पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील बोदेली, छोटा उदयपूर येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. यामध्ये ‘मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स’, अर्थात ‘उत्कृष्टता शाळा उपक्रम’ या कार्यक्रमांतर्गत 4500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण, ‘विद्या समीक्षा केंद्र 2.0’ ची पायाभरणी, या आणि इतर अनेक विकास प्रकल्पांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या प्रदेशाशी दीर्घ काळापासून असलेल्या त्यांच्या संबंधांचे स्मरण केले. आज सुरु करण्यात आलेल्या आणि पायाभरणी करण्यात आलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. एक कार्यकर्ता म्हणून या प्रदेशातील गावांमध्ये आपण व्यतीत केलेला काळ त्यांना आठवला. उपस्थितांमध्ये अनेक ओळखीचे चेहरे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. या परिसरातील आदिवासी समाजाची परिस्थिती आणि जीवन या सर्व गोष्टींशी आपला निकटचा परिचय असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान पदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारल्यावर हा परिसर आणि इतर आदिवासी भागांचा विकास करण्याचा आपला संकल्प त्यांनी उपस्थितांना सांगितला. आपल्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सकारात्मक परिणाम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या मुलांनी प्रथमच शाळा पाहिली होती, त्यांना आता शिक्षक आणि अभियंता म्हणून चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा, रस्ते, घरे, पाण्याची उपलब्धता याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, समाजाच्या गरीब स्तरातील नागरिकांसाठी सन्मानाने जगण्याचा हा पाया असून, त्यावर युद्धपातळीवर काम करण्याला आमचे प्राधान्य आहे. देशात गरिबांसाठी 4 कोटीहून अधिक घरे बांधण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. “गरिबांसाठी घर म्हणजे आपल्यासाठी केवळ एक संख्या नसून, ते त्यांच्या प्रतिष्ठेला दिलेले बळ आहे” असे ते म्हणाले. या घरांच्या रचनेबाबतचा निर्णय लाभार्थ्यांवर सोपविण्यात आला असून, बहुतांश घरे त्या घरातील महिलांच्या नावावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामुळे त्यांचे जीवन सुकर झाले आहे. ते म्हणाले की जल जीवन अभियाना अंतर्गत 10 कोटी नवीन पाणी जोडण्या देण्यात आल्या. राज्यात काम करताना मिळालेला अनुभव राष्ट्रीय स्तरावरही उपयोगी पडत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. "आपण माझे शिक्षक आहात" असे पंतप्रधान म्हणाले.
शैक्षणिक क्षेत्राविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आजचे प्रकल्प हे गुजरातला सर्वोच्च स्थानावर नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. " विद्यालय उत्कृष्टता अभियान आणि विद्या समीक्षा 2.0 चा विद्यालयातील शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल", असे पंतप्रधान म्हणाले. विद्या समीक्षा केंद्रांबाबत जागतिक बँकेच्या अध्यक्षांसोबत झालेल्या संवादाचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जागतिक बॅंकेच्या अध्यक्षांनी त्यांना भारतातील प्रत्येक जिल्ह्यात विद्या समीक्षा केंद्रे स्थापन करण्याचे आवाहन केले आणि जागतिक बँक या उदात्त हेतूला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे हुशार विद्यार्थ्यांना तसेच संसाधनांची कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आदिवासी भागातील तरुणांना संधी उपलब्ध करून देताना गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने गेल्या दोन दशकांपासून शिक्षण आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या दोन दशकांपूर्वी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर शैक्षणिक सुविधांच्या अभावाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि या कारणांमुळेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळती झाली असल्याचे सांगितले.पंतप्रधानांनी जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती तेव्हा राज्यातील आदिवासी भागामध्ये विज्ञान शाळा नव्हती असे सांगून त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. “मात्र आता सरकारने परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दोन दशकांत 2 लाख शिक्षकांची भरती करण्यात आली आणि 1.25 लाखांहून अधिक वर्गखोल्या बांधण्यात आल्या अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. गेल्या दोन दशकांमध्ये आदिवासी भागात विज्ञान, वाणिज्य आणि कला संस्थांचे जाळे तयार करण्यात आले यावर पंतप्रधानांनी भर दिला. आदिवासी भागात सरकारने 25 हजार वर्गखोल्या आणि 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधली आहेत असे सांगून त्यांनी गोविंद गुरु विद्यापीठ आणि बिरसा मुंडा विद्यापीठाचे उदाहरण दिले. या प्रदेशांमध्ये अनेक कौशल्य विकास संस्थाही उदयास आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मातृभाषेतील शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण करून त्यांना सक्षम बनवेल. आदिवासी भागातील जीवन बदलवत असलेल्या 14 हजाराहून अधिक पीएम श्री शाळा आणि एकलव्य निवासी शाळांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मदत करत आहेत, असे ते म्हणाले. देशातील स्टार्टअप परिसंस्थेमध्ये आदिवासी तरुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दुर्गम भागातील शाळांमधील अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या जगात कौशल्याला महत्त्व असल्याचे सांगून कौशल विकास केंद्रे आणि कौशल विकास योजनेंतर्गत लाखो तरुणांना प्रशिक्षण दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुद्रा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या तारणमुक्त कर्जांबद्दलही त्यांनी सांगितले. यामुळे कोट्यवधी नव-उद्योजक तयार होत आहेत. वनधन केंद्रांचा राज्यातील लाखो आदिवासींना लाभ होत आहे. आदिवासी उत्पादने आणि हस्तकलेसाठी खास विक्री केन्द्रांचा त्यांनी उल्लेख केला.
पंतप्रधानांनी, 17 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती दिली. या अंतर्गत, न्हावी , शिंपी, धोबी, कुंभार, लोहार, सोनार, सुतार, माळी, चर्मकार, राजमिस्त्री यांसारख्या कारागीरांना कमी व्याजाने कर्ज, साधने आणि प्रशिक्षण मिळेल, असे ते म्हणाले. कौशल्य आणि परंपरा जिवंत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेंतर्गत कर्जा मिळवण्यासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही, फक्त एकच हमी आहे ती म्हणजे मोदी असे ते म्हणाले.
दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी तसेच एकेकाळी वंचित राहिलेले लोक आज सरकारच्या विविध योजनांच्या मदतीने विकासाची उंची गाठत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर आदिवासींच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देण्याची संधी मिळाली असे सांगत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा मोदी यांनी उल्लेख केला. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आता आदिवासी (जनजातीय) गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते . सध्याच्या सरकारने आदिवासी समाजासाठीच्या निधीत पूर्वीच्या तुलनेत 5 पटीने वाढ केल्याची माहितीही त्यांनी दिली.
संसदेच्या नवीन इमारतीतून संमत होणारा पहिला कायदा ठरलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम बद्दलही पंतप्रधानांनी माहीती दिली. इतके दिवस आदिवासी आणि महिलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित का ठेवण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. "मी छोटा उदयपूरसह संपूर्ण आदिवासी भागातील माता-भगिनींना सांगण्यासाठी आलो आहे की, तुमचा हा मुलगा तुमचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आला आहे", असे ते म्हणाले.
आता सर्व महिलांसाठी संसद आणि विधानसभेत सहभागी होण्याचे मार्ग खुले झाले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि अनुचित जमाती समुदायाला आरक्षण दिले आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. नवीन कायद्यात अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील महिलांसाठीही आरक्षणाची तरतूद आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केल्याचा योगायोग अधोरेखित केला.
अमृत काळाची सुरुवात अतिशय चांगली झाली असल्याने अमृत काळातील सर्व संकल्प पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, आणि गुजरात सरकारचे मंत्री उपस्थित होते.
पार्श्वभूमी
‘मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स’ या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधानांनी 4500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले तर अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली, त्यामुळे संपूर्ण गुजरातमधील शालेय पायाभूत सुविधांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. यावेळी हजारो नवीन वर्गखोल्या, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित) प्रयोगशाळा आणि गुजरातमधील शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या इतर पायाभूत सुविधा पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्या. या अभियानाअंतर्गत गुजरात मधील शाळांच्या हजारो वर्गखोल्या सुधारण्यासाठीच्या आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘विद्या समीक्षा केंद्र 2.0’ या प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली. हा प्रकल्प ‘विद्या समीक्षा केंद्राच्या’ यशाने प्रेरित होऊन उभारला जाणार आहे. या केंद्राने गुजरातमधील शाळांवर नियमित देखरेख आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांमध्ये सुधारणा सुनिश्चित केली आहे. ‘विद्या समीक्षा केंद्र 2.0’’ प्रकल्पामुळे गुजरातमधील सर्व जिल्हे आणि ब्लॉकमध्ये विद्या समीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात येईल.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी वडोदरा जिल्ह्यातील सिनोर तालुक्यात नर्मदा नदीवर‘ओदरा दाभोई-सिनोर-मालसर-आसा रस्त्यावर’ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलासह, चाब तलाव पुनर्विकास प्रकल्प, दाहोदमधील पाणीपुरवठा प्रकल्प, वडोदरा येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सुमारे 400 घरांचा प्रकल्प, गुजरातमधील 7500 गावांमधील ग्राम वाय-फाय प्रकल्प; आणि दाहोद येथे नव्याने बांधलेले जवाहर नवोदय विद्यालय असे अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते छोटा उदयपूरच्या पाणीपुरवठा प्रकल्प, गोध्रा- पंचमहाल येथील उड्डाणपूल आणि केंद्र सरकारच्या ‘ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट (BIND)’ योजनेअंतर्गत दाहोद येथे उभारण्यात येणारा एफएम रेडिओ स्टुडिओ इत्यादी विकास कामांची पायाभरणी देखील करण्यात आली.