हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक रचना (IPEF) याविषयी चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी जपानमध्ये टोकियो येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ हेही यावेळी उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, कोरियन प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, आणि व्हिएतनाम हे अन्य भागीदार देशही यावेळी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.
IPEF मध्ये अंतर्भूत असणारे महत्त्वाचे घटक अधोरेखित करणारे एक संयुक्त निवेदन यावेळी जारी करण्यात आले.
हिंद प्रशांत क्षेत्रात चिरंतनता, शाश्वतता, सर्वसमावेशकता, आर्थिक वृद्धी, न्यायोचितता, आणि स्पर्धात्मकता यांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने, सहभागी देशांची आर्थिक भागीदारी बळकट करण्याचा प्रयत्न IPEF च्या माध्यमातून होत आहे.
IPEF ची उद्घोषणा म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रास जागतिक आर्थिक वृद्धीचे इंजिन म्हणून पुढे आणण्याच्या सामूहिक इच्छेचे प्रतिबिंब होय, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात काढले. गुजरातमध्ये लोथल येथे जगातील सर्वात प्राचीन व्यापारी बंदर असणारा भारत, इतिहासकाळापासूनच हिंद-प्रशांत क्षेत्रातील व्यापाराच्या ओघाच्या केंद्रस्थानी आहे, असेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी सामायिक आणि सृजनात्मक विचार करून क्लृप्त्या लढवण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
सर्वसमावेशक आणि लवचिक अशा IPEF साठी, हिंद-प्रशांत क्षेत्रातील सर्व देशांसोबत काम करण्यास भारत वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. टिकाऊ आणि बळकट पुरवठा साखळ्या निर्माण करण्यासाठी विश्वास (Trust), पारदर्शकता(Transparency) आणि समयोचितता (Timeliness)यांचा पाया महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले.
मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशी अशा हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी भारत वचनबद्ध असून, सातत्यपूर्ण विकासासाठी तसेच शांतता आणि समृद्धीसाठी, भागीदारांतील आर्थिक देवघेव अत्यंत महत्त्वाची असते. IPEF अंतर्गत भागीदार देशांशी सहयोग वाढवण्याबाबत आणि प्रादेशिक आर्थिक कनेक्टिव्हीटी, एकात्मता वाढवण्याबाबत तसेच, प्रदेशात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याबाबत भारत ठाम आहे.
IPEF प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेचा आज प्रारंभ झाल्यामुळे, भागीदार देशांना आता आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी व सामायिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी चर्चा आणि विचारविनिमय सुरु करता येतील.