अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे केले उद्घाटन
पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह यांना जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची केली पायाभरणी
सिप्झ सेझ इथे ‘भारत रत्नम’आणि न्यू एन्टरप्रायजेस अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॉवर (NEST)01 चे केले उद्घाटन
रेल्वे आणि पेयजल संबंधित विविध प्रकल्पांचे केले राष्ट्रार्पण
उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर दरम्यान ईएमयू रेल्वेच्या उद्घाटनपर फेरीला दाखवला हिरवा झेंडा
नमो महिला सक्षमीकरण अभियानाचा केला प्रारंभ
जपान सरकारचे आभार मानत शिंजो आबे यांचे केले स्मरण
‘अटल सेतूच्या उद्घाटनातून भारताच्या पायाभूत सुविधांमधील सामर्थ्याचे होते दर्शन आणि ‘विकसित भारत’ या दिशेने देशाचा वेगवान प्रवास होतो अधोरेखित’
‘आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प म्हणजे नव भारताच्या उभारणीचे माध्यम’
‘अटल सेतू विकसित भारताचे चित्र दर्शवतो’
‘पूर्वीच्या काळात करोडो रुपयांच्या घोटाळ्यांची चर्चा होत असे, तर आता हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांच्या पूर्ततेविषयी होते चर्चा’
‘इतरांकडून अपेक
आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टीव्हिटी, पेय जल, रत्ने आणि आभूषणे आणि महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश आहे.
अटल सेतू, या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाच्या उद्घाटनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हा भारताच्या विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा दाखला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात नवी मुंबई इथे 12,700 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.त्याआधी पंतप्रधानांनी नवी मुंबई इथे 17,840 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टीव्हिटी, पेय जल, रत्ने आणि आभूषणे आणि  महिला सक्षमीकरण योजनांचा समावेश आहे.

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नाही, तर ‘विकसित भारताच्या’ संकल्पासाठी देखील एक ऐतिहासिक दिवस आहे. "हे विकास प्रकल्प मुंबईत होत असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष त्याकडे एकवटले आहे", मोदी म्हणाले.

अटल सेतू, या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाच्या उद्घाटनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हा भारताच्या विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा दाखला आहे.

24 डिसेंबर 2016 रोजी एमटीएचएल अटल सेतूची पायाभरणी केल्याचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा हा प्रसंग ‘संकल्पातून सिद्धीचे’ प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रकल्प पूर्ण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला, आणि मागील सरकारच्या काळात दुर्लक्षित राहिल्यामुळे नागरिक हताश झाले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “देश पुढे जाईल, आणि देश प्रगती करेल, ही 2016 मधील मोदी गॅरंटी होती,” पंतप्रधान म्हणाले. "छत्रपती शिवाजी, मुंबा देवी आणि सिद्धिविनायकासमोर नतमस्तक होत, हा अटल सेतू मी मुंबईकरांना आणि देशाला समर्पित करतो,"असे  पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या साथ रोगाच्या काळात व्यत्यय येऊनही, एमटीएचएल अटल सेतूचे काम वेळेवर पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली, आणि ते म्हणाले की, कोणत्याही विकास प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण अथवा पायाभरणी हे केवळ छायाचित्रांसाठी नव्हे, तर भारताच्या निर्मितीचे माध्यम आहे. “अशा प्रत्येक प्रकल्पामुळे विशाल भारताच्या विकासाला हातभार लागतो”,असे  पंतप्रधान म्हणाले.

 

रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल वाहतूक, तसेच व्यवसायाशी संबंधित सध्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, यापैकी बहुतेक सर्व प्रकल्प राज्यातील डबल इंजिन सरकारच्या काळात सुरु झाले होते, आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्वांच्या परिश्रमांची प्रशंसा केली.

महिलांच्या उपस्थितीबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “ कन्या आणि भगिनींच्या सक्षमीकरणाची मोदींची हमी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे.” मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, नारी शक्तीदूत ऍप्लिकेशन आणि लेक लाडकी योजना यांसारख्या योजना त्या दिशेने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “महिलांनी पुढाकार घेऊन विकसित भारतच्या चळवळीचे नेतृत्व करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या माता आणि कन्यांच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करून त्यांच्यासाठी जीवन सुलभ करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यांनी उज्ज्वला, आयुष्मान कार्ड, जन धन खाती, पीएम आवास अंतर्गत पक्की घरे, मातृ वंदन योजना, 26 आठवड्यांची प्रसूती रजा आणि सुकन्या समृद्धी खाती यासारख्या योजनांद्वारे महिलांच्या गरजांची घेतलेली काळजी स्पष्ट केली. "महिला कल्याण ही कोणत्याही राज्यातील कोणत्याही दुहेरी इंजिन सरकारची सर्वात मोठी हमी आहे", असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अटल सेतूचा आकार, प्रवास सुलभता, अभियंते आणि दर्जा याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो. या प्रकल्पात वापरलेले पोलाद 4 हावरा पूल आणि 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बांधण्यासाठी पुरेसे असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी जपान सरकारच्या मदतीबद्दल आभार मानले आणि पंतप्रधान शिंजो आबे यांचे स्मरण केले. “आम्ही या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प केला होता”, याची पंतप्रधान मोदींनी आठवण करून दिली.

“अटल सेतू हे 2014 मध्ये संपूर्ण राष्ट्राने बाळगलेल्या आकांक्षांचे कौतुक आहे”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. 2014 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे स्मरण करून ते म्हणाले की, देशाने 10 वर्षांपूर्वी बघितलेली स्वप्ने आणि संकल्प आज साकार होत आहेत. एमएचटीएल अटल सेतू तरुणांमध्ये नवीन विश्वास निर्माण करेल हे अधोरेखित करताना ते म्हणाले कि “अटल सेतू हे या विश्वासाचे प्रतीक आहे आणि ते विकसित भारताचे चित्र रेखाटते.” पंतप्रधानांनी सांगितले कि “विकसित भारतात सर्वांसाठी सेवा आणि समृद्धीचा समावेश असेल. त्यात वेग आणि प्रगती असेल जी जगाला जवळ आणेल. जीवन आणि उपजीविका समृद्ध होत राहील. हा अटल सेतूचा संदेश आहे.”

 

देशात गेल्या 10 वर्षात झालेल्या परिवर्तनाकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की 2014 पूर्वीच्या भारताबद्दल विचार केला तर  बदललेल्या भारताची प्रतिमा अधिक स्पष्ट होते. ''पूर्वी चर्चा होत असे ती लाखो  करोड रुपयांच्या घोटाळ्यांवर, आज चर्चा होते ती हजारो  कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या पूर्ततेबाबत. '' पंतप्रधानांनी ईशान्य भारतातील भूपेन हजारिका सेतू आणि बोगीबील पूल, अटल बोगदा आणि चिनाब पूल, अनेक द्रुतगती मार्ग, आधुनिक रेल्वे स्थानके, पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक मार्गिका, वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत रेल्वेगाड्या आणि नवीन विमानतळांचे उद्घाटन यांची  उदाहरणे दिली.

महाराष्ट्रातील अलीकडील मोठ्या विकास प्रकल्पांची उदाहरणे देताना पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि सध्या काम सुरू असलेला नवी मुंबई विमानतळ व मुंबईच्या कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलणार असणाऱ्या किनारी रस्ता ( कोस्टल रोड ) प्रकल्पाचा उल्लेख केला. प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ते बोगद्याविषयी त्यांनी सांगितले. '' लवकरच मुंबईला पहिली बुलेट ट्रेनही मिळेल,'' असे पंतप्रधान म्हणाले. “दिल्ली-मुंबई आर्थिक मार्गिका  महाराष्ट्राला मध्य आणि उत्तर भारताशी जोडेल. महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाइनचे जाळेही टाकले जात आहे. तेल आणि वायू पाइपलाइन, औरंगाबाद औद्योगिक नगरी, नवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा-बिडकीन औद्योगिक  पार्कचे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार आहेत.''

 

करदात्यांच्या पैशांचा देशाच्या विकासासाठी कसा उपयोग केला जात आहे आणि याउलट पूर्वी त्याचा कसा दुरुपयोग होत होता,  ते पंतप्रधानांनी स्पष्ट केले. त्यांनी 5 दशकांपूर्वी काम सुरू करण्यात आलेल्या आणि सध्याच्या सरकारने पूर्ण केलेल्या  निळवंडे धरण प्रकल्पाविषयी सांगितले. उरण-खारकोपर रेल्वे मार्गाचे काम 3 दशकांपूर्वी सुरू  झाले होते पण त्याला गती दिली ती  दुहेरी इंजिन सरकारने आणि आज त्याचा पहिला टप्पा देशाला समर्पित करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रदीर्घ विलंबानंतर पूर्ण झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच अटल सेतूदेखील 5-6 दशकांपूर्वी नियोजनात होता. वांद्रे-वरळी सागरी सेतू या 5 पटीने छोट्या प्रकल्पाला 10 वर्षांहून अधिक काळ लागला आणि त्यासाठीचा खर्च 4-5 पट वाढला.

पंतप्रधानांनी माहिती दिली की,  अटल सेतूच्या बांधकामामध्‍ये  सुमारे 17,000 मजूर आणि 1500 अभियंते कार्यरत आहेत; यामुळे  वाहतूक आणि बांधकाम उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधीही  मोठ्या प्रमाणावर  निर्माण झाल्या आहेत. “अटल सेतू या क्षेत्रातील सर्व व्यावसायिक क्रियाकलापांना बळकट करेल आणि व्यवसाय करणे सुलभ करेल आणि जीवन सुलभ करेल”, असेही ते म्हणाले.

“आज भारत एकाच वेळी दोन आघाड्यांवर प्रगतीपथावर  आहे”, यावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भर दिला. ते म्हणाले की, एकीकडे सरकार गरीबांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशाल मोहीम  राबवत आहे, तर दुसरीकडे देशाच्या प्रत्येक भागात मोठे प्रकल्प राबवले जात आहेत.  हे सांगताना पंतप्रधानांनी,  अटल पेन्शन योजना आणि अटल सेतू, आयुष्मान भारत योजना आणि वंदे भारत-अमृत भारत ट्रेन, पीएम किसान सन्माननिधी आणि पीएम गतिशक्ती यांचा यावेळी  उल्लेख केला. पंतप्रधानांनी नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा, हा   सरकारचा  हेतू असून त्याविषयी निष्ठा असल्याचे सांगितले. सत्तेच्या आसुसलेले   आणि सामान्य लोकांऐवजी स्वतःच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करणार्‍या मागील सरकारांच्या हेतूबद्दल खेद  व्यक्त केला. विकासाकामांचा किती अभाव पूर्वी होता, यावर  प्रकाश टाकताना  पंतप्रधानांनी माहिती दिली की,  2014 च्‍या आधी  10 वर्षांमध्‍ये  पायाभूत सुविधांवर  केवळ 12 लाख कोटी रुपयांची तरतूद  अर्थसंकल्पात केली गेली होती.  तर  त्यानंतरच्या 10 वर्षात म्हणजे 2014 पासून सध्याच्या सरकारने   पायाभूत सुविधांसाठी 44 लाख कोटी रुपयांची तरतूद  अर्थसंकल्प  केली आहे.    “एकट्या महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपये खर्चांचे  पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत तर यापैकी काही प्रकल्पांचे   काम सुरू आहे. या निधीमुळे  प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, ” असे ते पुढे म्हणाले.

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, “ज्यावेळी- जिथे   इतरांकडून अपेक्षा संपतात,  त्यावेळी – तिथे  मोदींची हमी सुरू होते.” त्यांनी स्वच्छता, शिक्षण, वैद्यकीय मदत आणि उत्पन्न वाढी, यासंबंधित योजनांचा उल्लेख यावेळी केला.  या योजनांचा  महिलांना सर्वाधिक फायदा झाला, असे नमूद केले. पीएम जनऔषधी केंद्रे, स्वनिधी, पीएम आवास आणि बचत गटांना मदत मिळून ‘लखपती दीदी’ तयार होत आहेत. २ कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  महाराष्ट्र शासनाच्या योजनाही याच दिशेने कार्यरत आहेत. “मी तुम्हा सर्वांना  ग्वाही  देतो की,  दुहेरी इंजिन असलेले सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याच  समर्पित भावनेने काम करत राहील. महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे,  यामध्‍ये  आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी शेवटी सांगितले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू

शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था बळकट करून नागरिकांची 'वाहतूक सुलभता' सुधारणे हा पंतप्रधानांचा दृष्टीकोन आहे. या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), ज्याला आता 'अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे, त्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाची पायाभरणी पंतप्रधानांनी डिसेंबर 2016 मध्ये केली होती. 

अटल सेतू  हा पूल 17,840 कोटी रुपयांहून जास्त खर्चाने उभारण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 मार्गिका असलेला पूल आहे, ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल आहे आणि भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल देखील आहे. यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी मिळेल आणि मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारताच्या दिशेने प्रवासाचा वेळही कमी होईल. त्यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यामधील कनेक्टिव्हिटीमध्येही सुधारणा होईल.

 

इतर विकास प्रकल्प

पूर्व मुक्त मार्गावरील  ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्हला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. 9.2 किमीचा हा भुयारी मार्ग 8700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाने बांधण्यात येणार आहे आणि  मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासामधील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे ज्यामुळे ऑरेंज गेट आणि मरिन ड्राईव्ह दरम्यानच्या प्रवासाचे अंतर कमी होईल.

पंतप्रधानांनी सूर्या रिजनल बल्क पेयजल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. 1975 कोटी रुपयांहून अधिक खर्चाने विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, ज्याचा फायदा या भागातल्या सुमारे 14 लाख लोकांना होईल.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी सुमारे 2000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. यामध्ये 'उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे' लोकार्पण समाविष्ट आहे, ज्यामुळे नेरूळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान धावणाऱ्या उपनगरीय सेवांचा आता उरणपर्यंत विस्तार होणार असल्याने नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी  वाढेल. उरण रेल्वे स्थानकापासून खारकोपरपर्यंतच्या ईएमयू रेल्वेच्या उद्घाटनाच्या सेवेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

 

आज लोकार्पण होत असलेल्या इतर रेल्वे प्रकल्पांमध्ये ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स-हार्बर मार्गावरील 'दिघा गाव' हे नवीन उपनगरी स्थानक आणि खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा नवीन 6 वा मार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा मुंबईतील दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होईल.

पंतप्रधानांनी सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन-स्पेशल इकॉनॉमिक झोन (सीप्झ) येथे रत्ने आणि दागिने क्षेत्रासाठी 'भारत रत्नम' (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) चे उद्घाटन केले, जे 3 डी मेटल प्रिंटिंगसह जगातील सर्वोत्तम उपलब्ध यंत्रांसह भारतातील अशा प्रकारचे पहिले सुविधा केंद्र आहे.  यात दिव्यांग विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील कामगारांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी एक प्रशिक्षण शाळा असेल. मेगा सी. एफ. सी. रत्ने आणि दागिन्यांच्या व्यापारातील निर्यात क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवेल आणि देशांतर्गत उत्पादनालाही मदत करेल.

पंतप्रधानांनी सीप्झ एसईझेड येथे न्यू एंटरप्रायझेस अँड सर्व्हिसेस टॉवर (NEST)- 01 चे उद्घाटन केले. NEST- 01 प्रामुख्याने रत्न आणि दागिने क्षेत्रातील उद्योगांसाठी असून,  सध्याच्या स्टॅन्डर्ड डिझाईन फॅक्टरी –I मधून ते पुनर्स्थापित केले जाईल. नवीन टॉवरची रचना मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी आणि उद्योगाच्या मागणीनुसार करण्यात आली आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ केला. महाराष्ट्र राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासाला वाव देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि संतृप्तता साध्य करण्याच्या दिशेनेही हे अभियान प्रयत्न करेल.

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi