पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमात त्यांनी पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत लाभांचे देखील वितरण केले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ केला आणि ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना देखील सुरू केली. त्यांनी दोन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधानांनी यवतमाळ शहरात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण केले. या कार्यक्रमात देशभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला वंदन केले आणि भूमीपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये देखील चाय पे चर्चा या कार्यक्रमासाठी आले असताना जनतेने दिलेल्या आशीर्वादांचे त्यांनी स्मरण केले. त्यांनी लोकांना पुन्हा एकदा त्यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. माता आणि भगिनींच्या आशीर्वादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजवटीला 350 वर्षे पूर्ण झाल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी त्यांच्या राज्याभिषेक सोहळयाची आठवण काढली आणि म्हणाले की महाराजांनी राष्ट्रीय भावना आणि सामर्थ्याला सर्वात जास्त महत्त्व दिले आणि त्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. विद्यमान सरकार त्यांच्या आदर्शांवर वाटचाल करत आहे आणि नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी एका मोहिमेच्या स्वरुपात काम करत असल्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.
“गेल्या दहा वर्षात केलेल्या सर्व कामांमुळे पुढील 25 वर्षांचा पाया घातला जात आहे” पंतप्रधान मोदी म्हणाले. “ भारताचा प्रत्येक कोपरा विकसित भारत बनवण्याचा माझा संकल्प आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक कण आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण या संकल्पाला समर्पित आहे”
पंतप्रधानांनी गरीब, युवा, महिला आणि शेतकरी या चार सर्वात मोठ्या प्राधान्यक्रमाच्या बाबींचा पुनरुच्चार केला. “ या चौघांच्या सक्षमीकरणामुळे प्रत्येक कुटुंब आणि संपूर्ण समाजाचे सक्षमीकरण सुनिश्चित होईल”, ते म्हणाले. या चौघांच्या सक्षमीकरणासोबत पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमातील प्रकल्पांचा संबंध जोडला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा, गरिबांसाठी पक्की घरे, ग्रामीण महिलांना आर्थिक मदत आणि युवा वर्गाच्या भवितव्यासाठी पायाभूत सुविधांचा उल्लेख केला.
शेतकरी, आदिवासी आणि गरजूंना आधीच्या सरकारांच्या कार्यकाळात दिल्या जाणाऱ्या अर्थसाहाय्यातील गळतीवर टीका करत पंतप्रधानांनी या सर्वांच्या विपरित आजच्या काळात केवळ एक बटण दाबून पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचे वितरण होत असल्याची बाब अधोरेखित केली आणि ही मोदी यांची गॅरंटी असल्याकडे निर्देश केला.
“गरिबांना त्यांच्या हक्काचा वाटा आज मिळत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारची डबल गॅरंटी अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेगळे 3800 कोटी रुपये मिळाले असून त्यामुळे या राज्यातील सुमारे 88 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपये मिळाले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. यापैकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 30,000 कोटी रुपये आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या खात्यात 900 कोटी रुपये जमा झाले आहेत. ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 340 रुपयांची वाढ केल्याची देखील त्यांनी माहिती दिली. त्यांनी अन्न साठवणुकीसाठी जगातील सर्वात मोठ्या योजनेचा देखील उल्लेख केला जी अलीकडेच भारत मंडपम येथे सुरू करण्यात आली.
"विकसित भारताच्या निर्मितीसाठी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे अत्यावश्यक आहे", असे पंतप्रधान म्हणाले. खेड्यापाड्यात राहणाऱ्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. मागील सरकारच्या काळात गावांमधील दुष्काळसदृश परिस्थितीत पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्याच्या टंचाईबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, 2104 पूर्वी 100 पैकी केवळ 15 कुटुंबांना नळाने पाणीपुरवठा व्हायचा, ही कुटुंबे गरीब, दलित आणि आदिवासी समुदायातील होती, पाणीटंचाईमुळे महिलांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत होते, असे ते पुढे म्हणाले. मोदींच्या ‘हर घर जल’ या हमीमुळे 100 पैकी 75 कुटुंबांना 4-5 वर्षांत नळाचे पाणी उपलब्ध झाले. महाराष्ट्रात 50 लाखांहून कमी नळ जोडण्या होत्या , ही संख्या आता 1.25 कोटी झाल्याची माहिती त्यांनी दिली. “मोदींची हमी म्हणजे आश्वासनाच्या पूर्ततेची हमी,” असे ते पुढे म्हणाले.
पूर्वीच्या काळातील प्रलंबित 100 सिंचन प्रकल्पांचा संदर्भही त्यांनी दिला. त्यापैकी 60 प्रकल्प गेल्या 10 वर्षांत पूर्ण झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. “शेतकरी कुटुंबांच्या दु:खामागे कोण आहे हे जाणून घ्यायचा हक्क विदर्भातील शेतकऱ्यांना आहे ”, असे पंतप्रधान म्हणाले. 26 प्रलंबित सिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील होते, त्यापैकी 12 प्रकल्प सरकारने पूर्ण केले आहेत आणि इतर प्रकल्पांवरही काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 50 वर्षांनंतर पूर्ण झालेला निळवंडे धरण प्रकल्प, कृष्णा कोयना आणि टेंभू प्रकल्प आणि गोसीखुर्द प्रकल्पाची उदाहरणे पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधान कृषी सिंचाई आणि बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्याला आज 51 प्रकल्प समर्पित करण्यात आले.
खेड्यापाड्यातून लखपती दीदी तयार करण्याच्या मोदींच्या हमीबद्दल ते म्हणाले की 1 कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आधीच गाठले गेले आहे आणि यंदाच्या अर्थसंकल्पात लखपती दीदींची संख्या 3 कोटीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. बँकेकडून 8 लाख कोटी रुपये आणि केंद्र सरकारच्या 40,000 कोटी रुपयांच्या विशेष निधीसह 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी संबंधित आहेत. याचा महाराष्ट्रातील लाखो महिलांना फायदा झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात महिलांना अनेक ई-रिक्षाही दिल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या कामाबद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले. त्यांनी नमो ड्रोन दीदी योजनेचाही उल्लेख केला. सरकारकडून या योजनेद्वारे महिलांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे आणि कृषी वापरासाठी ड्रोन देखील दिले जातील.
पंतप्रधानांनी आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले. उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन गेल्या 10 वर्षात गरीबांना समर्पित केलेल्या मोफत अन्नधान्य हमी आणि मोफत वैद्यकीय उपचार अशा प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांनी दिली. आज महाराष्ट्रातील 1 कोटी कुटुंबांना आयुष्मान कार्ड देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. गरिबांसाठी पक्क्या घरांचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी इतर मागासवर्गीयांच्या(ओबीसी) कुटुंबांसाठी घरांच्या योजनेचा उल्लेख केला. ही योजना आज सुरू झाली असून 10 हजार ओबीसी कुटुंबांना त्यामुळे पक्की घरे मिळतील, असे त्यांनी सांगितले.
“ज्यांची कधीही काळजी घेतली गेली नाही, त्यांची मोदींनी केवळ काळजी घेतली नाही तर त्यांची पूजाही केली”, असे पंतप्रधान म्हणाले. हस्तकला कारागीरांसाठी 13,000 कोटी रुपयांची विश्वकर्मा योजना आणि आदिवासींसाठी 23,000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान जनमन योजनेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पंतप्रधान जनमन योजनेमुळे कातकरी, कोलाम आणि माडिया यासह महाराष्ट्रातील अनेक आदिवासी समुदायांचे जीवन सुसह्य, सुकर होईल. गरीब, शेतकरी, युवक आणि नारी शक्ती यांना सक्षम करण्याची ही मोहीम आणखी तीव्र होणार आहे आणि पुढील 5 वर्षात विदर्भातील प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिक वेगवान विकास होईल, असा विश्वास भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संसद, विधानसभा, विधानपरिषद आणि राज्य सरकारातील सदस्य यावेळी उपस्थित होते. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले.
पार्श्वभूमी
शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण दाखवून देणारे पाऊल उचलत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) अंतर्गत 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा 16 वा हप्ता यवतमाळ येथील सार्वजनिक कार्यक्रमात लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जारी करण्यात आला. या द्वारे 3 लाख कोटींहून अधिक रक्कम, 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ताही वितरित केला, ज्याचा महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळाला . ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये अतिरिक्त रक्कम प्रदान करते.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा परिवर्ती निधी वितरित केला. ही रक्कम राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत भारत सरकारने प्रदान केलेल्या फिरत्या निधीव्यतिरिक्त आहे. बचत गटांना परिवर्ति पद्धतीने पैसे देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण स्तरावर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म-उद्योगांना प्रोत्साहन देऊन गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी हा फिरता निधी दिला जातो. सर्व सरकारी योजनांच्या 100 टक्के संपृक्ततेचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी आणखी एक पाऊल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण सुरू केले.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू केली. या योजनेत आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागांना लाभ देणारे अनेक सिंचन प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजना अंतर्गत 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केले आहेत.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रात 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही केले. प्रकल्पांमध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज लाईन (वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा भाग) आणि नवीन आष्टी-अमळनेर ब्रॉडगेज लाईन (अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा भाग) यांचा समावेश आहे. नवीन ब्रॉडगेज लाइन्समुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागांचा रेल्वे संपर्क सुधारेल आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी दोन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये कळंब आणि वर्धा यांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा आणि अमळनेर आणि नवीन आष्टीला जोडणाऱ्या रेल्वे सेवेचा समावेश आहे. या नवीन रेल्वे सेवेमुळे रेल्वे संपर्क सुधारण्यास मदत होईल आणि या भागातील विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना फायदा होईल.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकट करण्यासाठी अनेक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. प्रकल्पांमध्ये एनएच-930 च्या वरोरा-वणी विभागाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे; साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोरा या महत्त्वाच्या रस्त्यांसाठी रस्ते उन्नतीकरण प्रकल्प यात समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हीटी सुधारेल , प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
मैंने भारत के कोने-कोने को विकसित बनाने का संकल्प लिया है।
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024
इस संकल्प की सिद्धि के लिए शरीर का कण-कण, जीवन का क्षण-क्षण, समर्पित है: PM @narendramodi pic.twitter.com/oLmVTGw57Q
विकसित भारत के लिए गांव की अर्थव्यवस्था का सशक्त होना बहुत ज़रूरी है: PM @narendramodi pic.twitter.com/6YGwKL2bLA
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024
पंडित दीनदयाल उपाध्याय जी अंत्योदय के प्रेरणा पुरुष है। उनका पूरा जीवन गरीबों के लिए समर्पित रहा है। pic.twitter.com/bhGkYIop66
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024