पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून मनुष्यबळ निर्माण करणे हे आपले ध्येय आहे, जे आपल्या देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनेल. या दिशेने झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की जर आपण याच उत्कटतेने काम करत राहिलो तर देशाला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहादरम्यान शिकलेल्या नवीन गोष्टी आणि अनुभव हे बळ देतील आणि कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतील, ज्यामुळे 2047 सालापर्यंत विकसित भारताचे आपले ध्येय साध्य करण्यात आपल्याला मदत होईल, असे त्यांनी अधोरेखित केले .
पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षांत सरकारची मानसिकता बदलण्यासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा केली, ज्याचा प्रभाव आज लोकांना जाणवत आहे. ते म्हणाले की सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांमुळे आणि मिशन कर्मयोगीसारख्या उपक्रमांच्या प्रभावामुळे हे शक्य झाले आहे.
जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संधी म्हणून पाहत असले तरी भारतासाठी ते आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण करत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी दोन एआय’चा उल्लेख केला - एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि दुसरे ऍस्पिरेशनल इंडिया (आकांक्षी भारत). दोन्हींमध्ये समतोल साधने आवश्यक असल्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला आणि सांगितले की आकांक्षी भारताच्या प्रगतीसाठी जर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वीपणे वापर केला तर त्यामुळे परिवर्तनात्मक बदल घडू शकेल.
डिजिटल क्रांती आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे माहिती समानता एक निकष बनली आहे असे पंतप्रधान म्हणाले. कृत्रिम बुद्धिमतेमुळे माहितीचे संकलन आणि वापर देखील तेवढाच सोपा होत आहे, ज्यामुळे नागरिकांना माहिती पुरवण्यात आणि त्यांना सरकारच्या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी सक्षम बनवते. म्हणूनच नागरी सेवेतील अधिकाऱ्यांनी स्वत:ला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबाबत अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून वाढत्या मानकांची पूर्तता करता येईल, ज्यामध्ये मिशन कर्मयोगी उपयुक्त ठरू शकतील.
अभिनव विचार आणि नागरिक-केंद्रित दृष्टिकोन अवलंबण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. नवीन कल्पना मिळवण्यासाठी स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि युवकांची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली. त्यांनी विभागांना अभिप्राय देण्याची यंत्रणा विकसित करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी iGOT मंचाची प्रशंसा केली आणि सांगितले की या मंचावर 40 लाखापेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. 1400 पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध असून विविध अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल दीड कोटींपेक्षा जास्त प्रमाणपत्रे अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहेत.
नागरी सेवा प्रशिक्षण संस्था विकेंद्रित कार्यपद्धतीच्या बळी ठरल्या होत्या असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांच्यामध्ये भागीदारी आणि सहकार्य वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला असे ते म्हणाले. त्यांनी प्रशिक्षण संस्थांना संवादाची योग्य माध्यमे स्थापन करण्यासाठी, एकमेकांकडून शिकण्याचे, चर्चा करण्याचे आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचे तसेच संपूर्ण-सरकारी दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
मिशन कर्मयोगी सप्टेंबर 2020 मध्ये सुरु करण्यात आले. जागतिक दृष्टीकोनासह भारतीय नीतिमूल्यात रुजलेल्या आणि भविष्यातील आव्हानांना सज्ज नागरी सेवा अशी यामागची कल्पना होती. राष्ट्रीय शिक्षण सप्ताह नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना वैयक्तिक आणि संस्थात्मक क्षमता विकासासाठी नवी प्रेरणा देईल, ज्यामुळे "एक सरकार" चा संदेश मिळेल आणि प्रत्येक व्यक्ती राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडली जाईल आणि आजीवन शिक्षणाला चालना मिळेल.