पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत -जपान सहकार्याचे अध्यक्ष आणि जपानचे माजी पंतप्रधान योशीहिदो सुगा यांची भेट घेतली. योशीहिदो सुगा यांच्या नेतृत्वाखाली 100 पेक्षा जास्त सदस्यांचे एक शिष्टमंडळ भारतात आले असून, त्यात, जपानी सरकारी अधिकारी, केदानरेन (जपानमधील व्यावसायिक महासंघ) आणि तिथल्या संसदेतील ‘गणेश नो काई’ गटाचे सदस्य यांचा समावेश आहे.
जेआयए चे अध्यक्ष म्हणून, आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आलेल्या योशीहिदो सुगा यांचे पंतप्रधानांनी स्वागत केले. दोन्ही नेत्यांमधे, भारत जपानमधील विशेष धोरणात्मक संबंध आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत विचारांचे आदानप्रदान झाले. यात, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य, रेल्वे, लोकांमधील परस्पर संबंध, कौशल्य विकास भागीदारी अशा विषयांचा समावेश होता.
तसेच, जपानी संसदेतील, ‘गणेशा नो काई’ ह्या गटाच्या सदस्यांशी, दोन्ही देशातील संसदांचे संबंध अधिक दृढ करण्याबद्दल देखील पंतप्रधानांची अत्यंत फलदायी चर्चा झाली. जपानमध्ये योग आणि आयुर्वेद लोकप्रिय होत असल्याचे त्यांनी स्वागत केले. तसेच दोन्ही देशातील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
पंतप्रधानांनी केदानरेन सदस्यांचेही भारतात स्वागत केले आणि त्यांच्याशी झालेल्या चर्चेत, व्यवसाय क्षेत्र सुधारण्यासाठी देशात करण्यात आलेल्या व्यापक सुधारणांवर प्रकाश टाकला. त्यांनी जपानी गुंतवणूकदारांना त्यांच्या भारतातील विद्यमान गुंतवणुकीचा विस्तार करण्याचे तसेच सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी आमंत्रित केले.