सिल्वासा येथील नमो मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटला पंतप्रधानांनी दिली भेट संस्थेचे लोकार्पण केले
दीव आणि सिल्वासा येथील पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्यांचे वितरण
“या प्रकल्पांमुळे जीवन सुलभ होण्यास तसेच पर्यटन, वाहतूक आणि व्यापार या क्षेत्रात सुधारणा होईल, हे वेळेवर वितरण करण्याच्या नवीन कार्यपद्धतीच्या संस्कृतीचे उदाहरण आहे.”
“प्रत्येक प्रदेशाच्या संतुलित विकासाला सर्वाधिक प्राधान्य आहे.”
“सेवा भाव हे या परिसरातील लोकांचे वैशिष्ट्य आहे ”
“मी प्रत्येक विद्यार्थ्याला हे वचन देतो की त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले सरकार कोणतीही कसर सोडणार नाही”
“भारतातील लोकांचे प्रयत्न आणि भारताची वैशिष्ट्ये प्रकाशझोतात आणण्यासाठी मन की बात हे एक उत्तम व्यासपीठ आहे”
"किनारी भागातील पर्यटनासाठी तेजस्वी तारा म्हणून मी दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेलीला पाहतो आहे”
“राष्ट्र तुष्टीकरणाला प्राधान्य देत नसून संतुष्टीकरण अर्थात समाधानाला महत्व देत आहे.”
“समाजातील वंचित घटकांच्या गरजांना प्राधान्य देणे हे गेल्या 9 वर्षातील सुशासनाचा वैशिष्ट्य -हॉलमार्क बनले आहे”
'सबका प्रयास'ने विकसित भारत आणि समृद्धीचा संकल्प साध्य होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली येथे  4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले.  या प्रकल्पांमध्ये सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या संस्थेचे लोकार्पण, सरकारी शाळा, दमण येथे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटीकरण आणि रुंदीकरण, फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा योजनेचा विस्तार अशा 96  प्रकल्पांचा समावेश आहे. दीव आणि सिल्वासा येथील  पंतप्रधान आवास योजना शहरी योजनेच्या  लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते घरांच्या किल्ल्यांचे वितरण देखील करण्यात आले.

 

तत्पूर्वी सकाळी पंतप्रधानांनी सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. त्यांनी संस्थेचे उद्घाटन करून भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंतप्रधानांनी महाविद्यालयाच्या  परिसराच्या प्रारूपाची पाहणी केली आणि अॅकॅडमिक ब्लॉकमधील शरीर रचना संग्रहालय आणि विच्छेदन कक्षाची देखील पाहणी केली. पंतप्रधानांनी मध्यवर्ती वाचनालयात फेरफटका मारला आणि अभ्यागतांच्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी अॅम्फीथिएटरची पाहणी केली आणि तेथील बांधकाम मजुरांशी त्यांनी संवाद साधला.

 

दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेलीच्या विकासाची यशोगाथा पाहून आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी  यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. सिल्वासा मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक वास्तव्य करत असल्यामुळे येथील वातावरण विश्वबंधुत्वाचे  उदात्त उदाहरण आहे, असे ते म्हणाले. येथील लोकांना परंपरा आणि आधुनिकतेविषयी असलेले समान प्रेम पाहून सरकार या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासाकरता संपूर्ण समर्पित भावनेने कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षांत या केंद्रशासित प्रदेशात 5500 कोटी रुपयांच्या खर्चासह अनेक  भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर बरेच काम केले गेले आहे, असे त्यांनी सांगितले. एलईडी दिवे असलेले रस्ते, घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत त्यांनी सांगितले. केंद्रशासित प्रदेशात उद्योग आणि रोजगार वाढवण्याचे साधन म्हणून त्यांनी राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणाची प्रशंसा केली. “आज मला 5000 कोटींचे नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली,”  असे ते म्हणाले. हे प्रकल्प आरोग्य, गृहनिर्माण, पर्यटन, शिक्षण आणि शहरी विकासाशी संबंधित आहेत. "ते राहणीमान, पर्यटन, वाहतूक आणि व्यवसायात सुधारणा करतील," असे ते पुढे म्हणाले.

आज लोकार्पण केलेल्या कित्येक  प्रकल्पांची पायाभरणी स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते झाली होती, याचा उल्लेख करून त्यांनी आनंद व्यक्त केला. यापूर्वी देशाच्या विकासाचे अनेक सरकारी प्रकल्प एकतर बराच काळ रखडले,  कधी अर्धवट सोडण्यात आले किंवा भरकटले गेले, तर कधी कधी त्यांची पायाभरणीच मोडकळीस येत असे  अशा तऱ्हेने बरेच प्रकल्प अपूर्ण राहत असत  याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र गेल्या 9 वर्षात, देशात नवीन कार्यपद्धती अस्तित्वात आली असून नवीन कार्य संस्कृतीचा उदय झाला आहे, यावर त्यांनी भर दिला. विद्यमान सरकार प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेते आणि ते पूर्ण झाले की लगेचच नवीन प्रकल्प हाती घेते, असे त्यांनी सांगितले. आजचे प्रकल्प हे या कार्यसंस्कृतीचे उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले आणि विकासकामांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

 

केंद्र सरकार "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास" या मंत्रानिशी पुढे वाटचाल करत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. प्रत्येक प्रांताचा समतोल विकासाला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. दीर्घकाळ मतपेढीच्या  राजकारणाच्या नजरेतून विकासाकडे पाहिले जात असल्याच्या  प्रवृत्तीवर पंतप्रधानांनी टीका केली. यामुळे आदिवासी आणि सीमावर्ती भाग वंचित राहिला. मच्छिमारांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले गेले आणि दमण, दीव आणि दादरा आणि नगर हवेलीने याची मोठी किंमत मोजली असे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्य मिळून इतकी दशके लोटल्यानंतरही दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या भागात एकही वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे युवकांना  डॉक्टर होण्यासाठी देशाच्या इतर भागात जावे लागते याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा संधी मिळविणाऱ्या आदिवासी समाजातील तरुणांची संख्या अगदी नगण्य आहे, तर अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी या भागातील लोकांच्या इच्छा आणि आकांक्षांकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी  निदर्शनास आणून दिले . 2014 नंतर सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारच्या सेवाभिमुख दृष्टीकोन आणि समर्पणामुळेच दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीला पहिली राष्ट्रीय शैक्षणिक वैद्यकीय संस्था किंवा नमो वैद्यकीय महाविद्यालय  मिळाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

“आता दरवर्षी या भागातील अंदाजे 150 युवकांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळेल”,असे सांगत  पंतप्रधान म्हणाले की नजीकच्या काळात या प्रांतातून अंदाजे 1000 डॉक्टर्स  तयार केले जातील. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात  शिकत असलेल्या एका मुलीच्या बातमीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला , ज्यात म्हटले होते की केवळ तिच्या कुटुंबातलीच नव्हे तर संपूर्ण गावात वैद्यकीय शिक्षण घेणारी ती पहिलीच  आहे.

पंतप्रधान म्हणाले की या परिसरातील लोकांमध्ये सेवा भावनेची जाण आहे . महामारीच्या काळात  स्थानिक वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या सक्रिय मदतीची त्यांनी आठवण करून दिली. पंतप्रधान म्हणाले की त्यांनी  स्थानिक विद्यार्थ्याच्या  'दत्तक गाव' कार्यक्रमाचा मन की बातमध्ये उल्लेख केला होता. वैद्यकीय महाविद्यालयामुळे स्थानिक वैद्यकीय सुविधांवरील ताण कमी होईल असे पंतप्रधान म्हणाले. " 300 खाटांचे नवीन रुग्णालय बांधले जात आहे आणि नवीन आयुर्वेदिक रुग्णालयासाठी परवानगी देण्यात आली आहे" असे ते पुढे म्हणाले.

 

आपल्या  मुख्यमंत्रीपदाच्या काळात  आदिवासी भागातील शाळांमध्ये विज्ञान शिक्षण सुरू केल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. शिक्षण मातृभाषेतून होत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.  "आता तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असून यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना खूप मदत होईल" असे  ते म्हणाले.

“आज लोकार्पण करण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे दरवर्षी 300 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी मिळेल” असे  पंतप्रधान म्हणाले.  दादरा आणि नगर हवेलीमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था कॅम्पस सुरू करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  दमणमधील एनआयएफटी  सॅटेलाइट कॅम्पस, सिल्वासा येथील गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कॅम्पस, दीवमधील आयआयआयटी  वडोदरा कॅम्पसचा त्यांनी उल्लेख केला. “मी प्रत्येक विद्यार्थ्याला आश्वासन देतो की आमचे सरकार त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही”, अशी ग्वाही  पंतप्रधानांनी दिली.

सिल्वासाला दिलेल्या शेवटच्या अलिकडच्या भेटीदरम्यान मुलांचे शिक्षण, तरुणांसाठी उत्पन्नाचे स्त्रोत, वृद्धांसाठी आरोग्यसेवा, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांचे निवारण या विकासाच्या पाच मापदंडांवर किंवा पंचधाराविषयी आपण बोललो होतो, याची पंतप्रधानांनीची आठवण करून दिली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या महिला लाभार्थींसाठी पक्क्या घरांचा उल्लेख करत ते म्हणाले की वर नमूद केलेल्या मापदंडांमध्ये त्यांना आणखी एक मापदंड जोडायचा आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने देशातील 3 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून दिली आहेत.  यामध्ये  15 हजारांहून अधिक घरे सरकारने स्वतः  बांधली आणि हस्तांतरित केली अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आज येथे 1200 हून अधिक कुटुंबांना त्यांची स्वतःची घरे मिळाली आहेत आणि महिलांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांमध्ये समान वाटा देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. "सरकारने दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीतील हजारो महिलांना घरमालक बनवले आहे" असे सांगून  पंतप्रधान म्हणाले की पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेल्या प्रत्येक घराची किंमत लाखांमध्ये असून  या महिलांना 'लखपती दीदी' बनवले आहे.

आंतरराष्ट्रीय भरड धान्याचा संदर्भ देतांना पंतप्रधानांनी, तिथल्या , नागली आणि नाचणी सारख्या स्थानिक भरड धान्यांचा उल्लेख केला, आणि म्हणाले की, केंद्र सरकार विविध स्वरूपातील स्थानिक श्री अन्नाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. येत्या रविवारी होणाऱ्या मन की बात च्या 100 व्या भागाचाही त्यांनी उल्लेख केला. “मन की बात हा देशातील जनतेच्या प्रयत्नांची दखल घेण्याचा, त्यांना प्रोत्साहन देण्याचा, भारताची गुणवैशिष्ट्ये जगासमोर आणण्याचा उत्तम मंच ठरला आहे, तुमच्याप्रमाणेच, मी ही मन की बात च्या 100 व्या भागाची वाट बघतो आहे.”

“दादरा, दीव आणि नगर हवेली ही तीन स्थळे, किनारी पर्यटनात, दैदीप्यमान स्थळे म्हणून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत,” असे सांगत पंतप्रधानांनी दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या स्थळांमध्ये महत्वाची पर्यटन स्थळे म्हणून विकसित होण्याच्या क्षमता अधोरेखित केल्या. आणि जेव्हा सरकार, भारताला जगातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशा वेळी हे अधिकच महत्वाचे ठरते, असे ते म्हणाले. नाणी दमण सागरी किनारा मार्ग (नमो) या अंतर्गत, विकसित केले गेलेले दोन किनारी मार्ग, पर्यटनाला चालना देतील, अशी माहिती त्यांनी दिली. किनारी मार्गावर न्यू टेंट सिटी, उदयाला येत आहे, असेही ते म्हणाले. तसेच खानवेल नदीकिनारा, दुधनी जेट्टी, इको-रिसॉर्ट आणि कोस्टल प्रोमेनेड पूर्ण झाल्यानंतर या भागात पर्यटकांचे आकर्षण वाढेल, असेही ते पुढे म्हणाले.

 

आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी सांगितले की सरकार ‘तुष्टीकरणावर नाही तर ‘संतुष्टीकरणावर’ म्हणजेच सर्वांच्या समाधानावर भर देत आहे. “वंचित, उपेक्षित समाजाच्या गरजांना प्राधान्य देणे, ही गेल्या नऊ वर्षातील सुप्रशासनाची ओळख ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.” समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार अतिशय जलद गतीने काम करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. जेव्हा, सरकार स्वतः नागरिकांच्या दाराशी पोहोचते, आणि सरकारी योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात, तेव्हा भ्रष्टाचार आणि भेदभाव आपोआप कमी होतो, असे पंतप्रधान म्हणाले. दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली इथे केंद्र सरकारच्या विविध योजनांची जवळपास 100 टक्के अंमलबजावणी होत असल्याबद्दल  मोदी यांनी आनंद व्यक्त केला. “सर्वांच्या प्रयत्नातून विकसित आणि समृद्ध भारताचा संकल्प साध्य होईल”,  अशा विश्वास पंतप्रधानांनी शेवटी व्यक्त केला.

 

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दादरा आणि नगर हवेलीच्या खासदार कलाबेन देलकर आणि कौशांबीचे खासदार विनोद सोनकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी :-

पंतप्रधानांनी सिल्वासा येथील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट दिली आणि या संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण केले. या संस्थेची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी स्वतः जानेवारी 2019 मध्ये केली होती. ही संस्था दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांसाठी आरोग्य सेवां सुविधा मध्ये मोठे परिवर्तन आणेल. या  अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक संशोधन केंद्रे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सुविधेसह सुसज्ज 24x7 मध्यवर्ती ग्रंथालय, विशेष वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय प्रयोगशाळा, स्मार्ट व्याख्यान हॉल, संशोधन प्रयोगशाळा, शरीर रचनाविषयक संग्रहालय, एक क्लब हाऊस, अशा सुविधा उपलब्ध आहेत.  त्याशिवाय इथले विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी क्रीडा सुविधा देखील उपलब्ध आहेत.

 

पंतप्रधानांनी यावेळी सिल्वासाच्या सायली मैदानावर झालेल्या कार्यक्रमात 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 96 प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणीही केली.  या प्रकल्पांमध्ये दादरा आणि नगर हवेली जिल्ह्यातील मोरखळ, खेर्डी, सिंदोनी आणि मसाट येथील सरकारी शाळांचा समावेश आहे; अंबावाडी, परियारी, दमणवाडा, खारीवाड येथील शासकीय शाळा आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, दमण; दादरा आणि नगर हवेली जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, मजबुतीकरण आणि रुंदीकरण; मोती दमण आणि नानी दमण येथील मासळी बाजार आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नानी दमणमधील पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण अशा योजनांचा समावेश आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi