पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला.
पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी त्यांचा अध्यापनाचा अनुभव पंतप्रधानांना सांगितला. शिकणे अधिक सुगम बनवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या रंजक तंत्रांबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. नियमित अध्यापनाच्या कामाबरोबरच त्यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दलही त्यांनी माहिती दिली. त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी शिकवण्याच्या कलेप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि इतक्या वर्षांत त्यांनी दाखवलेल्या उत्साहाची प्रशंसा केली, ज्याचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावावर चर्चा केली आणि मातृभाषेत शिक्षण घेण्याचे महत्त्व विषद केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध भाषांमध्ये स्थानिक लोककथा शिकवाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकता येतील आणि भारताच्या चैतन्यपूर्ण संस्कृतीची त्यांना ओळख होईल, असे त्यांनी सुचवले.
शिक्षकांनी भारताच्या विविधतेचा शोध घेण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीवर घेऊन जावे, ज्यामुळे त्यांचे शिक्षण सुलभ होईल, आणि त्यांना आपल्या देशाबद्दल सर्वांगीण माहिती घ्यायला मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असे ते म्हणाले.
पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींचे आदान प्रदान करावे, जेणेकरून प्रत्येकाला अशा पद्धती शिकता येतील, त्या अंगीकारता येतील आणि त्याचा लाभ घेता येईल.
शिक्षक देशाची अत्यंत महत्त्वाची सेवा करत असून आजच्या युवा वर्गाला विकसित भारताची निर्मिती करण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पार्श्वभूमी
देशातील ज्या शिक्षकांनी आपली वचनबद्धता आणि कठोर परिश्रमांद्वारे केवळ शिक्षण क्षेत्राचा दर्जाच सुधारला नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांचे जीवनही समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांच्या असामान्य योगदानाचा गौरव करून, त्यांचा सन्मान करणे, हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी देशभरातून 82 शिक्षकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने निवडलेल्या 50, उच्च शिक्षण विभागाने निवडलेल्या 16 आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने निवडलेल्या 16 शिक्षकांचा समावेश आहे.