India believes in the philosophy of ‘Vasudhaiva Kutumbakam’ – that the entire world is one family, says PM Modi at Islamic Heritage Conference
Every Indian is proud of the rich diversity the country has: PM Modi
Indian democracy is a celebration of our age old plurality: PM Narendra Modi
In India, we believe in taking everyone together in the journey towards development: PM Modi

जॉर्डनचे राजे, आदरणीय नरेश जनाब अब्दुल्ला इब्न अल हुसैन,

येथे उपस्थित धार्मिक विद्वान आणि ज्येष्ठ नेते, माननीय अतिथीगण,

भारतातील काही निवडक धार्मिक विद्वान आणि नेत्यांसोबत येथे जॉर्डनचे राजेही उपस्थित आहेत, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

आपल्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करणे जरा कठीण आहे. इस्लामची खरी ओळख निर्माण करण्यातील आपल्या भूमिकेबद्दल सांगणे पुरेसे होणार नाही, त्याची अनुभुतीच घेणे शक्य आहे.

आदरणीय प्रिंस गाझी यांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख आत्ता झाला, तो सुद्धा जॉर्डनमध्ये आपल्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे.

इस्लाम जाणून घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासुंना यामुळे मदत होईल आणि जगभरातील युवक हे पुस्तक वाचतील, अशी आशा मला वाटते.

आपण ज्या सहजतेने आणि साधेपणाने या कार्यक्रमाला येण्याची माझी विनंती मान्य केली, त्यावरून भारताबद्दल आणि इथल्या लोकांबद्दल आपल्याला वाटणारी आत्मीयता दिसून येते.

माननीय महोदय,

आपला देश आणि आमचा मित्र देश जाँर्डन हे इतिहासाच्या पुस्तकातील आणि धार्मिक ग्रंथांमधले एक अमिट नाव आहे.

जाँर्डन हा देश एका अशा पवित्र भूमीवर वसला आहे, जेथून खुदाचा संदेश पैगंबर आणि संतांच्या माध्यमातून जगभरात प्रसारित झाला.

आदरणीय महोदय,

आपण स्वत: विद्वान आहात आणि भारताबद्दल आपले आकलन उत्तम आहे. जगातील सर्व मुख्य धर्म भारतातच विकसित झाले आहेत, हे सुद्धा आपणाला ज्ञात आहे.

जगभरातील धर्म आणि मते भारताच्या मातीतच जोमाने वाढली. येथील हवा-पाण्यावरच त्यांना अस्तित्व लाभले, श्वास लाभला.

मग ते अडीच हजार वर्षांपूर्वीचे भगवान बुद्ध असोत वा मागच्या शतकातील महात्मा गांधी असोत.

शांती आणि प्रेमाच्या संदेशाचा सुगंध भारताच्या बागेतूनच संपूर्ण जगभरात दरवळला. येथील संदेशाच्या प्रकाशाने कित्येक शतके आम्हाला योग्य मार्ग दाखवला.

या संदेशाच्या शीतलतेने जखमांवर मलमही लावले आहे. दर्शन आणि धर्माच्या गोष्टी सोडून द्या. आपणा सर्वांमध्ये एकसारखाच प्रकाश पसरला आहे, हे भारतातील जनमानसाला चांगलेच माहिती आहे. येथील कणाकणात ती अनुभूती आहे.

माननीय महोदय,

भारताची राजधानी दिल्ली, हे पूर्वीचे इंद्रप्रस्थ आहे. सूफी रचनांचीही ही जन्मभूमी आहे.

सूफी संत हजरत निजामुद्दिन अवलिया, ज्यांचा आताच उल्लेख करण्यात आला, त्यांचा दर्गा येथून जवळ आहे. दिल्लीचे नावही दहलीज या शब्दापासून उद्भवलेले आहे. गंगा-यमुना या दोन नद्यांचे हे द्वार, अर्थात भारताच्या संमिश्र गंगा-यमुना संस्कृतीचे हे प्रवेशद्वार आहे. येथूनच भारताच्या प्राचिन दर्शनाने आणि सूफींचे प्रेम तसेच मानवतेचा संगम असणाऱ्या परंपरेने मानवाच्या मूलभूत एकतेचा संदेश दिला आहे.

मानवतेच्या एकात्मतेच्या या भावनेने भारताला ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे दर्शन दिले आहे. अर्थात भारत आणि भारतीयांनी संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून त्याच्या सोबत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सांस्कृतिक आणि सामाजिक विविधता आणि विपुलता आणि आपला खुला दृष्टीकोन ही भारताची खरी ओळख आहे, वैशिष्ट्य आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्या या वैशिष्ट्याचा अभिमान आहे. आपल्या वारशाच्या विविधतेचा, विविधतेच्या या वारशाचा अभिमान आहे. भारतीय, मग तो कोणतीही भाषा बोलणारा असो, मंदिरात दिवे लावणारा असो किंवा मशीदीत दुवा मागणारा असो, चर्चमध्ये प्रार्थना करणारा असो किंवा गुरूद्वारामध्ये शब्दकिर्तन करणारा असो.

आदरणीय महोदय,

सध्या भारतात होळीचा, रंगांचा सण साजरा केला जात आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी बौद्ध नव वर्षाची सुरूवात झाली.

या महिना अखेरीला गुड फ्रायडे आणि काही आठवड्यांनंतर संपूर्ण देशात बुद्ध जयंती साजरी केली जाईल.

मग लवकरच रमज़ानच्या पवित्र महीन्याला सुरूवात होईल, ज्याच्या शेवटी ईद-उल-फित्र चा सण आपल्याला त्याग, परस्पर सौहार्द्र आणि सामंजस्याची शिकवण देईल.

शांती आणि सौहार्दाचे प्रतिक असणाऱ्या काही भारतीय सणांची ही काही उदाहरणे आहेत.

मित्रहो,

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात लोकशाही ही केवळ एक राजकीय यंत्रणा नाही तर समानता, विविधता आणि सामंजस्याचा मूलाधार आहे.

भारतीय लोकशाही हा आमच्या शतकानुशतकांच्या विविधतेतील एकतेचा उत्सव आहे. ही अशी एक शक्ती आहे, जिच्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या गौरवशाली वारशाचा अभिमान आहे, वर्तमानाबद्दल विश्वास आहे आणि भविष्याचीही खात्री आहे.

मित्रहो,

आमच्या परंपरेतील समृद्ध विविधतेतून आम्हाला अशी शक्ती मिळते जी आजच्या अनिश्चितता आणि संशयाने भारलेल्या जगात, हिंसा आणि द्वेषामुळे प्रदूषित जगात, दहशतवाद आणि उग्रवादासारख्या समस्यांशी लढा देण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

मित्रहो,

माणुसकी विरोधात अमानुष हल्ला करणाऱ्यांना बहुतेक हे समजत नसावे की ज्या धर्माचा ते हवाला देतात, त्याचेच ते आपल्या वर्तनाने नुकसान करतात.

दहशतवाद आणि उग्रवादाविरोधातील मोहिम ही कोणत्याही धर्माविरूद्धची मोहिम नाही. ती अशा मानसिकतेविरोधातील मोहिम आहे, जी आमच्या युवकांची दिशाभूल करून त्यांना निष्पाप लोकांवर अत्याचार करायला भाग पाडते.

आदरणीय महोदय,

भारतात सर्वांच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण देशाचे दैव हे त्यातील प्रत्येक नागरिकाशी जोडलेले आहे, याची आम्हाला जाणीव आहे. प्रत्येकाने आनंदी असण्यातच देशाचा आनंद सामावलेला आहे, याची आम्हाला जाणीव आहे.

महोदय,

आपण येथे मोठ्या संख्येसह उपस्थित आहात, यावरून येणाऱ्या पिढ्यांना मार्ग दाखविण्यासाठी आपण किती उत्सुक आहात, हे दिसून येते.

आपण केवळ युवकांचा विकास करू इच्छित नाही तर त्यांना मानवतेची मूल्ये आत्मसात करता यावीत, यासाठीही आपण प्रयत्नशील आहात, हेसुद्धा यावरून स्पष्ट होते.

जेव्हा मुस्लिम युवकांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक दिसेल, तेव्हाच संपूर्ण समृद्धी, समग्र विकास साध्य होऊ शकेल.

अमानुष वर्तन हे कोणत्याही धर्माचे मर्म असू शकत नाही. प्रत्येक पंथ, प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक परंपरा मानवी मूल्यांची पाठराखणच करतात.

म्हणूनच आज आमचे युवा एकीकडे मानवतावादी इस्लामशी जोडलेले असावे आणि दुसरीकडे आधुनिक विज्ञान तसेच प्रगतीच्या साधनांचा वापर करणारे असावे, हे गरजेचे आहे.

माननीय महोदय,

आपल्या मार्गदर्शनाखाली जी पावले उचलली जात आहेत, ती क्रौर्याचा वणवा आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने फार महत्वाची आहेत.

अमान घोषणापत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये दोन भारतीयही सहभागी आहेत आणि ते दोघे आज आपल्यासोबत आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

आपल्यासारख्या प्रभावी नेत्याच्या सोबतीने जॉर्डनसारख्या मित्राच्या साथीने आणि सर्व संप्रदाय, सर्व धर्माच्या नेत्यांच्या सहकार्याने मानवतेचा मार्ग दाखवणारी जागृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यासाठीच्या आमच्या सर्व प्रयत्नांना आपल्या उपस्थितीमुळे आणखी बळ मिळणार आहे. मूलगामीकरणासाठी आपण जे काम केले आहे, त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत कायम आपल्यासोबत असेल.

भारतात हजारोपेक्षा जास्त संख्येने राहणारे उलेमा, धार्मिक विद्वान आणि नेता याबाबतची खात्री देण्यासाठी पुरेसे आहेत. ते या ठिकाणी आपले विचार ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या बोलण्यातून आम्हालाही हिंमत मिळेल आणि दिशाही मिळेल. आपण येथे येण्याचे आमचे निमंत्रण स्वीकारले, त्याबद्दल आपले मनापासून आभार.

महोदय,

या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.

अनेकानेक आभार.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government