पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे बिल गेट्स यांची भेट घेतली.
बिल गेट्स भारत दौऱ्यावर आहेत. त्याबद्दलचे म्हणणे त्यांनी ट्विट केले आहे. त्याच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले:
“@BillGates यांना भेटून आणि प्रमुख मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करून आनंद झाला. त्यांची नम्रता आणि एक उत्तम तसेच अधिक शाश्वत वसुंधरा निर्माण करण्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येते.”
Delighted to meet @BillGates and have extensive discussions on key issues. His humility and passion to create a better as well as more sustainable planet are clearly visible. https://t.co/SYfOZpKwx8 pic.twitter.com/PsoDpx3vRG
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2023
"मी या आठवड्यात भारतात आलो आहे. आरोग्य, हवामान बदल आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये येथे सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण कामांबद्दल जाणून आहे. जगासमोर अनेक आव्हाने आहेत, अशा वेळी भारतासारख्या गतिमान आणि सर्जनशील ठिकाणी भेट देणे प्रेरणादायी आहे” असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
गेट्स यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीची ठळक वैशिष्ट्य सांगितली. “पंतप्रधान मोदी आणि मी संपर्कात असतो. विशेषत: कोविड-19 लस विकसित करणे आणि भारताच्या आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल. अनेक सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या लसींची निर्मिती करण्याची भारताकडे प्रचंड क्षमता आहे, त्यापैकी काही गेट्स फाऊंडेशनद्वारे समर्थित आहेत. भारतात उत्पादित केलेल्या लसींनी महामारीदरम्यान लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि जगभरातील इतर आजारांना प्रतिबंध केला आहे” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी भारताच्या महामारी हाताळणीकडे लक्ष वेधले. “ नवी जीवरक्षक साधने तयार करण्याव्यतिरिक्त, भारताने ते वितरित करण्यात देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे—भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीने कोविड लसींच्या 2.2 अब्ज पेक्षा जास्त मात्रा वितरित केल्या आहेत. कोविन (Co-WIN) नावाचा एक मुक्त-स्रोत मंच तयार केला आहे. लोकांना अब्जावधी लसमात्रांचे वेळापत्रक साधण्यात आणि लसीकरणाची डिजिटल प्रमाणपत्रे वितरित करण्यात याने मोलाची कामगिरी केली आहे. भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाला पाठबळ देण्यासाठी या मंचाचा विस्तार केला जात आहे. को-विन हे जगासाठी एक प्रारुप आहे, असा पंतप्रधान मोदींचा विश्वास आहे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे” असे गेट्स म्हणाले.
बिल गेट्स यांनी डिजिटल पेमेंट क्षेत्रातील भारताच्या प्रगतीची प्रशंसा केली. “भारत महामारीच्या काळात 200 दशलक्ष महिलांसह 300 दशलक्ष लोकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट हस्तांतरित करण्यात सक्षम ठरला. भारताने आर्थिक समावेशनाला प्राधान्य दिल्यानेच हे शक्य झाले. भारताने डिजिटल ओळखपत्र प्रणालीमध्ये गुंतवणूक केली आहे (ज्याला आधार म्हणतात) आणि डिजिटल बँकिंगसाठी नाविन्यपूर्ण मंच तयार केले आहेत. आर्थिक समावेशन ही एक विलक्षण गुंतवणूक आहे याचे हे स्मरण करुन देते” असे गेट्स यांनी सांगितले.
पंतप्रधान गतिशक्ती बृहत आराखडा, जी20 अध्यक्षपद, शिक्षण, नवोन्मेष, रोगांशी लढा आणि भरडधान्याला प्रोत्साहन या भारताच्या यशस्वी कामगिरींचाही गेट्स यांनी उल्लेख केला आहे.
बिल गेट्स म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेल्या चर्चेने आरोग्य, विकास आणि हवामान क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीबद्दल मला पूर्वीपेक्षा अधिक आश्वासक बनवले. आपण नवोन्मेषात गुंतवणूक करतो तेव्हा काय होऊ शकते हे भारत दाखवून देत आहे. मला आशा आहे की भारत ही प्रगती सुरुच ठेवेल आणि आपल्या नवोन्मेषी संकल्पनांचे जगासोबत आदानप्रदान करेल.