“नवीन ऊर्जा, प्रेरणा आणि संकल्पनांसह नवीन पर्वाची सुरुवात होत आहे”
“आज जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे”
“व्यापक प्रमाणावर होत असलेलं स्थानकांचं आधुनिकीकरण हे देशात विकासाच्या नवीन वातावरणाची निर्मिती करेल”
“ही अमृत रेल्वे स्थानकं आपल्या वारशाबद्दल अभिमान बाळगण्याच्या तसंच प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान चेतवण्याच्या भावनेचं प्रतीक ठरतील”
“भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण तसंच त्यांना पर्यावरण अनुकूल बनवण्यावर आमचा भर राहील”
“रेल्वेला चांगली ओळख आणि आधुनिक भवितव्याशी संलग्न करणे ही आता आमची जबाबदारी”
“नवीन भारतात विकास हा युवकांना नवीन संधी पुरवत आहे, तर युवक देशाच्या विकासासाठी नवीन पंख निर्माण करत आहेत”
“ऑगस्ट महिना क्रांती, कृतज्ञता आणि कर्तव्याचा महिना आहे. भारताच्या इतिहासाला नवीन दिशा देणाऱ्या अनेक ऐतिहासिक घटनांचा उगम ऑगस्ट महिन्यातच झाला आहे”
“आपला स्वातंत्र्य दिन हा आपला तिरंगा आणि आपल्या देशाच्या प्रगती बाबत वचनबद्ध असण्यावर भर देण्याची वेळ आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावेळीही आपल्याला प्रत्येक घरी तिरंगा उभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55,  बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37,  मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.

यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की नवीन भारत हा विकसित भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या अमृत काळाची सुरुवात आहे. “यामागे नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि नवीन संकल्प” असल्याचं अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की भारतीय रेल्वेच्या इतिहासात ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. देशातील जवळजवळ 1300 महत्त्वपूर्ण स्थानकांचा आता आधुनिकीकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जात असून या अमृत भारत स्थानकांना आता नवसंजीवनी मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं. या एकूण 1300  स्थानकांपैकी अंदाजित 25000 कोटी रुपये खर्चाच्या 508 अमृत भारत स्थानकांची कोनशीला आज बसवण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशात रेल्वे तसंच सामान्य नागरिकांच्या बरोबरीनं होत असलेला हा पुनर्विकास प्रकल्प म्हणजे एक भव्य मोहीम असेल यावर त्यांनी भर दिला. याचे लाभ देशातल्या सर्व राज्यांपर्यंत पोहोचतील हे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की उत्तर प्रदेशात सुमारे 4000 कोटी रुपये खर्चाच्या 55 अमृत स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.  राजस्थानमधील 55  रेल्वे स्थानकही अमृत स्थानकं होतील. मध्य प्रदेशात सुमारे 1000 कोटी रुपये खर्चाच्या 34 स्थानकांचा,  महाराष्ट्रात 1,500 कोटी रुपये खर्चाच्या 44 स्थानकांचा आणि इतर राज्यांमधल्या स्थानकांसह तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळातल्या महत्त्वाच्या स्थानकांचा विकास या अंतर्गत केला जाणार आहे.पंतप्रधानांनी जगामध्ये वाढत असलेली भारताची  प्रतिष्ठा अधोरेखित केली आणि भारताविषयी वाढत्या जागतिक आस्थेवर प्रकाश टाकला. यासाठी त्यांनी दोन प्रमुख घटकांना श्रेय दिले. पहिले तर, भारतातील जनतेने स्थिर पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणले आणि दुसरे म्हणजे, सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आणि लोकांच्या आकांक्षेनुसार विकासासाठी अथक प्रयत्न केले. भारतीय रेल्वे देखील याचेच प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधानांनी आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी रेल्वे क्षेत्राच्या विस्ताराची वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले की, गेल्या 9 वर्षात देशात टाकलेल्या रेल्वे रुळांची लांबी ही दक्षिण आफ्रिका, युक्रेन, पोलंड, ब्रिटन आणि स्वीडनमधील एकत्रित रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहे. भारतीय रेल्वेच्या विस्ताराचे प्रमाण पाहता पंतप्रधान पुढे म्हणाले की, गेल्या एका वर्षभरात भारताने दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या या देशांच्या एकत्रित रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त रेल्वेमार्ग निर्माण केले. रेल्वे प्रवास सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे त्यांनी आज आवर्जून सांगितले. रेल्वे प्रवासापासून ते रेल्वे स्थानकापर्यंतचा शक्य तितका सर्वोत्तम अनुभव देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे", असे ते म्हणाले. रेल्वे स्थानकांवरची उत्तम आसनव्यवस्था, सुधारित वेटिंग रूम आणि हजारो स्थानकांवर मोफत वायफाय यांचा उल्लेख त्यांनी केला.

भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या मोठ्या घडामोडी अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की,या यशाबद्दल कोणत्याही पंतप्रधानाला लाल किल्ल्यावरून बोलायला आवडले असते. तथापि, आजच्या कार्यक्रमाच्या भव्य आयोजनामुळेच आपण आजच रेल्वेच्या उपलब्धींवर मोठ्या तपशिलाने बोलत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वेचा दर्जा हा आता देशाची जीवनरेखा बनतो आहे असा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला, शहरांची ओळखही आता रेल्वे स्थानकाच्या दर्जावरून होत असून काळाच्या ओघात ही रेल्वे स्थानके शहराचे हृदय बनत चालली आहेत असे नमूद केले. आणि त्यामुळे, या स्थानकांना आधुनिक स्वरूप देणे अत्यावश्यक झाले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, एकाच वेळी इतक्या साऱ्या स्थानकांच्या आधुनिकीकरणामुळे देशात विकासासाठी नवीन वातावरण निर्माण होईल कारण या सर्व कामांमुळे पर्यटकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण व्हायला मदत मिळणार आहे. आधुनिकीकरण झालेल्या या स्थानकांमुळे केवळ पर्यटन क्षेत्रात वाढ होणार नाही तर आसपासच्या भागातील आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे.  ‘एक स्थानक एक उत्पादन’ या योजनेमुळे स्थानिक कारागिरांना मदत होईल आणि जिल्ह्याचे ब्रँडिंग होण्यासही मदत वेळ असे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचा संकल्पही देशाने घेतला आहे असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. “ही अमृत रेल्वे स्थानके एखाद्या वारशाचा अभिमान बाळगण्याचे आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान जागवण्याचे प्रतीक ठरतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, ही अमृत स्थानके भारताच्या सांस्कृतिक आणि स्थानिक वारशाचे दर्शन घडवतील. यासंबंधी उदाहरणे देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, जयपूर रेल्वे स्थानकांवर राजस्थानमधील हवामहल आणि आमेर किल्ल्याची झलक पाहायला मिळेल, जम्मू-काश्मीरमधील जम्मू तवी रेल्वे स्थानक प्रसिद्ध रघुनाथ मंदिरापासून प्रेरणा घेऊन निर्माण करण्यात येईल, तर नागालँड येथील दिमापूर स्थानक या प्रदेशातील 16 विविध जमातीच्या स्थानिक वास्तुकलेचे दर्शन घडवेल. प्रत्येक रेल्वे स्टेशन हे आपल्या प्राचीन वारश्यासह देशाच्या आधुनिक आकांक्षांचे प्रतीक असेल, असे त्यांनी नमूद केले. देशातल्या ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणाऱ्या ‘भारत गौरव यात्रा रेल्वे गाड्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी व्यक्त केला.

देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात रेल्वेची भूमिका अधोरेखित करत, पंतप्रधान म्हणाले, की रेल्वेमध्ये सरकारने विक्रमी गुंतवणूक केली आहे. या वर्षी, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी, 2.5 लाख कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे, जी 2014 च्या तुलनेत पांच पट अधिक आहे. आज रेल्वेच्या संपूर्ण विकासासाठी, सर्वंकष दृष्टिकोन ठेवून काम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. लोकोमोटीव्ह उत्पादनात गेल्या नऊ वर्षात नऊ पट वाढ झाली आहे. आज, 13 पट अधिक प्रमाणात, एचएलबी डबे उत्पादित केले जात आहेत.

ईशान्य भारतात, रेल्वेच्या विस्तारीकरणाबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले, आज या भागात  रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, गेज बदलणे, विद्युतीकरण आणि नवे रेल्वेमार्ग निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. “लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वे मार्गाने जोडल्या जातील.” असेही मोदी यांनी सांगितले. नागालँड राज्याला 100 वर्षांनी, दुसरे रेल्वे स्थानक लाभले, असेही त्यांनी सांगितले. “या भागात रेल्वे मार्गांची उभारणी करण्यात तिप्पट वाढ झाली आहे.” असे ते म्हणाले.

गेल्या नऊ वर्षात, 2200 किमी पेक्षा अधिक लांबीच्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या असून, त्यामुळे मालगाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट झाली आहे. आता,  दिल्ली एनसीआर भागातून, पश्चिमेकडील बंदरात, केवळ 24 तासात माल पोहोचतो, पूर्वी यांसाठी 72 तास लागत असत. इतर मार्गांमधे 40 टक्के घट झाल्याचे दिसत असून, त्याचा मोठा लाभ, उद्योजक, स्वयंरोजगार आणि शेतकऱ्यांना होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

रेल्वे पूल नसल्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधत, पंतप्रधान म्हणाले, की  2014 पूर्वी देशात, 6000 पेक्षा कमी रेल्वे पूल आणि अंडरब्रीज होते, मात्र आज त्यांची संख्या 10,000 पेक्षा अधिक झाली आहे. दीर्घ मार्गांवरील  मानवरहित रेल्वे क्रॉसिंगची संख्या आता शून्यापर्यंत आली आहे, हे ही त्यांनी नमूद केले. प्रवाशांच्या सोयीसुविधांविषयी बोलतांना, वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यावर, विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

“भारतीय रेल्वे अधिकाधिक आधुनिक आणि पर्यावरण स्नेही करण्यावर आम्ही भर देत आहोत.” असे पंतप्रधान म्हणाले. लवकरच, रेल्वेमार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य पूर्ण होईल, त्यानंतर देशातील सर्व रेल्वेगाड्या वीजेवर चालतील, असं त्यांनी सांगितले. सौर पॅनल पासून निर्माण झालेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या स्थानकांची संख्या देखील गेल्या नऊ वर्षात 1200 पर्यंत पोहोचली आहे. नजीकच्या काळात, प्रत्येक रेल्वे स्थानकावरुन हरित ऊर्जा उत्पादन करण्याचेही सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज सुमारे 70,000 डब्यांमधे एलईडी दिवे लावण्यात आले असून, रेल्वेमधील जैव-शौचालयांची संख्या 2014 पासून, 28 पटींनी वाढली आहे, असेही त्यांनी सांगितले.सर्व अमृत स्थानके ही हरित इमारतींची मानके पूर्ण करणारी असतील असे पंतप्रधानांनी  अधोरेखित केले. “वर्ष 2030 पर्यंत भारत असा देश बनेल जिथे रेल्वे गाड्या शून्य कार्बन उत्सर्जन करणाऱ्या असतील,” ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, “गेली अनेक दशके रेल्वे आपल्याला आपल्या आप्तांशी जोडण्याचे काम करत आहे, रेल्वेने देश जोडण्याचे काम केले आहे. आता रेल्वेला चांगली ओळख आणि आधुनिक वैशिष्ट्ये देणे ही आपली जबाबदारी आहे.” नवीन संसद भवन, कर्तव्य पथ, युद्ध स्मारक आणि स्टेच्यू ऑफ युनिटी अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली. “नकारात्मक राजकारणापासून दूर जाऊन, मतपेढीचे राजकारण आणि लांगुलचालन न करता, आम्ही देशाच्या विकासाचे काम एक मिशन म्हणून सुरु केले आणि त्याला सर्वोच्च प्राथमिकता दिली,” ते म्हणाले.

एकट्या रेल्वेने दीड लाखाहून अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पायाभूत सुविधांवर लाखो कोटींची गुंतवणूक करून रोजगारही निर्माण केला जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सध्या केंद्र सरकारही रोजगार मेळ्याच्या माध्यमातून 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी मोहीम राबवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “ विकास युवकांना नवीन संधी देत आहे आणि युवक देशाच्या विकासाला नवीन पंख देत आहेत, हे बदलत्या भारताचे चित्र आहे ”, असे ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि  अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले. प्रत्येक भारतीयासाठी ऑगस्ट महिन्याचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, हा महिना क्रांती, कृतज्ञता आणि कर्तव्याचा महिना असून अनेक ऐतिहासिक प्रसंगांनी भरलेला आहे. या महिन्याने भारताच्या इतिहासाला नवी दिशा दिली आहे. स्वदेशी चळवळीला समर्पित राष्ट्रीय हातमाग दिन 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. “7 ऑगस्ट हा  दिवस प्रत्येक भारतीयासाठी स्थानिक उत्पादनांना प्राधान्य या संकल्पाचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे”, असे मोदी म्हणाले. गणेश चतुर्थीच्या पवित्र सणाचाही त्यांनी उल्लेख केला तसेच गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती वापरून पाहण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. स्थानिक कारागीर, हस्तकला कलाकार आणि लघु उद्योजकांनी बनवलेली उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

9 ऑगस्टच्या संदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत छोडो आंदोलनाची ही ऐतिहासिक तारीख होती. या आंदोलनामुळेच भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात नवी ऊर्जा निर्माण झाली होती. या आंदोलनापासून प्रेरित होऊन आज संपूर्ण देश प्रत्येक वाईट शक्ती, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाला भारत छोडो अशी गर्जना करून सांगत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी आगामी भयावह फाळणी स्मृती दिनाचा उल्लेख केला. ज्यांनी फाळणीची मोठी किंमत मोजली आहे अशा अनेक लोकांचे आपण स्मरण करत असल्याचे ते म्हणाले. फाळणीच्या धक्क्यानंतर स्वतःला सावरुन देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकांचे त्यांनी आभार मानले. हा दिवस आपल्याला आपली एकता अबाधित ठेवण्याच्या जबाबदारीचे स्मरण करून देतो, असे ते म्हणाले. "आपला स्वातंत्र्यदिन हा आपला तिरंगा आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची वेळ आहे, असे ते म्हणाले. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवायचा आहे. प्रसार माध्यमे आणि ध्वज फेरीमधील लोकांच्या उत्साहाची दखल घेत या सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

नागरिकांनी भरलेला कर भ्रष्टाचारात गडप होतो हा समज सरकारने बदलला आहे आणि आज आपला पैसा राष्ट्र उभारणीसाठी वापरला जात आहे असा विश्वास जनतेच्या मनात जागृत झाला आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. वाढत्या सुविधा आणि जीवनमान सुलभतेमुळे कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.काही काळापूर्वी देशात 2 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता मात्र आता 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. असे असूनही, देशात जमा होणाऱ्या आयकराचे प्रमाण वाढत आहे. देशातील मध्यमवर्गाची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याचा स्पष्ट संदेश मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आयकर परतावा भरणाऱ्या लोकांच्या संख्येत यावर्षी 16% वाढ झाली आहे. यातून सरकारवरील विश्वास वाढतो आहे आणि देशात नवोन्मेष होत आहे हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आज देशात रेल्वेला कशी नवसंजीवनी मिळत आहे, मेट्रोचा असा विस्तार होत आहे हे लोक पाहत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी नवीन द्रुतगती मार्ग आणि विमानतळांच्या विकासाचा उल्लेख केला. अशा बदलांमुळे करदात्यांच्या पैशातून नवीन भारत विकसित होत असल्याची भावना निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. “या 508 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण हे देखील या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, अमृत भारत स्थानकांचा हा कायापालट भारतीय रेल्वेला नव्या उंचीवर स्थापित करेल अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

पार्श्वभूमी

नागरिकांना अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यावर पंतप्रधानांनी नेहमीच भर दिला आहे. देशभरातील लोकांसाठी रेल्वे हे वाहतुकीचे प्रथम पसंतीचे साधन असल्याचे नमूद करून त्यांनी रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. या दृष्टीकोनातून मार्गदर्शित होऊन, देशभरात 1309 स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू करण्यात आली.

या योजनेचा एक भाग म्हणून पंतप्रधानांनी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली आहे. 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून या स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. शहराच्या दोन्ही बाजूंचे योग्य एकत्रीकरण करत या स्थानकांचा ‘सिटी सेंटर’ म्हणून विकास करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. हा एकात्मिक दृष्टीकोन रेल्वे स्थानकाभोवती केंद्रित असलेल्या शहराच्या सर्वांगीण नागरी विकासाच्या सर्वांगीण दृष्टीद्वारे चालवला जातो.

ही 508 स्थानके 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत, ज्यात उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 55, बिहारमधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगालमधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओडिशामधील 25, पंजाबमधील 22 स्थानके आहेत. तर गुजरात आणि तेलंगणामधील प्रत्येकी 21, झारखंडमधील 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील प्रत्येकी 18, हरियाणामधील 15, कर्नाटकमधील 13 स्थानके आहेत.

स्थानकांच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांना सुव्यवस्थित वाहतूक संचलन, आंतर-मॉडल एकात्मीकरण आणि दिशादर्शक संकेत यासोबतच आधुनिक प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाच्या इमारतींचे डिझाइन स्थानिक संस्कृती, वारसा आणि वास्तुकला यांच्यापासून प्रेरित असेल.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi