पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लस उत्पादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लस उत्पादकांनी बजावलेली कामगिरी आणि त्यांच्या व्यावसायिकतेबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या लस उद्योगाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे ‘सामर्थ्य, संसाधन आणि सेवा भाव’ आहे आणि यामुळेच ते जगातील आघाडीचे लस उत्पादक बनले आहेत.
आपल्या लस उत्पादकांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, सरकारने आता 1 मे पासून प्रत्येक सज्ञान व्यक्तीसाठी लसीकरण कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. आपल्या लोकांचे लसीकरण करण्यासाठी लस उत्पादकांनी कमीतकमी वेळेत लस उत्पादन क्षमता सातत्याने वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. नवीन लसींच्या विकासासाठी वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयत्नांची व अभ्यासांची त्यांनी प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदींनी विक्रमी वेळेत लस विकसित करून त्याचे उत्पादन करण्याचे श्रेय त्यांना दिले. येथे उत्पादित लस स्वस्त आहेत याकडे लक्ष वेधून पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू आहे.
लस विकसित करण्याच्या आणि उत्पादनाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये देशाने ‘मिशन कोविड सुरक्षा’ अंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या भावनेने सतत काम केले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकारने सर्व लस उत्पादकांना केवळ शक्य ती मदत व लॉजिस्टिक सहाय्य आणि लस मंजुरीची प्रक्रिया जलद आणि वैज्ञानिक असेल हे सुनिश्चित केले असे पंतप्रधान म्हणाले. सद्यस्थितीत चाचणी टप्प्यात असलेल्या लसीना शक्य ते सहकार्य व सुरळीत मान्यता प्रक्रियेची ग्वाहीही त्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की कोविड-19 विरूद्ध देशाच्या लढाईत आपल्या खासगी क्षेत्राच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांनी मोठी भूमिका बजावली आहे आणि येत्या काही दिवसांत लसीकरण मोहिमेमध्ये खासगी क्षेत्र आणखी सक्रिय भूमिका बजावेल. यासाठी रुग्णालये आणि उद्योग यांच्यात अधिक चांगल्या समन्वयाची आवश्यकता असेल.
18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी लसीकरण करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आणि अधिक प्रोत्साहन व लवचिकता देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल लस उत्पादकांनी पंतप्रधानांचे आभार मानले. लसींचा विकास आणि उत्पादन प्रक्रियेत केंद्र सरकारकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांच्या नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली. उत्पादन वाढवण्यासाठी योजना, आगामी नवीन लसी आणि नवीन कोरोना विषाणूवर संशोधन यावरही त्यांनी चर्चा केली.