पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टार्ट अप्स कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तसेच दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, “प्रारंभ : स्टार्ट अप इंडिया स्टार्ट अप इंडिया इंटरनॅशनल समीट’ मध्ये भाषणही केले.
बिमस्टेक संघटनेच्या सदस्य देशांमधील मंत्री, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि सोम प्रकाश देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
स्टार्ट अप कंपन्यांनी देशातील आजच्या व्यवसायांचा लोकसंख्याशात्रीय गुणवैशिष्ट्यांचा चेहरामोहराच बदलला आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.देशातील 44 टक्के स्टार्ट अप कंपन्यांमध्ये महिला संचालकआहेत तसेच या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे, 45 टक्के स्टार्ट अप्स या द्वितीय श्रेणीच्या किंवा तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये सुरु झाल्या आहेत. या कंपन्या तिथल्या स्थानिक उत्पादनांच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करत आहेत. प्रत्येक राज्य , त्यांच्या स्थानिक शक्यतांनुसार, स्टार्ट अप कंपन्यांना मदत करत त्या विकसित होण्यासाठी आधार देत आहेत आणि देशातील 80 टक्के जिल्हे आता स्टार्ट अप इंडिया अभियानाचा भाग बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेल्या युवकांना आता या कार्यसंस्कृतीतील त्यांच्या क्षमता आणि सामर्थ्यांची जाणीव होत आहे.त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत. आज लोकांची पूर्वीची मानसिकता बदलली आहे- “तू नोकरी का करत नाहीस? स्टार्ट अप का सुरु करतोस?’ अशा मानसिकतेतून ‘नोकरी ठीक आहे, पण तू स्वतःची स्टार्ट अप कंपनी का सुरु करत नाहीस?’ अशा बदलापर्यंत आपण पोहोचलो आहोत.
2014 साली युनिकॉर्न मध्ये केवळ चार कंपन्या होत्या, आज त्यात 30 पेक्षा अधिक कंपन्या असून त्यांनी एक अब्जचा आकडा पार केला आहे, असे मोदी यांनी सांगितले.
2020 साली, कोरोनाकाळात 11 स्टार्ट अप कंपन्या युनिकॉर्न क्लबच्या सदस्य झाल्याचे नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की या संकटकाळात आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. या काळात स्टार्ट अप कंपन्यांनी देशात सॅनिटायझर्स आणि पीपीइ किट्स तसेच इतर साधनांचा पुरेसा पुरवठा केला. तसेच स्थानिक भागात, किराणा, औषधे अशा आवश्यक वस्तूंचा पुरवठा लोकांना घरापर्यंत करण्याची त्यांनी व्यवस्था केली. कोरोना योध्यांची वाहतूक, ऑनलाईन शालेय साधनांचा पुरवठा यातही त्यांनी महत्वाचे योगदान दिले, असे मोदी म्हणाले. संकटकाळात संधी शोधण्याच्या स्टार्ट अप कंपन्यांच्या इच्छाशक्तीचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभ म्हणजेच आज अनेक गोष्टींची सुरुवात होत आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आजच बिमस्टेक देशांची स्टार्ट अप परिषद सुरु होत आहे. स्टार्ट अप इंडिया चळवळीने आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. तसेच भारताने आज जगातल्या सर्वात मोठ्या लसीकारण मोहिमेचा प्रारंभ केला, असेही पंतप्रधान म्हणाले. आजचा दिवस आपल्या युवकांच्या, वैज्ञानिकांच्या आणि स्वयंउद्योजकांच्या क्षमतांचा साक्षीदार ठरला आहे. आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याला सलाम करणारा दिवस आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
बांगलादेश भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या सर्वच बिमस्टेक देशांमध्ये स्टार्ट अप ची गतिमान उर्जा जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे शतक हे डिजिटल क्रांतीचे आणि नव्या संशोधनांचे शतक आहे, असे ते म्हणाले. हे आशियाचेही शतक आहे. म्हणूनच, आज आपल्या प्रदेशातून, भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच जन्म होणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.हे साध्य करण्यासाठी, ज्या आशियाई देशांमध्ये सहकार्य करण्याची इच्छा आहे, त्यांनी जबाबदारी घेऊन पुढे यावे आणि एकत्रित काम करावे असे आवाहन त्यांनी केले. साहजिकच ही जबाबदारी बिमस्टेक सारख्या संघटनांवरही आहे, कारण आपण जगातील एक पंचमाश मानवतेसाठी काम करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी ‘स्टार्ट अप इंडियाची उत्कांती’ या विषयावरील पुस्तिकेचेही प्रकाशन केले. या पुस्तिकेत भारतातल्या, गेल्या पाच वर्षातल्या स्टार्ट अप कंपन्यांच्या कंपन्यांच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधानांनी स्टार्ट अप मधील सुरुवातीच्या आव्हानांना उजाळा दिला तसेच या आव्हानांवर मात करुन, आपण आज भारतात जगातील सर्वात मोठी ‘स्टार्ट अप कार्यसंस्कृती विकसित केली आहे, असे त्यांनी सांगितले. या व्यवस्थेत आज 41 हजार स्टार्ट अप्स कार्यरत आहेत. त्यापैकी, 5700 स्टार्ट अप कंपन्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, 3600 आरोग्य क्षेत्रात आणि 1700 कंपन्या कृषी क्षेत्रात आहेत. आज लोक आपल्या आहाराविषयी अधिक सजग झाले असून, कृषी आणि अन्नक्षेत्रात यामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत असेही पंतप्रधान म्हणाले. भारतानेही या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले असून त्यादृष्टीने कृषी पायाभूत निधीची उभारणी केली असून त्याअअंतर्गत, एक लाख कोटी भांडवल राखीव ठेवण्यात आले आहे. या नव्या मार्गांमुळे स्टार्ट अप कंपन्या शेतकऱ्यांसोबत समन्वय साधून कृषीमाल शेतीतून थेट ग्राहकांपर्यंत नेण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे योगदान देत आहेत.
स्टार्ट अप व्यवस्थेचा सर्वाधिक फायदा म्हणजे, त्यांची व्यावसायिक जगतात उलथापालथ घडवण्याची आणि त्याला विविध दिशांनी व्यापक करण्याची क्षमता, हा होय. आज जेव्हा आपण या माध्यमातून नव्या दृष्टीकोनांना जन्म देत आहोत, नवे तंत्रज्ञान आणि नवे मार्ग चोखाळत आहोत, त्यातून पारंपरिक उद्योग व्यवसाय क्षेत्र सकारात्मक अर्थाने ढवळू न निघते आहे. आणि विविधीकरण अशासाठी, की या कंपन्या, विविध कल्पना घेऊन येत असून त्यातून अनेक क्षेत्रात मोठी क्रांती घडवत आहेत. या व्यवस्थेचे सर्वात मोठे गुणवैशिष्ट्य म्हणजे, ही व्यवस्था व्यवहारवादापेक्षाही पॅशन म्हणजे झपाटलेल्या इच्छाशक्तीच्या बळावर चालते. आज भारत ज्या प्रकारे काम करतो आहे, त्यामागे हीच ‘मी करु शकतो’ प्रेरणा आहे, असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी यावेळी भीम युपिआय चे उदाहरण दिले. ही व्यवस्था सुरु झाल्यावर त्याने देशात डिजिटल क्रांती आणली आहे. डिसेंबर 2020 मध्येच युपीआयच्या माध्यमातून चार लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तसेच सौर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातही भारताची घोडदौड सुरु आहे. थेट लाभ हस्तांतरण व्यवस्थेद्वारे गरीब, शेतकरी आणि विद्यार्थ्यांन त्यांच्या खात्यात थेट मदत मिळते आहे. ज्यातून त्यांच्या अडचणी तर दूर होत आहेतच, शिवाय आधी होणारी सुमारे 1.75 लाख कोटी रुपयांची गळतीही थांबली आहे असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, GeM या सरकारी पोर्टलद्वारे त्यावर नोंदणी केलेल्या 8 हजार स्टार्टअप्सना नवनवीन संधी मिळत आहेत. GeM या पोर्टलवरून त्यांनी 2300 कोटींचा व्यवसाय केला आहे. ते म्हणाले, येणाऱ्या काळात GeM वर नोंदणी केलेल्या स्टार्टअप्सची संख्या वाढतच जाणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादकांना, स्थानिक रोजगाराला आणि स्टार्टअपमध्ये संशोधन आणि नवोन्मेष गुंतवणूकीला चालना मिळेल.
या वेळी पंतप्रधानांनी एक हजार कोटींच्या स्टार्टअप इंडिया बीज भांडवल योजेनेची घोषणा केली. याद्वारे स्टार्टअप्सला बीज भांडवलाची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये हा उद्देश आहे. यामुळे नवनवीन स्टार्टअप उद्योग सुरु होण्यास आणि त्यांची वाढ होण्यास मदत होईल. फंड ऑफ फंड्स योजना अगोदरच स्टार्टअप्सना भाग भांडवल उभं करण्यात मदत करत आहे. स्टार्टअप्सना हमी देऊन भांडवल उभं करण्यास सरकार मदत करेल. ‘युवकांचे, युवकां करवी, युवकांसाठी’ या मंत्रावर आधारीत स्टार्टअप व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने भारत प्रयत्न करत आहे. आम्हाला पुढच्या पाच वर्षांसाठी ध्येय निश्चित केले पाहिजे, आणि हे ध्येय, आपले स्टार्टअप्स, आपले युनिकॉर्न जगात सर्वात मोठे म्हणून उदयास आले पाहिजेत आणि भविष्यातील तंत्रज्ञानात अग्रणी असले पाहिजेत, हे असायला हवे, असे मोदी यांनी सांगितले.