पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ओदिशामधील 8,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पुरी आणि हावडा दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना करणे , पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी, ओदिशातील रेल्वेच्या जाळ्याचे 100% विद्युतीकरण, संबलपूर-तितलागड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अंगुल - सुकिंदा दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; मनोहरपूर - रुरकेला - झारसुगुडा - जामगा यांना जोडणारी तिसरी लाईन आणि बिच्छुपली - झरतरभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन यांचा या प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना आज वंदे भारत एक्सप्रेस भेट स्वरूपात दिली जात आहे; जी आधुनिक आणि महत्वाकांक्षी भारताचे प्रतीक आहे. “जेव्हा वंदे भारत गाडी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धावते तेव्हा भारताची गती आणि प्रगती दिसून येते” असे सांगत पंतप्रधान म्हणाले की ही गती आता ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पहायला मिळेल. यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या उत्तम अनुभवाबरोबरच विकासाचा अर्थ पूर्णपणे बदलेल. देव दर्शनासाठी कोलकाता ते पुरी प्रवास असो किंवा इतर मार्गाने प्रवास असो, प्रवासाचा वेळ आता केवळ साडेसहा तासांवर येईल, त्यामुळे वेळेची बचत होईल, व्यवसायाच्या संधी वाढतील आणि तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील असे पंतप्रधान म्हणाले.
लांबचा प्रवास करू इच्छिणाऱ्या कोणाही नागरिकासाठी रेल्वेला पहिली पसंती आणि प्राधान्य असते असे पंतप्रधान म्हणाले. ओदिशातील रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणाचे तसेच रेल्वे मार्गांच्या 100 टक्के विद्युतीकरण कामाचे लोकार्पण त्याचबरोबर पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासह इतर रेल्वे विकास प्रकल्पांचाही उल्लेख केला ज्यांची आज पायाभरणी करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या युगाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी देशाची एकता आणि अखंडता अधिक मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की जर देश संपूर्णपणे एकसंध राहिला तर देशाच्या एकत्रित क्षमता देशाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवतील. वंदे भारत हे अशाच विश्वासाचे प्रतिबिंब आहे कारण यामध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे नेत या गाड्या देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून कार्य करत आहेत. “भारतीय रेल्वे प्रत्येक देशवासियाला जोडते आणि एकमेकांशी बांधून ठेवते आणि याच कल्पनेसह आणि विचारासह वंदे भारत एक्सप्रेस देखील मार्गक्रमण करणार आहे,” पंतप्रधान म्हणाले. ही गाडी पुरी आणि हावडा या शहरांमधील अध्यात्मिक तसेच सांस्कृतिक बंध आणखी मजबूत करेल असे त्यांनी पुढे सांगितले. देशाच्या विविध राज्यांमधून याआधीच पंधरा वंदे भारत गाड्या चालविल्या जात असून त्यांच्या द्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की नजीकच्या काही काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील भारताने विकासाची गती कायम राखली आहे. या काळात प्रत्येक राज्याच्या सहभागाबद्दल त्यांना श्रेय देत पंतप्रधान मोदी म्हणाले की,आपला देश प्रत्येक राज्याला सोबत घेऊन प्रगती करतो आहे.
पंतप्रधान म्हणाले की आता देशात पूर्वीची परिस्थिती राहिलेली नसून नवीन भारत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करु लागला आहे आणि हे तंत्रज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत देखील आहे. वंदे भारत गाड्यांच्या स्वदेशी निर्मितीचा संदर्भ देत, देशाने 5जी सारखे तंत्रज्ञान आणि महामारीच्या काळात लसी विकसित केल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. अशा प्रकारचे नवोन्मेष एका राज्यापुरते किंवा शहरापुरते सीमित ठेवण्यात आले नसून त्याचा लाभ संपूर्ण देशाला समान पद्धतीने मिळेल याची दक्षता घेण्यात आली ही बाब त्यांनी अधोरेखित केली. याच प्रकारे, वंदे भारत गाड्या देखील देशाच्या सगळ्या भागांमध्ये पोहोचत आहेत असे ते म्हणाले.
विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या राज्यांना ‘सर्वांची सोबत, सर्वांचा विकास’या धोरणाचा विशेष लाभ होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. ओदिशा राज्यातील रेल्वे योजनांसाठीची तरतूद लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत ओदिशामध्ये दर वर्षी केवळ 20 किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग निर्माण केले जात होते, मात्र वर्ष 2022-23 मध्ये केवळ एका वर्षात राज्यात 120 किलोमीटरलांबीच्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. खुर्दा बोलांगीर मार्ग तसेच हरिदासपूर-परादीप मार्ग हे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहेत.
“ज्या राज्यांमध्ये रेल्वे मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, अशा राज्यांमध्ये ओदिशाचा समावेश होतो,” पंतप्रधानांनी टिप्पणी केली. अशाच प्रकारची कामगिरी पश्चिम बंगालमध्ये करून दाखवण्यासाठी वेगाने काम सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, अशा पद्धतीच्या कामांमुळे देशातील रेल्वे गाड्यांचा एकंदर वेग वाढला आहे आणि त्यामुळे मालवाहतुकीसाठी लागणाऱ्या वेळेत देखील बचत झाली आहे.
रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणामुळे डिझेल वर चालणाऱ्या इंजिनाच्या वापरात लक्षणीयरीत्या घट झाल्यानंतर त्यामुळे होणारे प्रदूषण कमी होऊन खनिज संपत्तीने समृद्ध अशा ओदिशा राज्याला लाभ होईल आणि राज्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.
पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मिती संदर्भातील काहीशा अपरिचित आणि अधिक बोलले जात नसलेल्या पैलूला देखील त्यांनी स्पर्श केला. पायाभूत सेवा या केवळ लोकांचे जीवन सोपे करत नाहीत तर समाजाचे सक्षमीकरण करतात, असे ते म्हणाले. “जेव्हा पायाभूत सेवांची कमतरता असते, तेव्हा लोकांचा विकास खुंटतो. जेव्हा पायाभूत सेवा विकसित केल्या जातात, तेव्हा एकाच वेळी लोकांचा गतिमान विकास होतो", असे पंतप्रधान म्हणाले. विकास उपक्रमांविषयी सांगताना पीएम सौभाग्य योजनेचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले ज्याअंतर्गत सरकारने 2.5 कोटींहून घरांना मोफत वीज जोडणी दिली आहे, ज्यात ओदिशातील सुमारे सुमारे 25 लाख घरांसह आणि पश्चिम बंगालमधील 7.25 लाख घरे आहेत.
देशातील विमानतळाच्या संख्येत आज 75 वरून 150 इतकी वाढ झाली आहे असे सांगून देशातील सर्वसामान्य नागरिक आपल्या विमानप्रवासाचा अनुभव शेअर करतानाच्या समाज माध्यमांवरील छायाचित्रांकडे त्यांनी लक्ष वेधले.
पायाभूत सुविधा क्षेत्रातील भारताची प्रगती हा आता अभ्यासाचा विषय बनला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाते तेव्हा लाखो रोजगार निर्माण होतात आणि रेल्वे आणि महामार्ग संपर्क यंत्रणा तर प्रवास सुलभतेच्या सर्व परिमाणांच्या पलीकडे जाते, यामुळे शेतकरी नवीन बाजारपेठांशी जोडले जातात, पर्यटक, नवीन पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित होतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळते.
देश "जन सेवा हीच ईश्वर सेवा " या भावनेने मार्गक्रमण करत आहे. जिथे शतकानुशतके प्रसाद वाटला जातो आणि हजारो गरीब लोकांना जेवण दिले जाते अशी श्री जगन्नाथ सारखी मंदिरे आणि पुरी सारख्या तीर्थक्षेत्रांचा उल्लेख त्यांनी केला. त्याच भावनेतून पी एम गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले आणि आयुष्मान कार्ड, उज्वला, जल जीवन अभियान आणि पीएम आवास योजना सारखे उपक्रम सुरु करण्यात आले. "आज गरिबांना त्या सर्व मूलभूत सुविधा मिळत आहेत ज्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली" असे ते म्हणाले.
साधनांच्या अभावी कोणतेही राज्य विकासाच्या शर्यतीत मागे राहू नये, यासाठीच्या देशाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की "भारताच्या गतिमान प्रगतीसाठी राज्यांचा संतुलित विकास हा तितकाच आवश्यक आहे" त्यासाठीच पंधराव्या वित्त आयोगाने ओदिशा आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांसाठी वाढीव अर्थसंकल्पाची शिफारस केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
ओदिशाची भूमी नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे, मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इथली जनता, आपल्याच नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्यापासून वंचित राहिली, असे पंतप्रधानांनी नमूद केले. केंद्र सरकारने खनिज संपत्ती लक्षात घेऊन, खाणकाम धोरणात ज्या सुधारणा केल्या, त्यामुळे, ज्या ज्या राज्यात खाणी आहेत, अशा राज्यांच्या महासूलात लक्षणीय वाढ झाली, असे ते पुढे म्हणाले. तसेच जीएसटी आल्यानंतर करांपासून मिळणाऱ्या महसूलात देखील वाढ झाली. या सगळ्या स्त्रोतांचा उपयोग, राज्याच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या सेवेसाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले. “ओदिशामध्ये सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटांवर हे राज्य यशस्वीपणे मात करु शकेल, हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण लक्ष देत आहे” असे पंतप्रधान म्हणाले. याच संदर्भात, केंद्राने राज्याला आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ साठी 8 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण देशातील प्रगतीचा वेग पुढेही असाच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. या विकासातूनच, आपल्याला नवा आणि विकसित भारत घडवण्याचे पाठबळ मिळणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
यावेळी ओदिशाचे राज्यपाल गणेशीलाल, मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी उपस्थित होते.
पार्श्वभूमी :
पुरी आणि हावडा दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वेगाडी ओदिशातील खोरधा, कटक, जाजपूर, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यांमधून आणि पश्चिम बंगालमधील पश्चिम आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून जाईल. ही गाडी रेल्वे प्रवाशांना जलद, अधिक आरामदायी आणि अधिक सुलभ प्रवासाचा अनुभव देईल, पर्यटनाला चालना देईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासालाही प्रोत्साहन देईल.
पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांनी यावेळी केली. पुनर्विकसित स्थानकांमध्ये रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा असतील.
ओदिशातील रेल्वे जाळ्याच्या 100% विद्युतीकरण कार्याचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले. यामुळे कार्यान्वयन आणि देखभालीचा खर्च कमी होईल आणि आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल. पंतप्रधानांनी संबलपूर-तितलागड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण तसेच अंगुल-सुकिंदा दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; मनोहरपूर-रौरकेला-झारसुगुडा-जामगा यांना जोडणारी तिसरी लाईन आणि बिच्छुपली-झरतारभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन या विकासकामांचेही लोकार्पण केले. हे प्रकल्प ओदिशातील पोलाद, उर्जा आणि खाण क्षेत्रातील जलद औद्योगिक विकासामुळे वाढलेल्या वाहतुकीच्या गरजांची पूर्तता करतील आणि या रेल्वे विभागांमधील प्रवासी वाहतूक मार्गावर येणारा ताण कमी करतील.
वंदेभारत ट्रेन, आधुनिक भारत और आकांक्षी भारतीय, दोनों का प्रतीक बन रही है। pic.twitter.com/wjtQHsOYiX
— PMO India (@PMOIndia) May 18, 2023
बीते वर्षों में भारत ने कठिन से कठिन वैश्विक हालातों में भी अपने विकास की गति को बनाए रखा है। pic.twitter.com/O8yk4MN0D7
— PMO India (@PMOIndia) May 18, 2023
आज का नया भारत टेक्नोलॉजी भी खुद बना रहा है और नई सुविधाओं को तेजी से देश के कोने-कोने में पहुंचा रहा है। pic.twitter.com/96bQksEbwJ
— PMO India (@PMOIndia) May 18, 2023
जहां infrastructure का विकास होता है, वहां लोगों का विकास भी तेजी से होता है। pic.twitter.com/7v1WRyWENU
— PMO India (@PMOIndia) May 18, 2023
जन सेवा ही प्रभु सेवा। pic.twitter.com/zDsViKHHKt
— PMO India (@PMOIndia) May 18, 2023
भारत के तेज विकास के लिए, भारत के राज्यों का संतुलित विकास भी उतना ही आवश्यक है। pic.twitter.com/UnU4xvlMaD
— PMO India (@PMOIndia) May 18, 2023