स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले.
कोळसा मंत्रालयातर्फे दिलेल्या वाहतूक आणि लॉजिस्टिक या संकल्पनेवर काम करणाऱ्या कर्नाटकमधल्या म्हैसूर इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमधील सोइकत दास आणि प्रतिक साहा यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. ते रेल्वे मालवाहतुकीसाठी IoT-आधारित प्रणाली तयार करत आहेत. हॅकेथॉन ही आपल्यासाठीही शिकण्याची संधी आहे आणि सहभागींशी संवाद साधण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. सहभागींचे उत्साही चेहरे पाहून पंतप्रधान म्हणाले की युवापिढीचा उत्साह, इच्छाशक्ती आणि राष्ट्र उभारणीची इच्छा ही भारताच्या युवा शक्तीची ओळख बनली आहे. बांगलादेशातील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या संघाने पंतप्रधानांना सांगितले की ते रेल्वेच्या कोळसा डब्याची कमी आणि अधिक भाराची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे नुकसान किंवा दंड होतो. त्यासाठी ते IoT(इंटरनेट ऑफ थिंग्स) आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)-आधारित तंत्रज्ञान वापरत आहेत. या संघात बांगलादेश आणि भारतातील प्रत्येकी 6 सदस्यांचा समावेश आहे. परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असलेल्या भारतीय रेल्वेला त्यांच्या प्रयत्नांचा फायदा होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. लॉजिस्टिक हे लक्षकेंद्रित क्षेत्र असल्याची माहिती त्यांनी दिली आणि भविष्यात बांगलादेशातून आणखी बरेच विद्यार्थी भारतात येतील अशी आशा व्यक्त केली आणि ‘स्टडी इन इंडिया’ कार्यक्रम अशा विद्यार्थ्यांना मदत करेल असे सांगितले.
चंद्रावरील धोके दर्शवणारा नकाशा तयार करण्यासाठी AI आणि इमेज प्रोसेसिंगचा उपयोग करून, इस्रोच्या चांद्रयानाकडून प्राप्त मध्यम रिझोल्यूशनच्या प्रतिमा सुपर रिझोल्यूशनमध्ये परिवर्तित करण्याच्या प्रकल्पावर, अहमदाबादमधल्या गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या हर्षिता एस तिवारी आणि जय पी जेठवा यांनी काम केले. या प्रकल्पामुळे भविष्यातील मोहिमांसाठी दिशादर्शक मार्ग आणि यानाला उतरण्यासाठी सुरक्षित जागा निश्चित करण्यात साहाय्य मिळणार आहे. पंतप्रधानांनी देशातील विविध अंतराळ स्टार्टअप्ससह इस्रोच्या पथकाकडून पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन मिळवण्याची सूचना केली. चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचा अंतराळ कार्यक्रम जगासाठी आशेचा किरण बनला आहे आणि इतर देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सध्याचे युग देशाच्या अंतराळ क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी योग्य काळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तरुणांच्या बुद्धिमत्तेला अधिकाधिक वाव देण्यासाठी अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रो नवीन-युगातील स्टार्टअप्ससाठी आपल्या सुविधा खुल्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि अहमदाबादमध्ये स्थित IN-SPACe मुख्यालयाला भेट देण्याचे सुचवले.
ओडिशामधील संबलपूर येथील वीर सुरेंद्र साई तंत्रज्ञान विद्यापीठातील अंकित कुमार आणि सय्यद सिद्दीकी हुसैन यांनी मुलांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात खुल्या नवोन्मेषावर काम केले आणि एक क्रमवारी तयार केली. यामुळे पालक आणि वैद्यकीय व्यावसायिकांना पूर्वसूचना देऊन मदत करेल. पंतप्रधानांच्या आग्रहावरून संघातील एका महिला सदस्याने पंतप्रधानांना या प्रकल्पाची माहिती दिली. एक महत्त्वाचे क्षेत्र निवडल्याबद्दल संघाचे अभिनंदन करताना, पंतप्रधानांनी तरुण लोकसंख्येच्या मानसिक आरोग्याची समस्या विशद केली आणि अशा समस्यांवर शिक्षण विभागाकडून प्रयत्न आणि संशोधित उपाय शैक्षणिक संस्थांमध्ये समाविष्ट करण्याचे मार्ग, यांच्या महत्त्वावर भर दिला. “विकसित भारतासाठी तरुणांचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे”, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांना MY-India पोर्टलबद्दलही सांगितले.
आसाममधल्या गुवाहाटी येथील आसाम रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटी, या विद्यापीठाच्या रेश्मा मस्तुथा आर ने AI टूल भाषिणी वापरून पंतप्रधानांशी संवाद साधला. रीअल-टाइम भाषांतरासाठी भाषिणी साधन प्रथमच अशा कार्यक्रमात वापरण्यात आले. दक्षिण भारतातील रेश्मा आणि तिचा संघ, 'एक भारत श्रेष्ठ भारत'च्या खऱ्या दूत आहेत, असे कौतुक पंतप्रधानांनी केले. तिच्या संघाने वेब अॅप्लिकेशनचा वापर करून जलविद्युत प्रकल्पांच्या घटकांचे इनपुट-आधारित AI जनरेटिव्ह डिझाईन्स तयार करण्यावर काम केले. भारताला ऊर्जेमध्ये स्वावलंबी राष्ट्र बनण्यास आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यात मदत करणे, या उद्देशाने हा प्रकल्प करण्यात आला आहे. वीज क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडण्याचे मार्ग शोधण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. विकसित भारतसाठी हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आणि भारताचे भविष्य घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे त्यांनी सांगितले. वीज वापरावर देखरेखीसह वीज पारेषण आणि वीजनिर्मितीत एआय-आधारित उपाय वापरून कार्यक्षमता प्राप्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षांमध्ये प्रत्येक गाव आणि कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याच्या सरकारच्या यशावर प्रकाश टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात लहान-मोठ्या सौर प्रकल्पांवर आणि शहरांमध्ये छतावरील सौर संयंत्रांवर सरकार लक्ष केंद्रित करत असल्यावर भर दिला तसेच त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे उपाय शोधण्याची सूचना केली. पंतप्रधानांनी त्यांना ईशान्येकडील राज्यांना भेट देण्याची विनंतीही केली.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नोएडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील ऋषभ एस विश्वामित्र यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून फिशिंग डोमेन शोधण्यासाठी उपाय प्रदान करण्यासाठी NTRO द्वारे ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षेवर काम केले. सायबर फसवणुकीच्या निरंतर वाढणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भात उच्च सतर्कतेच्या गरजेवर भर दिला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या व्हिडिओंचा उल्लेख केला आणि कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी सतर्क राहण्याची गरज स्पष्ट केली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक आराखडा तयार करण्याच्या भारताच्या मोहिमेचा देखील उल्लेख केला.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी देशाच्या समस्यांवर उपाय शोधण्याच्या कामात तरुण पिढीच्या समर्पित योगदानाबद्दल आनंद व्यक्त केला. यापूर्वी आयोजित हॅकेथॉनच्या यशाचा त्यांनी पुनरुच्चार केला. पूर्वी झालेल्या हॅकेथॉनमधून शोधण्यात आलेले स्टार्टअप आणि उपाय सरकार आणि समाज या दोघांनाही सहाय्यकारी ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
21 व्या शतकातील भारताच्या ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ या मंत्राचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक भारतीय सद्यस्थितीच्या जडत्वाचा त्याग करत आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या उदयाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी भारताच्या UPI यशाबद्दल तसेच साथीच्या काळात लसीने मिळवलेल्या यशाचे वर्णन केले.
तरुण नवोदित आणि क्षेत्र तज्ञांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सध्याच्या काळाच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला, कारण हाच काळ पुढील एक हजार वर्षांची दिशा ठरवणार आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक असलेला देश, प्रतिभा संपन्न तरुण पिढी, स्थिर आणि मजबूत सरकार, भरभराट होत असलेली अर्थव्यवस्था तसेच तंत्रज्ञान आणि विज्ञानावर अभूतपूर्व भर यासारखे अनेक घटक एकत्र आल्याने सध्याच्या काळाचे वेगळेपण समजून घेणे गरजेचे आहे असे पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले.
"तंत्रज्ञानाने आज आपल्या जीवनाचा एक मोठा भाग व्यापला आहे", यावर पंतप्रधानांनी भर दिला. जेव्हा एखाद्याला तंत्रज्ञानाची सवय होऊ लागते तेव्हाच तंत्रज्ञानाची अद्ययावत केलेली आवृत्ती समोर येते, असे पंतप्रधानांनी तरुण नवोन्मेषकांच्या भूमिकेवर भर देताना निदर्शनास आणून दिले.
भारताच्या अमृत काळाची पुढील 25 वर्षे तरुण नवोन्मेषकांना परिभाषित करणारा कालावधी असेल, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. त्यांनी स्वावलंबी भारताचे समान ध्येय अधोरेखित केले आणि नवीन आयात न करणे तसेच इतर राष्ट्रांवर अवलंबून न राहणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. स्वावलंबनाच्या दिशेने काम करणाऱ्या संरक्षण क्षेत्राचे उदाहरण देताना त्यांनी भारताला काही संरक्षण तंत्रज्ञान आयात करणे भाग पडते आहे याकडे लक्ष वेधले. सेमीकंडक्टर आणि चिप तंत्रज्ञानामध्येही देश स्वावलंबनाची गरजही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी क्वांटम तंत्रज्ञान आणि हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या उच्च आकांक्षांवर प्रकाश टाकला. सरकार 21 व्या शतकातील आधुनिक परिसंस्था निर्माण करून अशा सर्व क्षेत्रांवर विशेष भर देत आहे, परंतु त्याचे यश तरुणांच्या यशावर अवलंबून आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
“जागतिक आव्हानांवर भारतात कमी किमतीचे, दर्जेदार, शाश्वत आणि प्रमाणीत उपाय सापडतील असा जगाला विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित नवोन्मेषकांना सांगितले. आपल्या चांद्रयान मोहिमेने जगाच्या अपेक्षा अनेक पटींनी वाढवल्या आहेत आणि त्यानुसार आपणाकडून नवनवीन शोधांची अपेक्षा केली जात आहे, असे ते म्हणाले. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे उद्दिष्ट देशातील समस्यांचे निराकरण करणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे हे आहे, असे हॅकेथॉनच्या उद्दिष्टाचे स्पष्टिकरण देताना पंतप्रधान म्हणाले. स्मार्ट इंडिया हॅकेथाँनच्या माध्यमातून देशातील युवा शक्ती विकसित भारतासाठी उपायांचे अमृत गाळत आहे.” असे त्यांनी सांगितले. देशाच्या युवा शक्तीवर विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी कोणत्याही समस्येवर तोडगा काढताना विकसित भारताचा संकल्प लक्षात ठेवण्याचा आग्रह केला. “तुम्ही जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट असू दे. तुम्हाला असे काम करावे लागेल की जग तुमचे अनुसरण करेल,” असेही पंतप्रधान म्हणाले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत उपस्थित होते.
अधिक माहिती
युवकांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) हा सरकारची मंत्रालये आणि विभाग, उद्योग तसेच इतर संस्थांच्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा देशव्यापी उपक्रम आहे. 2017 मध्ये सुरू झालेल्या, स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला तरुण नवोन्मेषकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या पाच आवृत्त्यांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय उदयास आले आहेत आणि ते प्रस्थापित स्टार्टअप्स म्हणून विकसित झाले आहेत.
यावर्षी, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ची महा अंतिम फेरी 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 मध्ये, 44,000 संघांकडून 50,000 हून अधिक कल्पना प्राप्त झाल्या, ही संख्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन च्या पहिल्या आवृत्तीच्या तुलनेत जवळपास सात पटीने वाढलेली आहे. देशभरातील 48 नोडल केंद्रांवर आयोजित केलेल्या महाअंतिम फेरीत 12,000 हून अधिक नवोन्मेषी तरुण आणि 2500 हून अधिक मार्गदर्शक सहभागी होतील. अंतराळ तंत्रज्ञान, स्मार्ट एज्युकेशन, आपत्ती व्यवस्थापन, रोबोटिक्स आणि ड्रोन, वारसा आणि संस्कृती इत्यादींसह विविध संकल्पनांवर उपाय प्रदान करण्यासाठी महा अंतिम फेरीत या वर्षी एकूण 1282 संघांची निवड करण्यात आली आहे.
सहभागी संघ 25 केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारांच्या 51 विभागांद्वारे निर्देशित केलेली 231 समस्या विधाने (176 सॉफ्टवेअर आणि 55 हार्डवेअर) हाताळतील आणि त्यांचे निराकरण करतील. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 चे एकूण बक्षीस 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, यामध्ये प्रत्येक विजेत्या संघाला प्रति समस्या विधान 1 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे.
India of 21st century is moving forward with the mantra of 'Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan and Jai Anusandhan.' pic.twitter.com/ncxp1WAQRs
— PMO India (@PMOIndia) December 19, 2023
Today we are at a turning point in time, where every effort of ours will strengthen the foundation of the India of the next thousand years. pic.twitter.com/ToRmk0NGLJ
— PMO India (@PMOIndia) December 19, 2023
India's time has come. pic.twitter.com/Et0QfkpO4v
— PMO India (@PMOIndia) December 19, 2023
To make India developed, we all have to work together.
— PMO India (@PMOIndia) December 19, 2023
Our goal must be – Aatmanirbhar Bharat. pic.twitter.com/NJlMi7d43R
The world is confident that India can provide low-cost, quality, sustainable and scalable solutions to global challenges. pic.twitter.com/jtqufQ8PF3
— PMO India (@PMOIndia) December 19, 2023