विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी सुरू केली पीएम विश्वकर्मा योजना
पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे केले उद्घाटन
कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे केले प्रकाशन
18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे केले वितरण
“देशाच्या प्रत्येक श्रमिकाला, प्रत्येक विश्वकर्म्याला मी ‘यशोभूमी’ समर्पित करतो”
“विश्वकर्मांना ओळख आणि पाठबळ मिळणे ही काळाची गरज”
“आउटसोर्स करण्यात येणारे काम आपल्या विश्वकर्मा मित्रांना मिळाले पाहिजे आणि जागतिक पुरवठा साखळीचा ते महत्त्वाचा भाग बनले पाहिजेत”
“या बदलत्या कालखंडात विश्वकर्मा मित्रांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि साधने अतिशय महत्त्वाची आहेत”
“ज्यांची काळजी घेण्यासाठी कोणीच नाही, त्यांच्या पाठिशी मोदी आहेत”
“व्होकल फॉर लोकल ही संपूर्ण देशाची जबाबदारी आहे”
“आजचा विकसित भारत प्रत्येक क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहे”
“यशोभूमीमधून मिळणारा संदेश अतिशय स्पष्ट आणि मोठा आहे. या ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला यश आणि प्रसिद्धी मिळेल”
“भारत मंडपम आणि यशोभूमी सेंटर दिल्लीला परिषद पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र बनवणार आहेत”
“भारत मंडपम् आणि यशोभूमी या दोहोंमध्ये भारतीय संस्कृती आणि अत्याधुनिक सुविधांचा संगम आहे आणि या भव्य वास्तू भारताची गाथा जगासमोर मांडत आहेत”
“आपले विश्वकर्मा सहकारी मेक इन इंडियाचा अभिमान आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र या अभिमानाचे जगाला दर्शन घडवण्याचे माध्यम बनेल”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये द्वारका येथे  इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यशोभूमीमध्ये एक अतिशय भव्य परिषद केंद्र, विविध प्रदर्शन दालने आणि इतर सुविधांचा अंतर्भाव आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यावर पंतप्रधानांनी गुरु शिष्य परंपरा आणि नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनाची फेरफटका मारून पाहणी केली. त्यांनी यशोभूमीच्या त्रिमितीय प्रतिकृतीची देखील पाहणी केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 या नव्या मेट्रो स्थानकापर्यंतच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले.

 

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी विश्वकर्मा  जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना हा सोहळा समर्पित असल्याचे सांगितले. देशभरातील लक्षावधी विश्वकर्मांसोबत जोडले जाण्याची ही संधी मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याचा आणि कारागीर आणि शिल्पकारांसोबत संवाद साधण्याचा अनुभव देखील खूपच अविस्मरणीय होता असे त्यांनी अधोरेखित केले. या प्रदर्शनाला भेट देण्याचे त्यांनी नागरिकांना देखील आवाहन केले. लाखो कारागीर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना आशेचा एक किरण बनून येत आहे, असे पंतप्रधानांनी  सांगितले.

यशोभूमी या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्रासंदर्भात पंतप्रधानांनी या भव्य वास्तूच्या उभारणीमध्ये श्रमिक आणि विश्वकर्मांच्या योगदानाचा गौरव केला. “ देशाच्या प्रत्येक विश्वकमा, प्रत्येक श्रमिकाला, मी ‘यशोभूमी’ समर्पित करतो”, ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विश्वकर्मांना त्यांनी सांगितले की त्यांच्या कलाकृती जग आणि जागतिक बाजारपेठेसोबत जोडणारे यशोभूमी हे एक सदैव वर्दळीचे  केंद्र बनणार आहे. पंतप्रधानांनी देशाच्या दैनंदिन जीवनात विश्वकर्मांचे योगदान आणि महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती झाली तरी विश्वकर्मा हे समाजात नेहमीच महत्त्वाचे राहतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  विश्वकर्मांना ओळख आणि पाठबळ मिळणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

“विश्वकर्मांचा आदर, क्षमता आणि समृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी भागीदार म्हणून केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे” असे मोदी यांनी नमूद केले. कारागीर आणि शिल्पकारांच्या प्रमुख  18  क्षेत्रांचा उल्लेख करताना  पंतप्रधानांनी माहिती दिली की सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार, कुंभार, चर्मकार , शिंपी, गवंडी,  धोबी इत्यादींचा पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत समावेश करण्यात आला आहे आणि यासाठी 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील.

 

परदेश दौऱ्यांदरम्यान कारागिरांशी बोलतानाचा आपला वैयक्तिक अनुभव सांगताना,  हातांनी तयार केलेल्या  उत्पादनांच्या वाढत्या मागणीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की जगभरातील मोठ्या कंपन्या  आपले काम लहान उद्योगांकडे सोपवतात. ‘हे आउटसोर्स केलेले काम आपल्या  विश्वकर्मा मित्रांकडे यायला हवे आणि ते जागतिक पुरवठा साखळीचा एक भाग बनावेत यासाठी आम्ही काम करत आहोत.  म्हणूनच ही योजना विश्वकर्मा मित्रांना आधुनिक युगात घेऊन जाण्याचा एक प्रयत्न आहे,”असे  पंतप्रधान म्हणाले.

“या बदलत्या काळात विश्वकर्मा मित्रांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि साधने अत्यंत महत्त्वाची आहेत”, असे सांगत कुशल कारागीर आणि व्यवसायांना प्रशिक्षण देण्यासाठीच्या उपाययोजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण काळात विश्वकर्मा मित्रांना दररोज 500 रुपये भत्ता दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आधुनिक टूलकिटसाठी 15 हजार रुपये किमतीचे टूलकिट व्हाउचरही दिले जाणार असून उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विपणन यासाठी सरकार मदत करेल, असे ते म्हणाले. टूलकिट्स जीएसटी नोंदणीकृत दुकानांमधूनच खरेदी कराव्यात आणि ही टूल्स मेड इन इंडिया असावीत असे त्यांनी नमूद केले.

विश्वकर्मांसाठी विना तारण वित्तपुरवठाबाबत पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा हमी मागितली जाते तेव्हा त्याची  हमी मोदींनी दिलेली आहे. विश्वकर्मा मित्रांना अतिशय कमी व्याजदराने  तारणाशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल असे ते म्हणाले.

 

केंद्रातील सरकार वंचितांच्या विकासाला प्राधान्य देते,” असे सांगत पंतप्रधानांनी एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेचा उल्लेख केला जी  प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देते. त्यांनी रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी बँकेचे दरवाजे खुले करणाऱ्या  आणि ‘दिव्यांगांसाठी’ विशेष सुविधा निर्माण करणाऱ्या पीएम स्वानिधी योजनेचा उल्लेख केला. ज्यांची कुणाला काळजी  नाही , त्यांच्या पाठीशी  मोदी खंबीरपणे उभे आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की मी येथे सेवा करण्यासाठी आहे , सन्मानाचे जीवन देण्यासाठी आहे  आणि सर्वांपर्यंत सेवा पोहचतील हे सुनिश्चित करण्यासाठी आहे . "ही मोदींची हमी आहे", असे ते  म्हणाले.

जी 20 क्राफ्ट बाजारमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरा यांच्या मिलाफाचा परिणाम जगाने पाहिला असे पंतप्रधान म्हणाले. मान्यवरांना दिलेल्या भेटवस्तूंमध्येही विश्वकर्मा मित्रांच्या उत्पादनांचा समावेश होता. स्थानिक वस्तूना प्रोत्साहन ही संपूर्ण देशाची जबाबदारी आहे"  असे ते म्हणाले. ‘आधी आपण स्थानिक वस्तू खरेदी करायला हव्यात आणि नंतर आपल्याला त्या जागतिक स्तरावर न्यायच्या आहेत ’ असे ते  म्हणाले.

देशातील आगामी सण उदा.  गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दीपावली आणि इतर सणांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक नागरिकाने स्थानिक उत्पादने विशेषत: देशातील  विश्वकर्मांनी ज्यामध्ये योगदान दिले आहे अशी उत्पादने खरेदी करावीत असे  आवाहन केले.

“आजचा विकसित भारत प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची  एक नवीन ओळख निर्माण करत आहे”, जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या भारत मंडपमचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, यशोभूमीने ही  परंपरा अधिक भव्यतेने पुढे नेली आहे. “यशोभूमीचा संदेश ठळक आणि स्पष्ट आहे. येथे आयोजित कोणताही कार्यक्रम यशस्वी आणि लोकप्रिय होईल. यावर मोदी यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, यशोभूमी हे भविष्यातील भारताचे दर्शन घडवण्याचे माध्यम बनेल.

 

ते म्हणाले की, भारताची  भव्य आर्थिक कामगिरी आणि व्यावसायिक सामर्थ्य दाखवण्यासाठी हे देशाच्या राजधानीतले  एक यथोचित केंद्र आहे. मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आणि पीएम गतिशक्ती या दोन्ही गोष्टी यातून  प्रतिबिंबित होतात.  मेट्रो तसेच  आज उदघाटन झालेल्या मेट्रो टर्मिनलने या केंद्राला दिलेली कनेक्टिव्हिटी त्यांनी  स्पष्ट केली.  यशोभूमीची व्यवस्था  वापरकर्त्यांच्या प्रवास, कनेक्टिव्हिटी, निवास आणि पर्यटन संबंधी  गरजा पूर्ण करेल असे त्यांनी अधोरेखित केले.

बदलत्या काळानुसार विकास आणि रोजगाराची नवीन क्षेत्रे उदयास येत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पन्नास ते साठ वर्षांपूर्वी भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि विस्तारीत अशा आयटी क्षेत्राची कोणी कल्पनाही केली नसेल यावर त्यांनी भर दिला. तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी सोशल मीडियाही कल्पनेतच होता, असेही ते म्हणाले. कॉन्फरन्स टुरिझम (परिषद पर्यटन) क्षेत्राच्या भविष्याबाबत सांगताना पंतप्रधान म्हणाले की, या क्षेत्रात भारतासाठी प्रचंड संधी आहे. त्यांनी अधोरेखित केले की, जगभरात दरवर्षी 32 हजारांहून अधिक मोठी प्रदर्शने आणि प्रदर्शनी आयोजित केल्या जातात जिथे परिषद पर्यटनासाठी येणारे लोक सामान्य पर्यटकांपेक्षा जास्त पैसे खर्च करतात. एवढ्या मोठ्या उद्योगात भारताचा वाटा फक्त एक टक्का आहे आणि भारतातील अनेक मोठ्या कंपन्या दरवर्षी परदेशात जाऊन त्यांचे कार्यक्रम आयोजित करतात याकडेही पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. भारत आता कॉन्फरन्स टुरिझमसाठी स्वतःला तयार करत आहे यावरही त्यांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले की, कॉन्फरन्स टुरिझमची प्रगती तेव्हाच शक्य होईल जेव्हा तिथे कार्यक्रम, बैठका आणि प्रदर्शनांसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध होतील, त्यामुळे भारत मंडपम आणि यशोभूमी केंद्र आता दिल्लीला कॉन्फरन्स टुरिझमचे सर्वात मोठे केंद्र बनवणार आहेत. यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात, “यशोभूमी एक अशी जागा बनेल जिथे जगभरातील लोक आंतरराष्ट्रीय परिषदा, सभा आणि प्रदर्शनांसाठी एकत्र येतील”, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी सर्व संबंधितांना यशोभूमीवर आमंत्रित केले. ते म्हणाले, “आज मी जगभरातील सर्व देशांतील प्रदर्शन आणि कार्यक्रम उद्योगाशी संबंधित लोकांना दिल्लीत येण्यासाठी आमंत्रित करतो. मी देशातल्या पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण भागातल्या प्रत्येक प्रदेशातील चित्रपट उद्योग आणि टीव्ही उद्योगाला आमंत्रित करतो. तुम्ही तुमचे पुरस्कार समारंभ येथे आयोजित करा, चित्रपट महोत्सव येथे आयोजित करा, आपल्या चित्रपटाचा पहिला खेळ (शो) येथे आयोजित करा. मी सर्व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कंपन्या, प्रदर्शन क्षेत्राशी संबंधित लोकांना भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.

 

भारत मंडपम आणि यशोभूमी ही स्थळ भारताच्या आदरातिथ्य, श्रेष्ठता आणि भव्यतेचे प्रतीक बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “भारत मंडपम आणि यशोभूमी हे दोन्ही स्थळे भारतीय संस्कृती आणि अत्याधुनिक सुविधांचा संगम आहेत आणि या दोन्ही भव्य आस्थापना जगासमोर भारताची कथा  मांडतील,” अशी टिप्पणी पंतप्रधानांनी यावेळी केली. ते म्हणाले की या आस्थापना नवीन भारताच्या आकांक्षा देखील प्रतिबिंबित करतात ज्याला स्वतःसाठी सर्वोत्तम सुविधा हव्या आहेत. “माझे हे शब्द लक्षात ठेवा”, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की “भारत आता थांबणार नाही”, त्यांनी नागरिकांना पुढे जाण्याचे, नवीन ध्येये निर्माण करण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आणि भारताला 2047 पर्यंत विकसित देशात परिवर्तित करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी देशातल्या सर्व नागरिकांनी कठोर परिश्रम करण्याचे आणि एकत्र येण्याचे आवाहन केले. आपले विश्वकर्मा सहकारी मेक इन इंडियाचा अभिमान आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर जगाला हाच अभिमान दाखवण्याचे एक माध्यम बनेल”, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

यशोभूमी

द्वारका येथील ‘यशोभूमी’ हे आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर सुरू झाल्यामुळे देशात बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळाली आहे. एकूण 8.9 लाख चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेला हा प्रकल्प असून प्रत्यक्ष 1.8 लाख चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ जागेवर उभ्या असलेल्या, ‘यशोभूमी’ हे आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर जगातील सर्वोत्तम अशा एमआयसीइ (MICE) (मीटिंग्ज, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि प्रदर्शने) सुविधांमध्ये आपले स्थान मिळवेल.

सुमारे 5400 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या 'यशोभूमी' मध्ये एक भव्य कन्व्हेन्शन सेंटर, अनेक प्रदर्शन हॉल आणि इतर सुविधांचा समावेश आहे. 73 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि सुमारे 11,000 प्रतिनिधी सामावण्याची क्षमता असलेल्या 13 बैठक दालनांसह 15 अधिवेशन कक्ष बांधण्यात आले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरच्या दर्शनी भागात देशातील सर्वात मोठा LED लावण्यात आला आहे. कन्व्हेन्शन सेंटरमधील प्लीनरी  हॉल सुमारे 6,000 आसनक्षमतेने सुसज्ज आहे. सभागृहामध्ये सर्वात नाविन्यपूर्ण स्वयंचलित आसन प्रणाली बसवण्यात आली आहे त्यामुळे सभागृहात कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार भारतीय बैठक पद्धत किंवा स्तरीत शैलीतील आसन व्यवस्था करता येणार आहे. प्रेक्षागृहातील लाकडी सज्जे आणि ध्वनी संवेदनशील भिंती पाहुण्यांना जागतिक दर्जाचा अनुभव देतील. अद्वितीय अशा पाकळ्यांच्या आकाराने सजलेले छत असलेल्या भव्य बॉलरूममध्ये सुमारे 2,500 अतिथी सामावू शकतात. याशिवाय बॉलरुममध्ये आणखी 500 लोक बसू शकतील इतके विस्तारित खुले क्षेत्र देखील आहे. आठ मजल्यांवर पसरलेल्या 13 बैठक दालनात वेगवेगळ्या स्तरावरील अनेक बैठका आयोजित करण्यासाठी तयार केलेल्या आहेत.

‘यशोभूमी’मध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांपैकी एक केंद्र उभारण्यात आले आहे. 1.07 लाख चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळात बांधलेल्या या प्रदर्शन केंद्राचा वापर प्रदर्शन, व्यापार मेळा आणि व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाईल. या केंद्रात एक भव्य प्रतिक्षालय असून त्याचे छत तांब्याच्या पत्र्याने आच्छादलेले आहे. यातून प्रवेश करणाऱ्या प्रकाश किरणांमुळे प्रतिक्षालयात मनोहारी दृश्य निर्माण होते. हे प्रतिक्षालय विविध प्रसारमाध्यम कक्ष, व्हीव्हीआयपी लाउंज, सामान कक्ष, अभ्यागत माहिती केंद्र आणि तिकीट खिडकी यांसारख्या विविध भागांना जोडलेले आहे.

 

‘यशोभूमी’ मधील सर्व सार्वजनिक आवागमन क्षेत्र अशा प्रकारे रचले गेले आहेत की ते अधिवेशन केंद्राच्या बाहेरील भागाशी जोडलेले दिसतात. हे मजले भारतीय संस्कृतीने प्रेरित सामग्री आणि वस्तूंनी टेराझो स्वरूपात बनलेले आहेत. ज्यामध्ये रांगोळ्यांचे नमुने, लटकणारे ध्वनी-शोषक धातूचे दंडगोल आणि प्रज्वलित भासणाऱ्या नमुनेदार भिंतीं यांचा समावेश आहे.

'यशोभूमी' शाश्वततेसाठी दृढ वचनबद्धता देखील दर्शवते. या उद्देशाने त्यात 100% सांडपाणी पुनर्वापरासह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रणालीसह पावसाचे पाणी साठवण्याच्या तरतुद करण्यात आली आहे. या परिसराला CII च्या भारतीय हरित इमारत परिषदेकडून प्लॅटिनम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

अभ्यागतांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ‘यशोभूमी’ उच्च तंत्रज्ञानाच्या सुरक्षा तरतुदींनी सुसज्ज आहे. हा परिसर 100 हून अधिक इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट्ससह 3,000 हून अधिक कारसाठी भूमिगत कार पार्किंग सुविधेने सुसज्ज आहे.

नवीन मेट्रो स्टेशन ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25’ च्या उद्घाटनासोबतच ‘यशोभूमी’ देखील दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइनशी जोडली जाईल. नवीन मेट्रो स्टेशनमध्ये तीन भुयारी मार्ग असतील - 735 मीटर लांबीचा भुयारी मार्ग स्थानकाला प्रदर्शन केंद्र, कन्व्हेन्शन सेंटर आणि सेंट्रल एरिना यांना जोडणारा असेल; दुसरा मार्ग द्वारका एक्सप्रेसवे ओलांडून प्रवेश/निर्गमन जोडणारा ; तर तिसरा मार्ग मेट्रो स्टेशनला ‘यशोभूमी’मधील भावी प्रदर्शन केंद्रांच्या प्रतिक्षालयाला जोडणारा आहे.

 

पीएम विश्वकर्मा

पारंपरिक कलाक्षेत्रात गुंतलेल्या लोकांना पाठबळ  देणे यावर  पंतप्रधानांचा नेहमीच भर राहिला  असून  केवळ कला आणि कारागीरांना आर्थिक सहाय्य करण्यासाठीच नव्हे तर प्राचीन परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जिवंत ठेवण्यासाठी आणि स्थानिक उत्पादने, कला आणि हस्तकला यांच्याद्वारे भरभराट करण्यासाठी देखील आहे.

 

पीएम विश्वकर्मा योजना पूर्णपणे केंद्र सरकार अनुदानित असून यासाठी  13,000 कोटी रुपयांचा खर्च आहे. या योजनेअंतर्गत, बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून विश्वकर्मांची सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. विश्वकर्मांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणासह कौशल्य अद्यतनीकरण, अवजार प्रोत्साहन रुपात 15,000 रुपये, विनातारण  5% इतक्या सवलतीच्या व्याजदरात आणि पहिल्या हप्त्यांतर्गत 1 लाख रुपये तर 2 लाख रुपयांचा दुसरा हप्ता म्हणून 2लाख रुपये कर्ज दिले जाईल. यासोबतच डिजिटल व्यवहारांसाठी आणि विपणन समर्थनासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

या योजनेचा उद्देश गुरू-शिष्य परंपरा किंवा विश्वकर्मांद्वारे त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करत असलेल्या पारंपारिक , कौटुंबिक-आधारित कौशल्य  बळकट करणे आणि त्यांचे संवर्धन करणे आहे. पीएम विश्वकर्मा योजनेचे मुख्य उद्दिष्ट गुणवत्ता सुधारणे तसेच कारागीरांची उत्पादने आणि सेवांचा आवाका वाढवणे आणि ते देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील हे सुनिश्चित करणे हे आहे.

ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना सहाय्यकारी ठरेल. पीएम विश्वकर्मा अंतर्गत अठरा पारंपरिक कारागिरांचा  समावेश केला आहे. यामध्ये (i) सुतार; (ii) बोट बांधणी; (iii) पारंपरिक शस्त्र निर्माण; (iv) लोहार; (v) छोट्या अवजारांची निर्मिती; (vi) कुलूप निर्माण; (vii) सोनार; (viii) कुंभार; (ix) शिल्पकार, दगड तोडणारा; (x) चर्मकार  (चप्पल/पादत्राण कारागीर); (xi) गवंडी (राजमिस्त्री); (xii) दुरड्या/चटई/झाडू निर्माण; (xiii) बाहुली आणि खेळणी निर्माण (पारंपारिक); (xiv) केशकर्तनकार ; (xv) हार बनवणारे; (xvi) धोबी; (xvii) शिंपी; आणि (xviii) मच्छीमार जाळ्याची निर्मिती.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.