पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर येथे ऐतिहासिक गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केले आणि चित्रमय शिव पुराण ग्रंथाचे प्रकाशन केले. गीता प्रेसमधील लीला चित्र मंदिराला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि भगवान श्री रामाच्या तसबिरीला फुले वाहून वंदन केले.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले की श्रावणाच्या या पवित्र महिन्यात आणि इंद्रदेवाच्या कृपेने गोरखपूरच्या गीता प्रेसमध्ये उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाली आहे जे शिव अवतार गुरू गोरखनाथ यांच्या पूजेचे आणि अनेक संतांच्या साधनेचे स्थान आहे. आपल्या गोरखपूरच्या भेटीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की विकास आणि वारसा एकत्रितपणे कशी वाटचाल करतात याचे हे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. गीता प्रेसचा कार्यक्रम झाल्यानंतर गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी आणि वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना झेंडा दाखवून रवाना करण्यासाठी ते जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या छायाचित्रांनी देखील नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे, असे देखील त्यांनी सांगितले. वंदे भारत एक्सप्रेसचा उल्लेख करताना ते म्हणाले की या रेल्वेगाड्यांनी मध्यमवर्गाच्या सुविधांचा स्तर उंचावला आहे. आपल्या भागांमध्ये रेल्वेगाडीला थांबा मिळावा म्हणून मंत्र्यांना पत्रव्यवहार करावा लागत होता त्या काळाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की आता मंत्री आपल्या भागातून वंदे भारत सुरू करण्यासाठी पत्र लिहीत आहेत.
वंदे भारत ट्रेनची आवड निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी यावेळी गोरखपूरच्या आणि भारतीय जनतेचे आजच्या प्रकल्पांसाठी अभिनंदन केले.
“गीता प्रेस हा केवळ एक छापखाना नाही तर ती एक जिवंत श्रद्धा आहे”, कोट्यवधी लोकांसाठी एखाद्या पूज्य स्थानापेक्षा ते कमी नाही याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान म्हणाले. गीतेसोबत कृष्ण येतो आणि कृष्णासोबत करुणा व कर्म येते आणि याबाबत शास्त्रीय संशोधनाबरोबरच ज्ञानाची देखील भावना आहे, असे त्यांनी सांगितले. गीतेमधील श्लोकाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की ‘वासुदेवः सर्वम्’ म्हणजेच सर्व काही वासुदेवापासून आणि वासुदेवामध्ये आहे.
गीता प्रेसच्या रुपात 1923 मध्ये प्रज्वलित झालेली हा आध्यात्मिक ज्योत आज संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक प्रकाश बनला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या मानवतावादी मिशनच्या शताब्दीचे साक्षीदार होता आले,हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान म्हणाले, केंद्र सरकारने गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार जाहीर केला. गीता प्रेसशी महात्मा गांधींच्या भावनिक बंधांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की, गांधीजी एकेकाळी कल्याण पत्रिकेच्या माध्यमातून गीता प्रेससाठी लिहायचे. कल्याण पत्रिकेत जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, अशी सूचना गांधीजींनीच केली होती आणि त्या सूचनेचे आजही पालन केले जात आहे असे पंतप्रधान म्हणाले. देशाने गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला, हा गीता प्रेसचे योगदान आणि तिच्या 100 वर्षे जुन्या वारशाचा सन्मान आहे असे ते म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, या 100 वर्षांत गीता प्रेसने कोट्यवधी पुस्तके प्रकाशित केली आहेत जी मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत विकली गेली आणि घरोघरी पोहोचवली गेली. ज्ञानाच्या या प्रवाहाने अनेक वाचक दिले त्याच वेळी समाजासाठी अनेक समर्पित नागरिक निर्माण केले याबाबत त्यांनी आत्मिक आणि बौद्धिक समाधान व्यक्त केले. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय या यज्ञामध्ये निस्वार्थपणे योगदान आणि सहकार्य दिलेल्या व्यक्तिमत्त्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि सेठजी जयदयाल गोयंदका आणि भाईजी श्री हनुमान प्रसाद पोद्दार यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहिली.
गीता प्रेससारखी संस्था केवळ धर्म आणि कर्माशी निगडित नसून तिचे एक राष्ट्रीय चरित्रही आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "गीता प्रेस भारताला जोडते, भारताची एकता अधिक बळकट करते " असे सांगून मोदी यांनी तिच्या देशभरातील 20 शाखांची माहिती दिली. देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर गीता प्रेसचे स्टॉल तुम्हाला दिसतील असे पंतप्रधानांनी नमूद केले. गीता प्रेस 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये 1600 पुस्तके प्रकाशित करते आणि भारताचे मूलभूत विचार विविध भाषांमधून जनतेपर्यंत पोहोचवते, अशी माहिती त्यांनी दिली. गीता प्रेस एक प्रकारे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेचे प्रतिनिधित्व करते, असे ते म्हणाले.
देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना गीता प्रेसने 100 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे हा योगायोग नाही, असे पंतप्रधानांनी नमूद केले. 1947 पूर्वीच्या काळाचा त्यांनी उल्लेख केला जेव्हा भारताने आपल्या पुनर्जागरणासाठी विविध क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले. पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी विविध संस्था उदयाला आल्या. परिणामी, 1947 पर्यंत भारत मनाने आणि आत्म्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता. त्यासाठी गीता प्रेसची स्थापना ही मोठा आधार बनल्याचे त्यांनी नमूद केले . अनेक शतकांच्या गुलामगिरीने शंभर वर्षांपूर्वी भारताच्या चैतन्याला कलंकित केले आणि परकीय आक्रमकांनी भारतातील ग्रंथालये जाळली होती त्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. “ब्रिटिश काळात गुरुकुल आणि गुरु परंपरा जवळपास नष्ट झाली होती असे ते म्हणाले. भारताचे पवित्र ग्रंथ गायब होण्याची सुरुवातही त्याचवेळी झाली कारण त्यावेळी किंमती जास्त असल्यामुळे छापखाने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. गीता आणि रामायणाशिवाय आपला समाज कसा चालेल? जेव्हा मूल्ये आणि आदर्शांचे स्त्रोत कमी होऊ लागतात तेव्हा समाजाचा प्रवाह देखील आपोआप थांबतो”, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
जेव्हा जेव्हा अधर्म आणि दहशत प्रबळ झाले आणि सत्याभोवती धोक्याचे ढग गडद झाले तेव्हा भगवद्गीता नेहमीच प्रेरणास्त्रोत बनली यावर पंतप्रधानांनी भर दिला.
जेव्हा धर्म आणि सत्याच्या अधिकारवाणीविषयी वाद निर्माण होतो तेव्हा देव त्यांचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर प्रकट होतो, असे पंतप्रधानांनी गीतेचा दाखला देत स्पष्ट केले. ईश्वर कोणत्याही स्वरूपात प्रकट होतो हे त्यांनी गीतेच्या दहाव्या अध्यायाचा संदर्भ देत सांगितले. कधी कोणी संत नवी दिशा दाखवतात तर कधी गीता प्रेससारख्या संस्था मानवी मूल्ये आणि आदर्शांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्थापन केल्या जातात असे ते म्हणाले. गीता प्रेस 1923 मध्ये स्थापन झाली. स्थापनेनंतर लगेचच या संस्थेने भारतासाठी चैतन्य आणि चिंतनाच्या प्रवाहाला गती दिली असे मत त्यांनी व्यक्त केले. गीतेसह आपले धर्मग्रंथ पुन्हा एकदा प्रत्येक घराघरात वाचले जाऊ लागले आणि आपली मने भारताच्या हृदयाशी एकरूप झाली असे त्यांनी सांगितले. “कौटुंबिक परंपरा आणि नवीन पिढ्या या पुस्तकांशी जोडल्या जाऊ लागल्या आणि आपली पवित्र पुस्तके पुढच्या पिढ्यांसाठी आधार बनू लागली”, असे ते पुढे म्हणाले.
“आपले हेतू शुद्ध असतील, आपली मूल्ये प्रामाणिक असतील तर यश त्याच्याशी समानार्थी बनते याचा गीता प्रेस हा पुरावा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गीता प्रेस ही संस्था म्हणून नेहमीच सामाजिक मूल्ये समृद्ध करत लोकांना कर्तव्याचा मार्ग दाखवत असल्याचे त्यांनी विशद केले. गंगा नदीची स्वच्छता, योगशास्त्र, पतंजली योग सूत्राचे प्रकाशन, आयुर्वेदाशी संबंधित 'आरोग्य अंक', भारतीय जीवनशैलीविषयीचा 'जीवनाचार्य अंक', समाजसेवेच्या आदर्शांची ओळख करून देण्यासाठी 'सेवा अंक' आणि 'दान महिमा' ही उदाहरणे पंतप्रधांनांनी दिली. “या सर्व प्रयत्नांमागे देशसेवेची प्रेरणा जोडलेली आहे आणि राष्ट्र घडवण्याचा संकल्प आहे”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
“संतांची तपश्चर्या कधीच निष्फळ ठरत नाही, त्यांचे संकल्प कधीच पोकळ नसतात!”, असे मोदी यांनी सांगितले. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता आणि आपल्या परंपरेचा अभिमान याविषयी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान म्हणाले की, विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन देश पुढे जात आहे. एकीकडे भारत डिजिटल तंत्रज्ञानात नवनवीन विक्रम करत आहे, त्याचवेळी काशी कॉरिडॉरच्या पुनर्विकासानंतर काशीतील विश्वनाथ धामचे दिव्य रूपही समोर आले आहे. केदारनाथ आणि महाकाल महालोक यांसारख्या तीर्थक्षेत्रांच्या भव्यतेविषयी सांगतानाच पंतप्रधानांनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा उल्लेख केला. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्नही शतकांनंतर पूर्ण होणार आहे याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची खूण दर्शविणाऱ्या नवीन नौदल चिन्हाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. कर्तव्याच्या भावनेला प्रेरणा देण्यासाठी राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ, आदिवासी परंपरा आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी देशभरातील संग्रहालये विकसित करणे तसेच चोरीला गेलेल्या आणि देशाबाहेर पाठवलेल्या पवित्र प्राचीन मूर्तींचा जीर्णोद्धार ही उदाहरणे त्यांनी दिली.
भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, विकसित आणि आध्यात्मिक भारताची कल्पना आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिली होती आणि आज ती सार्थ होताना दिसत आहे. आपल्या संत आणि ऋषीमुनींची अध्यात्म साधना भारताच्या सर्वांगीण विकासासाठी अशीच ऊर्जा देत राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “आम्ही एक नवीन भारत घडवू आणि आमचे विश्व कल्याणाचे स्वप्न यशस्वी करू”, असे ते म्हणाले.
यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोरखपूरचे खासदार रवि किशन, गीता प्रेसच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष केशोराम अग्रवाल आणि सरचिटणीस विष्णू प्रसाद चंदगोठिया उपस्थित होते
गीता प्रेस विश्व का ऐसा इकलौता प्रिंटिंग प्रेस है, जो सिर्फ एक संस्था नहीं है बल्कि, एक जीवंत आस्था है। pic.twitter.com/zuibgq4YEL
— PMO India (@PMOIndia) July 7, 2023
1923 में गीता प्रेस के रूप में यहाँ जो आध्यात्मिक ज्योति प्रज्ज्वलित हुई, आज उसका प्रकाश पूरी मानवता का मार्गदर्शन कर रहा है। pic.twitter.com/FgIUibxFl3
— PMO India (@PMOIndia) July 7, 2023
गीता प्रेस, भारत को जोड़ती है, भारत की एकजुटता को सशक्त करती है। pic.twitter.com/ijJE1elNkf
— PMO India (@PMOIndia) July 7, 2023
गीताप्रेस इस बात का भी प्रमाण है कि जब आपके उद्देश्य पवित्र होते हैं, आपके मूल्य पवित्र होते हैं तो सफलता आपका पर्याय बन जाती है। pic.twitter.com/JvvrOGDUSa
— PMO India (@PMOIndia) July 7, 2023
ये समय गुलामी की मानसिकता से मुक्त होकर अपनी विरासत पर गर्व करने का समय है: PM @narendramodi pic.twitter.com/wzUepAqoYe
— PMO India (@PMOIndia) July 7, 2023