण्यासाठी सज्ज ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की टीव्ही 9 ची रिपोर्टिंग टीम भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या बहुभाषिक वृत्त वाहिन्यांनी टीव्ही 9 ला भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा प्रतिनिधी बनवले आहे असे पंतप्रधान म्हणाले.
"भारत: उत्तुंग झेप घेण्यासाठी सज्ज’ या शिखर परिषदेच्या संकल्पनेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जेव्हा आपण उत्कटतेने आणि उत्साहाने भारलेले असतो, तेव्हाच मोठी झेप घेता येते असे त्यांनी अधोरेखित केले. ही संकल्पना 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे वाढलेला भारताचा आत्मविश्वास आणि आकांक्षा अधोरेखित करते असे ते म्हणाले. या 10 वर्षांत घडलेल्या परिवर्तनाला मानसिकता, आत्मविश्वास आणि सुशासन हे प्रमुख घटक कारणीभूत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पराभवाची मानसिकता विजय मिळवून देऊ शकत नाही यावर त्यांनी भर दिला, ते म्हणाले की, मानसिकतेत झालेला बदल आणि भारताने घेतलेली झेप अविश्वसनीय आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील नेतृत्वाच्या नकारात्मक दृष्टिकोनाची आठवण करून दिली जेव्हा भ्रष्टाचार, घोटाळे, धोरण लकवा आणि घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचा पाया हादरला होता . पंतप्रधानांनी त्यानंतर घडलेल्या परिवर्तनाचा आणि भारताचा जगातील अव्वल पाच अर्थव्यवस्थांमध्ये समावेश झाल्याचा उल्लेख केला.
“21 व्या शतकातील भारत छोट्या गोष्टींचा विचार करत नाही. आम्ही जे काही करतो, ते सर्वोत्तम आणि भव्यदिव्य करतो. जग अचंबित झाले आहे आणि भारतासोबत चालण्यातच आपला फायदा आहे हे त्यांना कळून चुकले आहे,” असे ते म्हणाले.
2014 पूर्वीच्या दहा वर्षांच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांतील कामगिरी अधोरेखित करताना पंतप्रधानांनी थेट परदेशी गुंतवणुकीत 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 640 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत झालेली विक्रमी वाढ, भारताची डिजिटल क्रांती, भारताच्या कोविड लसीवरील विश्वास आणि देशातील करदात्यांची वाढती संख्या यांचा उल्लेख केला जी सरकारवरील लोकांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहेत. देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी माहिती दिली की 2014 मध्ये लोकांनी 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, तर 2024 मध्ये 52 लाख कोटी रुपये इतकी मोठी गुंतवणूक झाली आहे. “हे नागरिकांना सिद्ध करून दाखवते की देश सामर्थ्याने पुढे मार्गक्रमण करत आहे”, “स्वतःवरील आणि सरकारवरील विश्वासाची पातळी समान आहे.”असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
सरकारची कार्यसंस्कृती आणि प्रशासन हे या परिवर्तनाचे मुख्य घटक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “सरकारी कार्यालये आता समस्या राहिली नसून ते देशवासीयांचे सहकारी बनत आहेत,” असे ते म्हणाले.
ही गरुड भरारी घेण्यासाठी गिअर बदलण्याची गरज होती, असे पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेशातील शरयू कालवा प्रकल्प, सरदार सरोवर योजना, महाराष्ट्रातील कृष्णा कोयना परियोजना यांसारख्या प्रदीर्घ काळ प्रलंबित प्रकल्पांची उदाहरणे त्यांनी दिली जे अनेक दशकांपासून प्रलंबित होते आणि सरकारने पूर्ण केले आहेत. पंतप्रधानांनी अटल बोगद्याकडे लक्ष वेधले, ज्याची पायाभरणी 2002 मध्ये झाली होती परंतु 2014 पर्यंत त्याचे काम अपूर्ण राहिले होते आणि विद्यमान सरकारने हे काम पूर्ण केले आणि 2020 मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी आसाममधील बोगीबिल पुलाचेही उदाहरण दिले, ज्याचे काम 1998 मध्ये सुरु झाले होते, मात्र 20 वर्षांनंतर 2018 मध्ये तो पूर्ण झाला तसेच इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 2008 मध्ये सुरू झाला परंतु त्याचे काम 15 वर्षांनंतर 2023 मध्ये पूर्ण झाले. “असे शेकडो प्रलंबित प्रकल्प विद्यमान सरकारने 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर पूर्ण केले आहेत,” असे ते पुढे म्हणाले.
प्रगतीअंतर्गत मोठ्या प्रकल्पांच्या नियमित देखरेखीचा प्रभावही पंतप्रधानांनी स्पष्ट केला आणि सांगितले की गेल्या 10 वर्षात 17 लाख कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा या यंत्रणेअंतर्गत आढावा घेण्यात आला आहे. अटल सेतू, संसद भवन, जम्मू एम्स, राजकोट एम्स, आयआयएम संबलपूर, त्रिची विमानतळाचे नवीन टर्मिनल, आयआयटी भिलाई, गोवा विमानतळ, लक्षद्वीपपर्यंत समुद्राखालील केबल, वाराणसी येथील बनास डेअरी, द्वारका सुदर्शन सेतू, बनास अशा काही प्रकल्पांची उदाहरणे पंतप्रधानांनी दिली जे जलद गतीने पूर्ण करण्यात आले. या सर्व प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती आणि त्यांनीच ते राष्ट्राला समर्पितही केले.
“जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती असते आणि करदात्यांच्या पैशाप्रति आदर असतो, तेव्हाच देश पुढे जातो आणि मोठी झेप घेण्यासाठी सज्ज होतो”, ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी केवळ एका आठवड्यातील उपक्रमांची यादी सांगून हे स्पष्ट केले. त्यांनी 20 फेब्रुवारीला जम्मू येथे आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी यासारख्या डझनभर उच्च शिक्षण संस्थांसह केलेल्या मोठ्या शैक्षणिक प्रगतीचा उल्लेख केला, 24 फेब्रुवारीला त्यांनी राजकोट येथे 5 एमआयएमचे लोकार्पण केले आणि आज सकाळी उद्घाटन केलेल्या 500 हून अधिक अमृत स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांसह इतर 2000 पेक्षा अधिक प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या तीन राज्यांच्या दौऱ्यात हाच आलेख कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. “पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रांतीमध्ये आपण मागे पडलो, आता चौथ्या क्रांतीमध्ये आपल्याला जगाचे नेतृत्व करायचे आहे”, पंतप्रधान म्हणाले.
त्यांनी देशाच्या प्रगतीचे तपशील सांगितले. दररोज 2 नवीन महाविद्यालये, दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ, दररोज 55 पेटंट आणि 600 ट्रेडमार्क, दररोज 1.5 लाख मुद्रा कर्ज, दररोज 37 स्टार्टअप्स, दररोज 16 हजार कोटी रुपयांचे युपीआय (UPI) व्यवहार, दररोज 3 नवीन जनऔषधी केंद्रे, दररोज 14 किमी रस्त्याचे बांधकाम, दररोज 50 हजार एलपीजी जोडणी, दर सेकंदाला एक पाण्याच्या नळाची जोडणी आणि दररोज 75 हजार लोक गरिबीतून बाहेर आले, असे तपशील त्यांनी दिले.
देशाच्या उत्पादन उपभोग पद्धतीच्या अलीकडील अहवालाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी हे सत्य अधोरेखित केले की देशात गरिबी आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच एक आकड्यावर आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ते म्हणाले की, एका दशकापूर्वीच्या तुलनेत उत्पादन उपभोगाचे प्रमाण 2.5 पट वाढले आहे, कारण लोकांची विविध वस्तू आणि सेवांवर खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. “गेल्या 10 वर्षांत, शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये वस्तूंचा खप खूप वेगाने वाढला आहे. याचा अर्थ खेड्यातील लोकांची आर्थिक ताकद वाढत आहे, खर्च करण्यासाठी त्यांच्या हातात जास्त पैसा उपलब्ध होत आहे,” ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, सरकारने ग्रामीण गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विकास केला आहे, परिणामी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी (संपर्क सक्षमता), महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी आणि उत्पन्न वाढले आहे. यामुळे ग्रामीण भारताचे सामर्थ्य वाढले आहे, ते म्हणाले. “भारतात प्रथमच अन्नावरील खर्च एकूण खर्चाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. याचा अर्थ, जे कुटुंब पूर्वी आपली सर्व शक्ती अन्न मिळवण्यात खर्च करत असे, आज त्याचे सदस्य इतर गोष्टींवरही पैसे खर्च करण्यासाठी सक्षम आहेत”, पंतप्रधान म्हणाले.
मागील सरकारने अवलंबलेल्या व्होट बँकेच्या राजकारणाच्या प्रवृत्तीकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, गेल्या 10 वर्षात भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून आणि विकासाचे फायदे सर्वांना सारख्याच प्रमाणात वितरित करून भारत टंचाईच्या मानसिकतेतून बाहेर पडला आहे.
“आम्ही टंचाईच्या राजकारणाऐवजी कानाकोपऱ्यातील वंचितांपर्यंत पोहोचण्यावर विश्वास ठेवतो”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही तुष्टीकरणाऐवजी लोकांना संतुष्ट करण्याचा मार्ग पत्करला आहे.” गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारचा हाच मंत्र राहिला आहे. हाच “सबका साथ सबका विकास आहे”, पंतप्रधान म्हणाले. सरकारने व्होट बँकेच्या राजकारणाचे रूपांतर कामगिरीच्या राजकारणात केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मोदींच्या गॅरंटीची गाडी याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान म्हणाले की, आजचे सरकार घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना सुविधा देत आहे. "जेव्हा सर्वांपर्यंत पोहोचणे, ही एक मोहीम बनते, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला जागा उरत नाही", पंतप्रधान म्हणाले.
“आमचे सरकार ‘देश सर्वप्रथम’ या तत्वाचे पालन करत पुढे जात आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली, आणि त्यांनी जुन्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला. कलम 370 रद्द करणे, राम मंदिराचे बांधकाम, तिहेरी तलाक समाप्त करणे, नारी शक्ती वंदन अधिनियम, वन रँक वन पेन्शन आणि संरक्षण दल प्रमुख पदाची निर्मिती, या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. अशी सर्व अपूर्ण कामे सरकारने ‘देश सर्वप्रथम’ या भावनेने पूर्ण केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी 21 व्या शतकातील भारताला सज्ज करण्याच्या गरजेवर भर दिला आणि वेगाने प्रगती करत असलेल्या योजनांवर प्रकाश टाकला. "अंतराळापासून, ते सेमीकंडक्टरपर्यंत, डिजिटलायझेशन पासून ते ड्रोनपर्यंत, कृत्रिम बुद्धीमत्तेपासून ते स्वच्छ ऊर्जा, 5G पासून ते फिनटेकपर्यंत, भारत आज जगात आघाडीवर पोहोचला आहे", ते म्हणाले. जगात डिजिटल पेमेंटमधील सर्वात मोठी ताकद म्हणून भारताच्या वाढत्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला, तसेच फिनटेक स्वीकारण्यात सर्वात वेगाने पुढे जाणारा देश, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारा पहिला देश, 5G नेटवर्कच्या विस्तारात युरोपला मागे टाकणारा देश, सौर स्थापित क्षमतेमध्ये जगातील आघाडीच्या देशांमध्ये स्थान, आणि हरित हायड्रोजन सारख्या भविष्यातील इंधनाच्या क्षेत्रात जलद प्रगती, या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, “आज भारत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. भारत भविष्यवादी आहे. आज प्रत्येकजण म्हणतो, भारत हेच भविष्य आहे.” पुढील पाच वर्षे महत्वाची आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताच्या क्षमता नव्या उंचीवर नेण्याच्या विश्वासाचा त्यांनी पुनरुच्चार केला. पुढील पाच वर्षे प्रगतीची असतील असा विश्वास व्यक्त करून, त्यांनी भारताच्या ‘विकसित भारताच्या’ वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अगर आज दुनिया को लगता है कि भारत एक बड़ा लीप लेने के लिए तैयार है, तो उसके पीछे 10 साल का एक पावरफुल लॉन्चपैड है: PM @narendramodi pic.twitter.com/xISt7XKmsN
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
आज 21वीं सदी के भारत ने छोटा सोचना छोड़ दिया है।
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
आज हम जो करते हैं, वो Best और Biggest होता है: PM @narendramodi pic.twitter.com/taHqD35nVy
भारत के लोगों का सरकार और व्यवस्था पर भरोसा बढ़ रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/VsdK9Cx6vc
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
आज 21वीं सदी के भारत ने छोटा सोचना छोड़ दिया है।
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
आज हम जो करते हैं, वो Best और Biggest होता है: PM @narendramodi pic.twitter.com/taHqD35nVy
भारत के लोगों का सरकार और व्यवस्था पर भरोसा बढ़ रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/VsdK9Cx6vc
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
सरकार के दफ्तर आज समस्या नहीं, देशवासियों के सहयोगी बन रहे हैं: PM @narendramodi pic.twitter.com/ldvBMG94Tc
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
भ्रष्टाचार पर लगाम लगाकर हमने ये सुनिश्चित किया है कि विकास का लाभ भारत के हर क्षेत्र को समान रूप से दिया जाए: PM @narendramodi pic.twitter.com/F9bkkBXZP5
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
भ्रष्टाचार पर लगाम लगाकर हमने ये सुनिश्चित किया है कि विकास का लाभ भारत के हर क्षेत्र को समान रूप से दिया जाए: PM @narendramodi pic.twitter.com/F9bkkBXZP5
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
हमारी सरकार Nation First के सिद्धांत को सर्वोपरि रखते हुए आगे बढ़ रही है: PM @narendramodi pic.twitter.com/MFoADsERXM
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
21वीं सदी के भारत को अपने आने वाले दशकों के लिए भी हमें आज ही तैयार करना होगा: PM @narendramodi pic.twitter.com/Nz5fmKvY5d
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024
India is the Future. pic.twitter.com/bmgfDu8T3M
— PMO India (@PMOIndia) February 26, 2024