पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी स्थित आरामबाग येथे 7,200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. आजचे विकासात्मक प्रकल्प रेल्वे, बंदरे, तेल पाईपलाईन, एलपीजी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी 21 व्या शतकातील भारताचा वेगवान विकास आणि 2047 पर्यंत भारत विकसित करण्याच्या संकल्पाचा उल्लेख केला. त्यांनी युवक, महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार केला. "आम्ही नेहमीच गरिबांच्या कल्याणासाठी झटलो आहोत आणि त्याचे परिणाम आता जगाला दिसत आहेत" असे ते म्हणाले. 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले , यातून सरकारची दिशा, धोरणे आणि निर्णय यांची अचूकता दिसून येते यावर त्यांनी भर दिला. या सगळ्याचे मुख्य कारण म्हणजे हेतू योग्य आहे, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगालच्या विकासासाठी 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली असून यात रेल्वे, बंदरे, पेट्रोलियम आणि जलशक्ती या क्षेत्रांचा समावेश आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "केंद्र सरकार देशाच्या इतर भागांप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे" असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी झाडग्राम - सलगाझरी यांना जोडणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचा उल्लेख केला . यामुळे या प्रदेशातील पर्यटन आणि उद्योगाला प्रोत्साहन मिळेल आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल. त्यांनी सोंडालिया-चंपापुकुर आणि डंकुनी-भट्टनगर-बाल्टिकुरी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचाही उल्लेख केला. कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा विकास प्रकल्प तसेच 1,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे तीन अन्य प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
हल्दिया-बरौनी क्रूड पाईपलाईनचे उदाहरण देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “पर्यावरणाशी सुसंवाद राखून विकास कसा घडवता येतो हे भारताने जगाला दाखवून दिले आहे.” या पाईपलाईनद्वारे बिहार, झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांमध्ये कच्चे तेल वाहून नेले जाते आणि त्यातून बचत तसेच पर्यावरण संरक्षण साध्य होते. एलपीजी बॉटलिंग कारखान्यामुळे 7 राज्यांना फायदा होणार असून त्या भागातील ग्राहकांकडून होणारी एलपीजीची मागणी पूर्ण करता येणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे देखील अनेक जिल्ह्यांतील लाखो लोकांचा लाभ होणार आहे.
“कोणत्याही राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची सुरुवात रोजगाराचे बहुविध मार्ग खुले करत असते,” पंतप्रधानांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या विकासासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 13,000 कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली असून ही तरतूद 2014 पूर्वी केल्या जाणाऱ्या तरतुदीच्या तिप्पट आहे अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, प्रवासी सुविधांचे अद्यायावतीकरण आणि रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास यांना सरकारने प्राधान्य दिले आहे असे त्यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांत पूर्ण करण्यात आलेल्या अनेक प्रलंबित प्रकल्पांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की पश्चिम बंगालमधील 3,000 किमीहून अधिक लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून अमृत स्थानक योजनेअंतर्गत तारकेश्वर रेल्वे स्थानकासह राज्यातील सुमारे 100 स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे काम सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये दीडशे नव्या रेल्वे गाड्यांची सुरुवात करण्यात आली असून 5 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या देखील सुरु करण्यात आल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील जनतेच्या योगदानासह विकसित भारताचा संकल्प सिद्धीला जाईल याबाबत विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी आज सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ.सी.व्ही. आनंद बोस तसेच केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
सुमारे 2,790 कोटी रुपये खर्चाने विकसित केलेल्या इंडियन ऑईल कंपनीच्या 518 किमी लांबीच्या हल्दिया-बरौनी क्रूड ऑईल पाईपलाईनचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झाले. ही पाईपलाईन बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून जाते. या पाईपलाईनच्या माध्यमातून बरौनी तेल शुद्धीकरण प्रकल्प , बोंगाईगाव तेल शुद्धीकरण प्रकल्प तसेच गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प यांना सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने कच्च्या तेलाचा पुरवठा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी खरगपूर येथील विद्यासागर औद्योगिक पार्कमध्ये इंडियन ऑईल कंपनीने उभारलेल्या 120 टीएमटीपीए क्षमतेच्या एलपीजी बॉटलिंग कारखान्याचे उद्घाटन देखील केले. सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून उभारण्यात आलेला हा एलपीजी बॉटलिंग कारखाना या भागातील पहिला एलपीजी बॉटलिंग कारखाना आहे. या कारखान्यातून पश्चिम बंगालमधील 14.5 लाख ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा होईल.
पंतप्रधानांनी कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर येथे पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठीच्या सुमारे 1000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. पायाभरणी होणाऱ्या प्रकल्पांमध्ये धक्का(बर्थ) क्रमांक 8 एनएसडीची पुनर्बांधणी आणि कोलकाता गोदी व्यवस्थेच्या धक्का क्रमांक 7 आणि 8 एनएसडी चे यांत्रिकीकरण यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील हल्दिया गोदी संकुल येथे तेलवाहू जहाजांवर अग्निशमन यंत्रणा वाढवण्याचा प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केला. नवीन स्थापित केलेली अग्निशमन सुविधा ही एक अत्याधुनिक पूर्णतः स्वयंचलित यंत्रणा असून ती अत्याधुनिक गॅस आणि फ्लेम सेन्सर्सने सुसज्ज आहे, ज्यामुळे तत्काळ धोका ओळखण्याची खातरजमा करता येते. पंतप्रधानांनी 40 टन वहन क्षमता असलेली हल्दिया गोदी संकुलाची तिसरी रेल माउंटेड क्वे क्रेन चे (RMQC) लोकार्पण केले. कोलकाता मधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर येथील हे नवीन प्रकल्प जलद आणि सुरक्षित रित्या मालाची हाताळणी आणि वाहतूक करण्यात मदत करून बंदराच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ करतील.
पंतप्रधानांनी सुमारे 2680 कोटी रुपयांचे महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. प्रकल्पांमध्ये झारग्राम - सालगझरी (90 किमी) यांना जोडणारा तिसरा रेल्वे मार्ग; सोंडालिया – चंपापुकुर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (24 किमी); आणि डनकुनी-भट्टानगर-बाल्टिकुरी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (9 किमी) समाविष्ट आहे. हे प्रकल्प या प्रदेशातील रेल्वे वाहतूक सुविधांचा विस्तार करतील, गतिशीलता सुधारतील आणि मालवाहतुकीची अखंड सेवा सुलभ करतील ज्यामुळे या प्रदेशात आर्थिक आणि औद्योगिक वाढ होईल.
पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील सांडपाणी प्रक्रिया आणि मलनिस्सारणाशी संबंधित तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. सुमारे 600 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या या प्रकल्पांना जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे. प्रकल्पांमध्ये इंटरसेप्शन आणि डायव्हर्शन (आय अँड डी) कामे आणि हावडा येथील 65 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि 3.3 किमीचे सांडपाणी व्यवस्थापन जाळे; बल्ली येथे आय अँड डी कामे आणि 62 एमएलडी क्षमतेचे एसटीपी आणि आणि 11.3 किमीचे सांडपाणी व्यवस्थापन जाळे, आणि कामरहटी आणि बारानगर येथे आय अँड डी कार्ये आणि 60 एमएलडी क्षमतेचे एसटीपी आणि 8.15 किलोमीटरचे सांडपाणी व्यवस्थापन नेटवर्क चा समावेश आहे.
21वीं सदी का भारत तेज गति से आगे बढ़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) March 1, 2024
हम सभी ने मिलकर 2047 तक विकसित भारत बनाने का लक्ष्य तय किया है: PM @narendramodi pic.twitter.com/7XWbTmIqKw
हमारा प्रयास है कि पश्चिम बंगाल में रेलवे का आधुनिकीकरण उसी रफ्तार से हो, जैसे देश के दूसरे हिस्सों में हो रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/sNW5La8Qhf
— PMO India (@PMOIndia) March 1, 2024
भारत ने दुनिया को दिखाया कि पर्यावरण के साथ तालमेल बिठाकर विकास कैसे किया जा सकता है: PM @narendramodi pic.twitter.com/kJXrEkmbNl
— PMO India (@PMOIndia) March 1, 2024