पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील अबू रोड येथील ब्रह्म कुमारींच्या शांतीवन संकुलाला भेट दिली. पंतप्रधानांनी सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल हॉस्पिटल, शिवमणी वृद्धाश्रमाचा दुसरा टप्पा आणि नर्सिंग कॉलेजच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी ब्रह्म कुमारींच्या शांतीवन संकुलाला आपण यापूर्वी दिलेल्या भेटींचे स्मरण केले आणि ते म्हणाले की, या ठिकाणी भेट दिल्यावर त्यांना आध्यात्मिक भावनांची प्रचीती येते. ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना दुसऱ्यांदा ब्रह्म कुमारींशी संबंधित कार्यक्रमांमध्ये संधी मिळाली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जल जन अभियानाचे उद्घाटन करण्याची आपल्याला संधी मिळाल्याचे स्मरण करून, पंतप्रधानांनी ब्रह्म कुमारी संस्थेबद्दल आपल्याला सदैव वाटत असलेल्या आत्मीयतेचा उल्लेख केला, आणि परमपिता यांचा आशीर्वाद आणि राज्ययोगिनी दादीजी यांचा स्नेह, याला त्याचे संपूर्ण श्रेय असल्याचे ते म्हणाले. सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल हॉस्पिटलची पायाभरणी झाली असून शिवमणी वृद्धाश्रम आणि नर्सिंग कॉलेजच्या विस्तारीकरणाचे कामही झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली, आणि त्याबद्दल ब्रह्म कुमारी संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले.
अमृत काळाच्या या युगात सर्व सामाजिक आणि धार्मिक संस्थांचा मोठा वाटा असणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “हा अमृत काळ देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी कर्तव्य काळ आहे.याचा अर्थ आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली पाहिजे”, असे सांगत यासोबतच समाज आणि देशाच्या हितासाठी आपल्या विचारांचा आणि जबाबदाऱ्यांच्या विस्तार करण्यावर यावर पंतप्रधानांनी भर दिला. समाजात नीती मूल्ये रुजवण्यासाठी ब्रह्मकुमारी एक संस्था म्हणून काम करते , असे ते म्हणाले. विज्ञान, शिक्षण आणि सामाजिक जागृतीसाठी या संस्थेने दिलेले योगदानही त्यांनी नमूद केले. आरोग्य आणि निरामयतेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
“देश आरोग्य सुविधांच्या परिवर्तनातून जात आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी , आपल्यासाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत ही भावना गरीबांमध्ये पोहोचवण्यासाठी आयुष्मान भारतची भूमिका विषद केली. यामुळे गरीब नागरिकांसाठी केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी रुग्णालयांची दारे खुली झाली आहेत, असे ते म्हणाले. 4 कोटींहून अधिक गरीब रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून या माध्यमातून त्यांना 80 हजार कोटी रुपयांची बचत करण्यात मदत झाली आहे.त्याचप्रमाणे जनऔषधी योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांची सुमारे 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.सरकारी योजनांबाबत जनजागृती करण्याची विनंती त्यांनी ब्रह्मकुमारींच्या केंद्रांना यावेळी केली.
देशातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचार्यांची कमतरता दूर करण्यासाठी देशातील अभूतपूर्व उपाययोजना अधोरेखित करत गेल्या 9 वर्षांत सरासरी दर महिन्याला एका वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. 2014 पूर्वीच्या दशकात 150 पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाले होते, तर गेल्या 9 वर्षांत सरकारने 350 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.देशात एमबीबीएससाठी दरवर्षी सुमारे 50 हजार जागा होत्या, आज ती संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे, तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या अंदाजे 30 हजारांवरून 65 हजारांवर गेली आहे, असे पंतप्रधानांनी 2014 पूर्वी आणि नंतरची तुलना करताना नमूद केले. "जेव्हा हेतू स्पष्ट असतो आणि समाजसेवेची भावना असते, तेव्हा असे संकल्प केले जातात आणि ते पूर्णही केले जातात", असेही ते म्हणाले.
“पुढील दशकात भारतात निर्माण झालेल्या डॉक्टरांची संख्या स्वातंत्र्यानंतरच्या 7 दशकात निर्माण झालेल्या डॉक्टरांच्या संख्येइतकीच असेल”,असे सांगत पंतप्रधानांनी नर्सिंग क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी अधोरेखित केल्या. देशात 150 हून अधिक नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे आणि 20 हून अधिक नर्सिंग महाविद्यालये राजस्थानमध्येच येतील याचा फायदा येऊ घातलेल्या सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल रुग्णालयालाही होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक संस्थांनी बजावलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक भूमिकेविषयी पंतप्रधानांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तींमध्ये ब्रह्म कुमारींच्या योगदानाचा आणि मानवतेच्या सेवेसाठी संस्थेने केलेल्या समर्पित कार्याचा आपल्याला वैयक्तिक अनुभव असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जल जीवन आणि नशामुक्ती योजनांना लोकचळवळ बनवल्याबद्दल त्यांनी ब्रह्म कुमारींचे कौतुक केले.
आपण ठेवलेल्या अपेक्षांपेक्षा ब्रह्मा कुमारी संघटनेने नेहमीच जास्त काम केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. संघटनेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जगभरात योग शिबिरे आयोजित केली, स्वच्छ भारताच्या राजदूत म्हणून दीदी जानकी काम करत आहेत, असे ते म्हणाले. ब्रह्म कुमारींच्या अशा कृतींमुळे त्यांचा संघटनेवरील विश्वास वाढला आहे आणि त्यामुळे संघटनेविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी श्रीअन्न आणि जागतिक स्तरावर भारताने भरडधान्याला दिलेल्या प्रोत्साहनाचा मुद्दाही मांडला. नैसर्गिक शेती, नद्या स्वच्छ करणे आणि भूजल संवर्धन यासारख्या मोहिमा भारत पुढे नेत आहे असे ते म्हणाले. हे विषय हजार वर्ष जुन्या संस्कृती आणि भूमीच्या परंपरांशी जोडलेले आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अभिनव पद्धतीने राष्ट्र उभारणीशी संबंधित नवीन कल्पना पुढे नेण्याचे प्रयत्न करा असे आवाहन भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी ब्रह्म कुमारींना केले. “या प्रयत्नांमध्ये जितके अधिक सहकार्य मिळेल, तितकी देशाची सेवा होईल. विकसित भारताची निर्मिती करून, आम्ही जगासाठी ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंत्राचे पालन करू,” असे पंतप्रधान शेवटी म्हणाले.
पार्श्वभूमी:-
देशभरात आध्यात्मिक कृतींना चालना देण्यावर पंतप्रधान विशेष लक्ष देत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान ब्रह्म कुमारींच्या शांतीवन संकुलाला भेट देतील. सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल हॉस्पिटल, शिवमणी वृद्धाश्रमाचा दुसरा टप्पा आणि नर्सिंग कॉलेजच्या विस्ताराची पायाभरणी ते करणार आहेत. अबू रोड येथे 50 एकर परिसरात सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल ग्लोबल हॉस्पिटल उभारले जाणार आहे. तिथे जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळतील आणि विशेषत: या भागातील गरीब आणि आदिवासी लोकांसाठी या सुविधा फायदेशीर ठरणार आहेत.
आज़ादी का ये अमृतकाल, देश के हर नागरिक के लिए कर्तव्यकाल है। pic.twitter.com/IHVjkrIffs
— PMO India (@PMOIndia) May 10, 2023
देश स्वास्थ्य सुविधाओं के ट्रांसफॉर्मेशन से गुजर रहा है।
— PMO India (@PMOIndia) May 10, 2023
इसमें एक बड़ी भूमिका आयुष्मान भारत योजना ने निभाई है। pic.twitter.com/ZcahaMetAL
मुझे आशा है, राष्ट्र निर्माण से जुड़े नए विषयों को ब्रह्मकुमारीज़, innovative तरीके से आगे बढ़ाएँगी: PM @narendramodi pic.twitter.com/x6LkLCL6JO
— PMO India (@PMOIndia) May 10, 2023
आज भारत श्रीअन्न यानी मिलेट्स को लेकर एक वैश्विक आंदोलन को आगे बढ़ा रहा है। pic.twitter.com/8uCSkS0kb5
— PMO India (@PMOIndia) May 10, 2023