पलाशबरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील एका पुलाची आणि रंग घर शिवसागर सुशोभीकरणाच्या प्रकल्पाची केली पायाभरणी
नामरुप येथे 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे केले उद्घाटन
पाच रेल्वे प्रकल्पांचे केले राष्ट्रार्पण
10,000 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याचा घेतला आनंद
“ हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे आहे. हे विलक्षण आहे. हे आसाम आहे”
“अखेर आसाम ए-वन राज्य बनत आहे”
“प्रत्येक भारतीयाची चेतना या देशाची माती आणि परंपरांमधून निर्माण झाली आहे आणि हाच विकसित भारताचा पायादेखील आहे”
“रोंगाली बिहू हा आसामच्या जनतेचे मन आणि आत्मा यांचा सण आहे”
“विकसित भारत हे आमचे सर्वोच्च स्वप्न आहे”
“आज कनेक्टिविटी चार घटकांचा महायज्ञ आहे, भौतिक कनेक्टिविटी, डिजिटल कनेक्टिविटी, सामाजिक कनेक्टिविटी आणि सांस्कृतिक कनेक्टिविटी
“ईशान्येमधील अविश्वासाचे वातावरण आता दूर जात आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सारुसजाई स्टेडियममध्ये 10,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये पलाशभरी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी, शिवसागरमध्ये रंगघरच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प यांची पायाभरणी, नामरुप येथील 500 टीपीडी मेन्थॉल प्रकल्पाचे उद्घाटन यांचा समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी दहा हजारांपेक्षा जास्त बिहू नर्तकांचा सहभाग असलेल्या बिहू नृत्याच्या रंगतदार सादरीकरणाचा देखील आनंद घेतला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की ज्यांनी कोणी आजचा अतिभव्य कार्यक्रम पाहिला असेल तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात हा अनुभव विसरू शकणार नाही. “ हे सर्व कल्पनेच्या पलीकडचे आहे. हे उल्लेखनीय आहे. हे आसाम आहे”, पंतप्रधान म्हणाले.    “ ढोल, पेपा आणि गोगोनांचा आवाज आज संपूर्ण भारतभर ऐकू गेला असेल. आसामच्या हजारो कलाकारांचे प्रयत्न आणि ताळमेळ संपूर्ण देशाबरोबरच संपूर्ण जग अतिशय अभिमानाने पाहात आहे”, पंतप्रधानांनी सांगितले. या प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी या कलाकारांचा जोश आणि उत्साहाची प्रशंसा केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी या राज्याला दिलेल्या भेटीची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. त्यावेळी त्यांनी लोकांना ए फॉर आसाम असे म्हटले जाईल, असे सांगितले होते आणि आता अखेर हे राज्य ए-वन राज्य बनू लागले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी आसाम आणि देशातील जनतेला बिहू सणाच्या शुभेच्छा दिल्या.

 

बैसाखीचा सण पंजाबसह उत्तर भारतीय राज्यांमध्ये साजरा केला जातो. तर बंगाली लोक पोईला बैसाख साजरा करतात. केरळमध्ये विशू साजरा केला जाईल. हे जे सण साजरे केले जात आहेत ते एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना प्रतिबिंबित करतात आणि सबका प्रयासने होणाऱ्या विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी प्रेरणा देतात. एम्स, तीन वैद्यकीय महाविद्यालये, रेल्वे प्रकल्प, ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल आणि मेन्थॉल प्रकल्प आणि रंग घरचा पुनर्विकास आणि सुशोभीकरण प्रकल्प यांसह आजच्या विविध प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या संस्कृतीचे जतन करत असल्याबद्दल त्यांनी आसामच्या जनतेची प्रशंसा केली  आणि आज त्यांनी सादर केलेल्या अतिशय भव्य कार्यक्रमाचे कौतुक केले.“ आपले सण केवळ सांस्कृतिक समारंभ नसून ते सर्वांची एकजूट करण्याचे आणि पुढे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देण्याचे माध्यम देखील आहेत”, पंतप्रधान म्हणाले.” रोंगाली बिहू हा आसामच्या जनतेचे मन आणि आत्म्याचा सण आहे. तो मतभेद दूर करतो आणि मानव आणि निसर्ग यांच्यातील तादात्म्याचे अतिशय योग्य प्रतीक  आहे”, पंतप्रधानांनी सांगितले. 

 

प्रत्येक भारतीयाला एकत्र ठेवण्याचे काम हजारो वर्षांपासून करणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्या भारताचे वैशिष्ट्य आहेत, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. गुलामगिरीच्या काळ्या कालखंडाच्या विरोधात देशाने एकजुटीचे दर्शन घडवले आणि भारताची संस्कृती आणि वारसा यावरील अनेक आघात सोसले, असे त्यांनी नमूद केले.अनेक सत्ता आणि राज्यकर्ते आले आणि निघून गेले ज्यांचा अनुभव भारताने घेतला परंतु या सर्व बदलांमध्येही भारत अविचल राहिला यावर त्यांनी भर दिला.

“ प्रत्येक भारतीयाची चेतना या देशाची माती आणि परंपरांमधून निर्माण झाली आहे आणि हाच विकसित भारताचा पायादेखील आहे”, पंतप्रधानांनी नमूद केले.

नामवंत लेखक आणि  चित्रपट निर्माते ज्योती प्रसाद अगरवाला यांच्या बिस्व बिजॉय नोजोवान या गाण्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की हे गीत आसामच्या युवा वर्गासाठी आणि संपूर्ण भारतासाठी प्रेरणा स्रोत बनले आहे. मोदी यांनी या गीताचा उल्लेख केल्यावर उपस्थितांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला. हे गीत भारताच्या युवा वर्गाला भारतमातेची हाक ऐकण्याचा आणि परिवर्तनाचा दूत बनण्याचा आग्रह करते असे त्यांनी स्पष्ट केले. “ ज्या काळात स्वतंत्र भारत हे सर्वात मोठे स्वप्न होते त्या काळात हे गीत लिहिले गेले होते, आज ज्यावेळी आपण स्वतंत्र आहोत तेव्हा विकसित भारत हे सर्वात मोठे स्वप्न आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी आसाम आणि भारताच्या युवा वर्गाला पुढे येण्याचे आणि विकसित भारताचे दरवाजे खुले करण्याचे आवाहन केले.

आपण कशा प्रकारे इतकी महाकाय लक्ष्ये निश्चित करतो आणिकोणाच्या भरवश्यावर  विकसित भारताविषयी बोलतो   याबाबत लोकांनी विचारणा  केली होती .त्याबाबत  पंतप्रधान म्हणाले की देशातील जनतेचा आणि 140 कोटी भारतीय नागरिकांचा हा विश्वास आहे. नागरिकांच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी सरकार अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे आणि आजचे प्रकल्प हे त्याचे अतिशय झळाळते उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.

 

कनेक्टिविटी म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची व्यवस्था इतक्या संकुचित पद्धतीने प्रदीर्घ काळ विचार केला जात होता याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. आज कनेक्टिविटी बाबतचा एकंदर दृष्टीकोन बदलून गेला आहे. आज कनेक्टिविटी  हा चार आयामांचा समावेश असलेला उद्योग(महायज्ञ) आहे, असे ते म्हणाले. हे चार आयाम आहेत, भौतिक कनेक्टिविटी, डिजिटल कनेक्टिविटी, सामाजिक कनेक्टिविटी आणि सांस्कृतिक कनेक्टिविटी, असे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक दुव्याबद्दल बोलताना मोदी यांनी महान आसामी योद्धा लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जन्म दिनानिमित्त दिल्लीत आयोजित भव्य सोहळ्याचे उदाहरण दिले. त्यांनी राणी गैडिनल्यू, काशी तमिळ संगमं, सौराष्ट्र तमिळ संगमं आणि केदारनाथ-कामाख्या यांबद्दल बोलून सांस्कृतिक दुव्याचे उदाहरण दिले. “आज प्रत्येक विचार आणि संस्कृती यांच्यातील संबंध अधिक घट्ट होत आहेत”, असे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या माधवपूर मेळ्याला नुकत्याच दिलेल्या भेटीचा संदर्भ दिला आणि कृष्ण रुक्मणीचा हा बंध ईशान्य भारताला पश्चिम भारताशी जोडत असल्याचे सांगितले. मुगा सिल्क, तेजपूर लेसू, जोहा राईस, बोका चौल, काजी नेमू यानंतर आता गामोसाला देखील GI टॅग मिळाला आहे. आमच्या भगिनींच्या आसामी कला आणि श्रमिक उपक्रमाला देशाच्या इतर भागात नेण्याचा हा एक प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

पर्यटनाच्या माध्यमातून भारतातील विविध संस्कृतींबाबत जगभरात चर्चा होत  असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणांना भेट देणारे पर्यटक केवळ अनुभवावर पैसे खर्च करत नाहीत तर संस्कृतीचा काही भाग आठवणी म्हणून स्वत:सोबत घेऊन जातात, असेही ते म्हणाले. ईशान्येकडील राज्यांमध्ये भौतिक संपर्क सुविधेच्या कमतरतेचा मुद्दा नेहमीच भेडसावत होता. ही अडचण लक्षात घेऊन सध्याचे सरकार या राज्यांत रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्कावर भर देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत संपर्क सुविधांचा विस्तार करण्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकून पंतप्रधानांनी ईशान्येकडील बहुतेक सर्व गावांना रस्ते जोडणी, नवीन विमानतळ जे आता कार्यान्वित झाले आहेत आणि त्यावरून प्रथमच व्यावसायिक उड्डाणे होत आहेत, मणिपूर आणि त्रिपुराला पोहोचणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे गाड्या, ईशान्येत नवीन रेल्वे मार्ग  पूर्वीपेक्षा तीनपट वेगाने टाकले  जात आहेत आणि रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम पूर्वीच्या तुलनेत जवळपास 10 पट वेगाने होत आहे, असे सांगितले. आज उद्घाटन करण्यात आलेले 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 5 रेल्वे प्रकल्प आसामसह या प्रदेशाच्या मोठ्या भागाच्या विकासाला गती देतील यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. आसामच्या मोठ्या भागात प्रथमच रेल्वे पोहोचली आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे आसाम तसेच मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँडला सहज संपर्क सुविधा उपलब्ध होईल, असे पंतप्रधान म्हणाले. तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांचा प्रवास आता अधिक सोपा होणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

 

बोगीबील पूल आणि धोला - सादिया - भूपेन हजारिका पुलाच्या लोकर्पणासाठी पंतप्रधान या भागात आले होते, त्या भेटीची त्यांनी आठवण करून दिली. गेल्या 9 वर्षातील नवीन प्रकल्पांची गती आणि प्रमाण यावर त्यांनी प्रकाश टाकला. ब्रह्मपुत्रेवरील पुलांचे जाळे हे गेल्या 9 वर्षात केलेल्या कामाचे फलित असून आज उद्घाटन झालेल्या पुल प्रकल्पासह या सर्व पुलांचा खुळकुशी रेशीम उद्योगाला फायदा होईल, असे ते म्हणाले.

डबल इंजिन सरकारने गेल्या 9 वर्षात सामाजिक संपर्क वाढवण्यासाठी केलेल्या कामावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी लाखो गावे हागणदारीमुक्त करणाऱ्या स्वच्छ भारत मिशनचे उदाहरण दिले. यासोबतच त्यांनी करोडोना  स्वतःचे घर मिळवून देणारी पंतप्रधान आवास योजना, प्रत्येक घराला वीज जोडणी देणारी सौभाग्य योजना, गॅस सिलिंडरसाठीची उज्ज्वला योजना आणि नळाद्वारे घरापर्यंत पाणी पुरवठ्यासाठीचे जल जीवन मिशन यांचेही उदाहरण दिले. पंतप्रधानांनी नागरिकांचे जीवन सुखकर  करणाऱ्या डिजिटल इंडिया मिशन आणि स्वस्त दरात डेटा उपलब्धता याचाही उल्लेख केला. “ही सर्व घरे, ही सर्व कुटुंबे महत्त्वाकांक्षी भारताचे प्रतिनिधित्व करतात. ही भारताची ताकद असून यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होईल”, असे पंतप्रधान म्हणाले.

विकासासाठी विश्वासाचा धागा तितकाच मजबूत असायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. “आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज ईशान्येत सर्वत्र कायम शांतता नांदत आहे. अनेक तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर वाटचाल सुरू केली आहे. ईशान्येतील अविश्वासाचे वातावरण दूर होत आहे, हृदयातील अंतर नाहीसे होत आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. “स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित भारत घडवायचा असेल तर आपल्याला हे वातावरण वृद्धिंगत करावे लागेल. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेने आपल्याला पुढे जायचे आहे," असे पंतप्रधान म्हणाले.

 

आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव; केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल; केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली आणि आसाम सरकारचे अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पलाशबारी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले. हा पूल या प्रदेशात अत्यंत आवश्यक असलेली संपर्क सुविधा प्रदान करेल. पंतप्रधानांनी दिब्रुगडमधील नामरूप येथे 500 TPD मिथेनॉल प्लांट देखील कार्यान्वित केला. उद्घाटन झालेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये दिगरू - लुमडिंग विभाग आणि गौरीपूर - अभयपुरी विभागाचा समावेश आहे. नवीन बोंगाईगाव - धुप धारा विभागाचे दुहेरीकरण; राणीनगर जलपाईगुडी - गुवाहाटी विभागाचे विद्युतीकरण; सेंचोआ - सिलघाट शहर आणि सेंचोआ - मैराबारी विभागाचे विद्युतीकरण यांचाही समावेश आहे.

शिवसागरमधील रंग घराच्या सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पामुळे या ठिकाणच्या पर्यटक सुविधा वाढतील. रंग घराच्या सुशोभीकरण प्रकल्पात एका विशाल पाणवठ्याभोवती फाउंटन शो आणि अहोम राजघराण्याचा इतिहास दर्शविणारे प्रदर्शन, साहसी बोट राइडसाठी जेट्टी असलेले बोट हाऊस, स्थानिक हस्तकलेच्या जाहिरातीसाठी एक कारागीर गाव, खाद्यप्रेमींसाठी वैविध्यपूर्ण स्थानिक पाककृती अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिवसागर येथे असलेले रंग घर हे अहोम संस्कृती आणि परंपरांचे चित्रण करणारी सर्वात प्रतिष्ठित रचना आहे. अहोम राजा स्वर्गदेव प्रमत्ता सिंह यांनी 18 व्या शतकात रंग घर बांधले होते.

आसामी लोकांची सांस्कृतिक ओळख आणि जीवनाचा शुभंकर म्हणून आसामचे बिहू नृत्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बिहू नृत्याविष्कार पंतप्रधानांनी पाहिला. या कार्यक्रमात 10,000 हून अधिक बिहू कलाकार एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या बिहू नृत्य सादरीकरणाच्या श्रेणीमध्ये नवा गिनीज जागतिक विक्रमाचाही त्यांचा  प्रयत्न राहील. या आयोजनात राज्यातील 31 जिल्ह्यांतील कलाकार सहभागी झाले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”