पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजना आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ सुरू केली. त्यांनी पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्जे जारी केली आणि पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत वर्षभरातील प्रगतीचे प्रतीक म्हणून समर्पित तिकिटाचे अनावरणदेखील केले. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपरेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली.यावेळी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या विश्वकर्मा पूजा सोहळ्याचे स्मरण करून सांगितले की, आज वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त सोहोळा साजरा होत आहे. महात्मा गांधी यांनी याच दिवशी 1932 मध्ये अस्पृश्यतेविरुद्ध मोहीम सुरू केली होती त्यामुळे आजचा दिवस खास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विनोवा भावे यांचे साधनास्थळ आणि महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्ध्यात पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून होणारा सोहोळा म्हणजे विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेताना लागणाऱ्या नव्या उर्मीसाठी यश आणि प्रेरणा यांचा संगम आहे असे त्यांनी उद्धृत केले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सरकारने कौशल्य विकास आणि ‘श्रम ते समृद्धी’ या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संकल्प केला आहे आणि महात्मा गांधींचे आदर्श हे संकल्प सिद्धीचे माध्यम बनतील, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.
आज पीएम मित्र पार्कची पायाभरणी करण्यात आली हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी आजचा भारत आपल्या वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेच्या शिखरावर नेण्यासाठी कार्यरत आहे यावर प्रकाश टाकला. भारतातील वस्त्रोद्योगाला गत शतकांचे वैभव आणि मान्यता मिळवून देणे हे भारताचे लक्ष्य आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमरावती येथील पीएम मित्र पार्क हे या दिशेने आणखी एक मोठे पाऊल असल्याचे मोदींनी नमूद केले. या यशाबद्दल त्यांनी अमरावतीवासीयांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातील वर्धा हे ठिकाण पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनासाठी निवडण्यात आले कारण हा फक्त एक सरकारी कार्यक्रम नसून भारताला विकसित देश बनवण्याच्या वाटचालीत वर्षानुवर्षांची जुनी परंपरागत कौशल्ये उपयोगात आणण्याची ही योजना आहे, हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणले. आपली जुनी परंपरागत कौशल्ये भारताच्या समृद्धीच्या अनेक गौरवशाली अध्यायांचा आधार असल्याचे सांगून आपली कला, अभियांत्रिकी, विज्ञान आणि धातूविज्ञान संपूर्ण जगात अतुलनीय आहे असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.आपण जगातील सर्वात मोठे वस्त्र उत्पादक होतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्या कुंभारकलेशी आणि प्राचीन काळातील इमारतींच्या बांधकामांशी कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते. सुतार, लोहार, सोनार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, बांधकाम-गवंडी आणि असे अनेक व्यावसायिक भारताच्या समृद्धीचा पाया होते आणि त्यांनी हे ज्ञान आणि शास्त्र प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले, असे त्यांनी सांगितले. भारताचे हे स्वदेशी कौशल्य हिरावून घेण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक कारस्थाने रचली, वर्ध्याच्या या भूमीतूनच गांधीजींनी ग्रामीण उद्योगांना नवप्रेरणा दिली, असे ते म्हणाले. मात्र स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या लागोपाठच्या सरकारांनी देशातील या कौशल्याला योग्य तो सन्मान दिला नाही, हे या देशाचे दुर्दैव सांगत त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली. तत्कालीन सरकारांनी हस्तकला आणि कौशल्य यांना योग्य सन्मान न देता विश्वकर्मा समुदायाकडे दुर्लक्ष केले, परिणामी भारत प्रगती आणि आधुनिकतेच्या स्पर्धेत मागे पडत गेला, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षांच्या कालखंडानंतर विद्यमान सरकारने या पारंपरिक कौशल्याला नवीन ऊर्जा देण्याचा संकल्प केला आहे, 'सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी' हे पीएम विश्वकर्मा योजनेला चालना देणारे मूलतत्व आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पारंपरिक हस्तकलेचा सन्मान, कारागिरांचे सक्षमीकरण आणि विश्वकर्मांची समृद्धी हे आपले उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशस्वीतेसाठी विविध विभाग मोठ्या प्रमाणावर अभूतपूर्व सहयोग देत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. या योजनेला गती देण्यासाठी 700 हून अधिक जिल्हे, 2.5 लाख ग्राम पंचायती, 5000 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था योगदान देत आहेत, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी 18 प्रकारच्या विविध पारंपरिक कौशल्यांशी निगडित 20 लाखांहून अधिक लोक पीएम विश्वकर्मा योजनेशी जोडले गेले आहेत. तर 8 लाखांहून अधिक कारागिरांना अत्याधुनिक साधने आणि डिजिटल उपकरणांच्या मदतीने कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. एकट्या महाराष्ट्रातच 60,000 हून अधिक जणांना कौशल्य प्रशिक्षण लाभले आहे. सहा लाखांहून अधिक विश्वकर्मांना त्यांची उत्पादकता आणि उत्पादनाच्या गुणवत्ता वृद्धीसाठी 15,000 रुपयांचे ई व्हाउचर, आधुनिक उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत तसेच त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. विश्वकर्मांना एका वर्षात 1400 कोटी रुपयांची कर्जे वितरित केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
पारंपरिक कौशल्याच्या बाबतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाचे योगदान लक्षात घेऊन पंतप्रधानांनी याआधीच्या सरकारांनी त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल खेद व्यक्त केला आणि या मागासवर्गीय विरोधी मानसिकतेला सध्याच्या सरकारने पूर्णविराम दिला आहे असे सांगितले.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाज, विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ घेत आहे असे त्यांनी आधीच्या वर्षातील आकडेवारीचा आधार घेऊन सांगितले. विश्वकर्मा समुदायातील लोकांनी केवळ कारागीर न राहता उदयोजक आणि व्यावसायिक बनावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि विश्वकर्मांनी केलेल्या कामाला एमएसएमई चा दर्जा देण्याची तयारी दर्शवली. विश्वकर्मांना मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळीचा एक भाग बनवण्यासाठी पारंपारिक उत्पादने विकली जात असलेल्या एक जिल्हा एक उत्पादन आणि एकता मॉल यांसारख्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.
विश्वकर्मांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ONDC, GeM, इत्यादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा त्यांनी उल्लेख केला. आतापर्यंत आर्थिक प्रगतीमध्ये मागे पडलेला सामाजिक वर्ग आता जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे ते म्हणाले. "कौशल्य विकास मोहीम याला आणखी मजबूत करत आहे" कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत देशातील कोट्यवधी युवकयुवतींना आजच्या युगाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य प्रदान करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
स्किल इंडियासारख्या कार्यक्रमांमुळे भारताच्या कौशल्यांची जगाला ओळख होत आहे हे अधोरेखित करून पंतप्रधान मोदी यांनी अभिमानाने सांगितले की यंदा फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कौशल्यविषयक जागतिक कार्यक्रमात भारताला अनेक पुरस्कार मिळाले.
“महाराष्ट्रात कापड उद्योगात मोठ्या औद्योगिक शक्यता आहेत,” यावर पंतप्रधानांनी भर दिला. विदर्भ हे उच्च दर्जाच्या कापसाचे मोठे केंद्र आहे. मात्र, एकामागोमाग आलेल्या सरकारांनी शेतकऱ्यांच्या नावे क्षुद्र राजकारण व भ्रष्टाचार करून कापूस शेतकऱ्याना दुःखाच्या खाईत लोटले, असे ते म्हणाले. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी वेगाने काम सुरू झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिथे एकही उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक नव्हता अशा भागात अमरावतीत नांदगाव खांडेश्वर इथे कापड संकुल उभारण्यात आले. आज हे संकुल महाराष्ट्राचे मोठे औद्योगिक केंद्र म्हणून यशस्वीरित्या विकसित होत आहे.
पीएम मित्र पार्कच्या कामाच्या गतीचा उल्लेख करून मोदी यांनी टिप्पणी केली की डबल इंजिन सरकारची इच्छाशक्ती त्यातून दिसून येते. “अशी सात पीएम मित्र पार्क देशभरात उभारण्यात येतील,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन म्हणजेच शेतातून सूत, सुतापासून कापड, कापडापासून फॅशन आणि ती फॅशन परदेशी पाठवण्याचे चक्र या दृष्टिकोनात सामावले आहे, विदर्भातील कापसापासून उच्च दर्जाचे कापड बनवून त्या कापडाचे अद्ययावत फॅशनचे कपडे शिवून ते परदेशी निर्यात केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या नुकसानाची भरपाई होण्यास मदत होईल आणि मू्ल्यवर्धित उत्पादनामुळे त्यांच्या पिकाला चांगला दर मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एकट्या पीएम मित्र पार्कमध्ये 8 ते 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीची शक्यता असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यामुळे एक लाखाहून अधिक रोजगाराच्या नव्या संधी विदर्भासह महाराष्ट्रातील युवांना उपलब्ध होतील आणि इतर उद्योगांनाही चालना मिळेल. नव्या पुरवठा साखळ्या निर्माण केल्या जातील व त्यांच्यामार्फत देशाची निर्यात वाढून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून सांगितले की औद्योगिकीकरणासाठी आवश्यक आधुनिक पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा महाराष्ट्रात विकसित होत आहेत. त्यामध्ये नवे महामार्ग, द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग यांच्यासह जलमार्ग व हवाई मार्गांमध्येही भर पडते आहे.“नव्या औद्योगिक क्रांतीसाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे,” असे उद्गार मोदी यांनी काढले.
राज्याच्या बहुआयामी प्रगतीतल महाराष्ट्रातील शेतकऱ्याची भूमिका दखलपात्र असल्याचे सांगून शेतकऱ्याच्या आनंदाशी राष्ट्राच्या समृद्धीचा जवळून संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी एकत्रित काम करण्यास वचनबद्ध आहे. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले आणि महाराष्ट्र सरकारने त्यात तेवढ्याच रकमेची भर घालून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 12,000 रुपये केले, अशी महत्त्वपूर्ण पावले सरकारने उचलल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. फक्त एक रुपयात पीक विमा देण्याचा उपक्रम सुरू केल्याचे आणि शेतकऱ्यांना वीज बिलातून माफी दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रादेशिक सिंचनाच्या आव्हानांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विद्यमान सरकारने मागच्या कारकीर्दीत सुरू केलेल्या प्रयत्नांना मधल्या काळातील प्रशासनामुळे विलंब झाल्याचे सांगितले. विद्यमान राज्य सरकारने अनेक प्रकल्प पुनरुज्जीवित केले असून त्यांना गती दिल्याची माहिती आज पंतप्रधानांनी दिली. अलिकडे मंजुरी मिळालेल्या 85,000 कोटी रुपये खर्चाच्या वन-गंगा आणि नळ-गंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमधील 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे”, असे नमूद करून, या प्रदेशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या उद्देशाने, कांद्यावरील निर्यात करात 40% वरून 20% टक्के इतकी कपात करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. खाद्यतेलाच्या आयातीमुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान कमी करण्यासाठी केलेल्या उपायांबद्दल बोलताना ते म्हणाले, "आम्ही खाद्यतेलाच्या आयातीवर 20% कर लागू केला असून, रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील सीमाशुल्कात 12.5% वरून 32.5% टक्के इतकी वाढ केली आहे." ते पुढे म्हणाले की, या निर्णयाचा विशेषतः महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांना विशेष लाभ मिळेल. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम कृषी क्षेत्रात लवकरच दिसून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी खोट्या आश्वासनांना बळी पडण्यापासून सावध रहावे, असे सांगून त्यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचा उल्लेख केला, जे आजही कर्जमाफीसाठी संघर्ष करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सावध रहावे, आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
समाजात फूट पाडू पाहणाऱ्या आणि परदेशातील भूमीवर भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अपमान करणाऱ्या शक्तींपासूनही सावध रहावे, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखालील गणेशोत्सव हा भारतातील एकतेचा सण बनला होता, जिथे समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करत होते, असे त्यांनी स्मरण केले. नागरिकांनी परंपरा आणि प्रगतीची कास धरून देशाचा सन्मान आणि विकास वृद्धिंगत करावा, असे आवाहन त्यांनी केले. “आपण एकत्र येऊन महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करूया आणि त्याचा अभिमान वाढवूया. आपण महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण करूया”, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
कार्यक्रमादरम्यान,पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कर्ज जारी केले.या योजनेंतर्गत कारागिरांना दिलेल्या पाठबळाचे मूर्त प्रतीक म्हणून, त्यांनी 18 व्यापारांतर्गत 18 लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा योजेने अंतर्गत कर्ज वितरित केले. त्यांचा वारसा आणि सातत्त्यपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत गेल्या एक वर्षात केलेल्या प्रगतीनिमित्त विशेष स्मृती टपाल तिकीट जारी केले.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रात अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन एंड अपेरल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून 1000 एकर क्षेत्रावर हे पार्क विकसित करत आहे.
भारत सरकारने वस्त्रोद्योगासाठी 7 पीएम मित्र पार्क उभारायला मान्यता दिली आहे. भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने पीएम मित्र पार्क हे एक महत्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करायला सहाय्य करणार असून, तो परदेशी थेट गुंतवणुकीसह (FDI) मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आकर्षित करेल आणि या क्षेत्रातील नवोन्मेश आणि रोजगार निर्मितीला चालना देईल.
पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारच्या ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजनेचा शुभारंभ केला. या अंतर्गत 15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यभरातील सुमारे 1,50,000 युवकांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.
पंतप्रधानांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही’ शुभारंभ केला. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात मदत पुरवली जाईल. ₹25 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. सरकारने निर्देश दिल्यानुसार,या योजनेच्या एकूण तरतुदींपैकी 25% तरतुदी मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांसाठी राखीव असतील.महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपना आत्मनिर्भर आणि स्वतंत्र बनायला ते सहाय्य करेल.
Click here to read full text speech
विश्वकर्मा योजना के जरिए श्रम से समृद्धि का, कौशल से बेहतर कल का संकल्प... pic.twitter.com/mlGKtj92qS
— PMO India (@PMOIndia) September 20, 2024
आज का भारत अपनी टेक्सटाइल इंडस्ट्री को वैश्विक बाज़ार में टॉप पर ले जाने के लिए काम कर रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/i95wbq7Ril
— PMO India (@PMOIndia) September 20, 2024
विश्वकर्मा योजना भारत के हजारों वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिए इस्तेमाल करने का एक रोडमैप है। pic.twitter.com/VmaGXE1EvA
— PMO India (@PMOIndia) September 20, 2024
विश्वकर्मा योजना की मूल भावना है- सम्मान, सामर्थ्य और समृद्धि! pic.twitter.com/vWhroRAL6T
— PMO India (@PMOIndia) September 20, 2024
देश भर में 7 पीएम मित्र पार्क... pic.twitter.com/jNYSIXtUOu
— PMO India (@PMOIndia) September 20, 2024