पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील थुथुकुडी येथे 17,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्राला अर्पण केले. पंतप्रधानांनी व्ही.ओ.चिदंबरनार बंदर येथे आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलची पायाभरणी केली. हरित नौका उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी देशांतर्गत जलमार्गाने चालणाऱ्या भारतातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील जहाजाचा प्रारंभ केला. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 75 दीपगृहांमधील पर्यटन सुविधांचे राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी वंची मनियाच्ची - तिरुनेलवेली विभाग आणि मेलाप्पलयम - अरल्वायमोली विभागातील रेल्वे प्रकल्पासह वांची मनियाच्ची - नागरकोइल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे देखील राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये सुमारे 4,586 कोटी रुपये खर्चून विकसित केलेले चार रस्ते प्रकल्पांचे लोकार्पणही केले.
विकसित भारताचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आगेकूच करत अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी याद्वारे तमिळनाडू थुथुकुडीमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे, असे पंतप्रधानांनी या कार्यक्रमात बोलतांना सांगितले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचा आविष्कार आपल्याला दिसून येतो, असेही ते म्हणाले. हा प्रकल्प थुथुकुडीमध्ये असला तरीही, यामुळे भारताच्या विविध भागांच्या विकासाला गती मिळेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
विकसित भारताचा प्रवास आणि त्यात तामिळनाडूच्या भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी आपण 2 वर्षांपूर्वी चिदंबरनार बंदराला भेट देऊन बंदराच्या क्षमतेच्या विस्तारासाठी अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवल्याची आणि त्या भेटीत हे बंदर नौवहनाचे प्रमुख केंद्र बनवण्याचे वचन दिल्याची आठवण करून दिली. ती गॅरंटी आज ते पूर्ण होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या प्रकल्पात 7,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार आहे असे पंतप्रधानांनी व्ही.ओ.चिदंबरनार बंदरात आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलच्या पायाभरणीबद्दल बोलताना सांगितले. आज 900 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प समर्पित करण्यात आले आहेत तर 13 बंदरांवर 2500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली असेही पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे तामिळनाडूला मोठा फायदा होईल आणि राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.
आज पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलेले विकास प्रकल्प लोकांच्या मागण्यांवरून सरकारकडून सुरू करण्यात आले असून यापूर्वीच्या सरकारांनी या मागण्यांकडे कधीही लक्ष दिले नाही, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. “ या तामिळनाडूची सेवा करण्यासाठी आणि त्याचे भाग्य बदलण्यासाठी मी या भूमीत आलो आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
हरित नौका उपक्रमांतर्गत, देशांतर्गत जलमार्गाने चालणाऱ्या भारतातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील जहाजाबाबत बोलताना, पंतप्रधानांनी हा काशीवासीयांकडून तामिळनाडूच्या लोकांसाठी उपहार असल्याचे सांगितले. काशी तामिळ संगमम् कार्यक्रमामध्ये आपण तमिळनाडूच्या लोकांचा उत्साह आणि आपुलकी अनुभवली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. व्ही.ओ.चिदंबरनार बंदराला देशातील पहिले हरित हायड्रोजन हब बंदर बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या इतर विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांमध्ये विलवणीकरण संयत्र, हायड्रोजन उत्पादन आणि बंकरिंग सुविधा यांचा समावेश आहे. "जग आज शोधत असलेल्या पर्यायांच्या क्षेत्रात तामिळनाडू खूप पुढे जाईल", असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी आजच्या रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पांवरही प्रकाश टाकला. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण यामुळे दक्षिण तामिळनाडू आणि केरळमधील संपर्क सुविधा आणखी सुधारेल, तसेच तिरुनेलवेली आणि नागरकोइल क्षेत्रातील गर्दी देखील कमी होईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील रस्त्यांच्या आधुनिकीकरणासाठी 4,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या चार मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख केला आणि यामुळे संपर्क सुविधा सुधारेल, त्यासोबतच प्रवासाचा वेळ कमी होईल आणि राज्यातील व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.
तामिळनाडूमध्ये उत्तम संपर्क सुविधा आणि सुयोग्य संधी निर्माण करण्यासाठी रेल्वे, महामार्ग आणि जलमार्ग विभाग काम करत आहेत, असे पंतप्रधानांनी नव भारताच्या ‘होल ऑफ गव्हर्मेंट’ दृष्टिकोनाचा संदर्भ देत सांगितले. म्हणूनच रेल्वे, रस्ते आणि सागरी प्रकल्प एकत्रितपणे सुरू केले जात आहेत. बहुविध पद्धती दृष्टिकोनामुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी मन की बातच्या एका भागात, देशातील प्रमुख दीपगृहे पर्यटन स्थळांच्या रुपात विकसित करण्याच्या त्यांच्या सूचनेचे स्मरण केले आणि 10 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील 75 दीपगृहांमध्ये पर्यटन सुविधा समर्पित करत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. “एकाच वेळी 75 ठिकाणी विकास, हा नव भारत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आगामी काळात ही 75 ठिकाणे मोठी पर्यटन केंद्रे बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या 10 वर्षांत तामिळनाडूमध्ये 1300 किलोमीटर लांबीचे रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांबाबत बोलताना दिली. 2000 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, विविध ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपासची निर्मिती तसेच अनेक रेल्वे स्थानकांचे अद्यतनीकरण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या पाच वंदे भारत ट्रेन तामिळनाडूमध्ये धावत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारत सरकार तामिळनाडूच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. "संपर्क सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे राहणीमान सुलभ होत आहे", हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
जलमार्ग आणि सागरी क्षेत्राकडून अनेक दशकांपासून भारताच्या मोठ्या आकांक्षा असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले आणि हे क्षेत्र आज विकसित भारताचा पाया बनत आहेत तसेच संपूर्ण दक्षिण भारतासह तामिळनाडू याचा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तीन प्रमुख बंदरे आणि 12 हून अधिक लहान बंदरांवरच्या स्थितीवर प्रकाश टाकला आणि दक्षिणेकडील सर्व राज्यांच्या या संदर्भातील शक्यता अधोरेखित केल्या. “सागरी क्षेत्राचा विकास म्हणजे तामिळनाडू सारख्या राज्याचा विकास”, असे पंतप्रधान म्हणाले, गेल्या दशकात व्ही.ओ.चिदंबरनार बंदरावरील वाहतुकीत 35 टक्के वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले की, बंदराने गेल्या वर्षी 38 दशलक्ष टन सामुग्री पाठवत(हाताळत) व्यवहारात वार्षिक 11 टक्के वाढ नोंदवली.सागरमाला सारख्या प्रकल्पांच्या भूमिकांना याचे श्रेय देत पंतप्रधान मोदी म्हणाले,
“देशातील इतर प्रमुख बंदरांवरही असेच परिणाम दिसून येतील”.
जलमार्ग आणि सागरी क्षेत्रात भारत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारताने 38 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि एका दशकात बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे. ते पुढे म्हणाले की या कालावधीत राष्ट्रीय जलमार्गात आठ पटीने वाढ झाली आहे आणि समुद्रपर्यटन करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार पटीने वाढली आहे तर खलाशांची संख्या दुप्पट झाली आहे.
या प्रगतीचा तामिळनाडू आणि आमच्या युवावर्गाला निश्चितच लाभ होईल, असे सांगत ते पुढे म्हणाले. "मला खात्री आहे की तामिळनाडू विकासाच्या मार्गावर पुढे जाईल आणि मी तुम्हाला हमी देतो, की जेव्हा देश आम्हाला तिसऱ्यांदा सेवेची संधी देईल तेव्हा मी नवीन ऊर्जेने तुमची सेवा करीन."
तामिळनाडूच्या विविध भागातील लोकांचे प्रेम, आपुलकी, उत्साह आणि आशीर्वाद याच्या यावेळी आलेल्या अनुभवांविषयी बोलताना पंतप्रधानांनी सरकारची बांधिलकी अधोरेखित केली आणि सांगितले, की लोकाचे हे आपुलकीचे नाते ते राज्याच्या विकासाशी जोडत आहेत.
शेवटी, पंतप्रधानांनी प्रत्येकाला आपापल्या फोनमधील लाइट सुरू करण्यास सांगितले आणि त्यायोगे तामिळनाडू आणि भारत सरकार विकासाचा उत्सव साजरा करत असल्याचे पंतप्रधानांनी सूचित केले.
तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर. एन. रवी, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी व्हीओ चिदंबरनार बंदर येथे आऊटर हार्बर कंटेनर टर्मिनलची आज पायाभरणी केली. हे कंटेनर टर्मिनल व्हीओ.चिदंबरनार बंदराला पूर्व किनाऱ्याचे ट्रान्सशिपमेंट हबमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे. भारताच्या लांब किनारपट्टीचा आणि अनुकूल भौगोलिक स्थानाचा लाभ घेणे आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता मजबूत करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढही होईल. व्हीओ चिदंबरनार बंदर हे देशातील पहिले हरीत हायड्रोजन हब बंदर बनवण्याच्या उद्देशाने इतर विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांनी उदघाटन केले. या प्रकल्पांमध्ये डिसेलिनेशन प्लांट, हायड्रोजन उत्पादन, बंकरिंग सुविधा इत्यादींचा समावेश आहे.
हरित नौका उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल अंतर्देशीय जलवाहिनीचेही उदघाटन केले. या जहाजाची निर्मिती कोचीन शिपयार्डने केली आहे आणि स्वच्छ ऊर्जा उपाय स्वीकारण्यासाठी आणि देशाच्या निव्वळ-शून्य वचनबद्धतेला संरेखित करण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल असल्याचे अधोरेखित केले आहे. पंतप्रधानांनी 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 75 दीपगृहांसाठी विशेष पर्यटन सुविधांचेही लोकार्पण केले.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी वांची मनियाच्ची - नागरकोइल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी वंची मनियाच्ची - तिरुनेलवेली विभाग आणि मेलापलायम - अरल्वायमोली विभागासह देशाला समर्पित केलेले रेल्वे प्रकल्पाचे लोकार्पण केले. सुमारे 1,477 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला,हा दुहेरीकरण प्रकल्प कन्याकुमारी, नागरकोइल आणि तिरुनेलवेली येथून चेन्नईकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यात मदत करेल.
पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये सुमारे 4,586 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या चार रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये NH-844 च्या जित्तांदहल्ली-धर्मपुरी विभागाचे चौपदरीकरण, NH-81 च्या मीनसुरत्ती-चिदंबरम विभागात दोन्ही बाजूंना बांध घालून केलेले दुपदरीकरण,.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -83 चा ओद्दानचात्रम -माडाठुकुलम विभागाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-83 च्या नागापट्टिनम-तंजावूर विभागाच्या पक्क्या बांधकामासह दुहेरीकरण यांचा समावेश आहे.या प्रकल्पांचा उद्देश दळणवळण सुधारणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, सामाजिक-आर्थिक विकास करणे आणि या प्रदेशातील तीर्थयात्रा सुलभ करणे हा आहे.
Today, Tamil Nadu is writing a new chapter of progress in Thoothukudi.
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024
Many projects are being inaugurated or having foundation stones laid: PM @narendramodi pic.twitter.com/Z8NsYdVfBM
Tamil Nadu will play a crucial role in India's journey of becoming a 'Viksit Bharat'. pic.twitter.com/9s9uno0nET
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024
Today, the country is working with the 'whole of government' approach. pic.twitter.com/QNcRHViFIx
— PMO India (@PMOIndia) February 28, 2024