2020 व 2021 या वर्षाच्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग इथे संवाद साधला. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान करत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्नच यातून अधोरेखित होत आहेत.
विजेत्यांनी केलेल्या प्रचंड कार्याची प्रशंसा करतानाच समाज व देशासाठी त्या योगदान देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या कामातून केवळ सेवाभावनाच नव्हे तर नवोन्मेषाचीही प्रचिती येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपला कार्याचा ठसा उमटवला असून देशाला अभिमानास्पद कामगिरी त्या करत असल्याचे त्यांनी सांगितले .
महिलांच्या क्षमतेला पुरेपूर वाव देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून त्या क्षमता ओळखण्याच्या दृष्टीनेच सरकार आपली धोरणे आखत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कौटुंबिक पातळीवर निर्णयप्रक्रियेत महिलांचा वाढता सहभाग सुनिश्चित करणे महत्वाचे असून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यास हे शक्य होईल असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना सरकार ‘सबका प्रयास’ वर लक्ष केंद्रित करत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ प्रमाणे सरकारी योजनांचे यश महिलांच्या योगदानावर अवलंबून आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून त्यांच्या कार्याची दखल घेणारे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल विजेत्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची संधी प्राप्त होणे आपल्याला स्वप्नपूर्तीच्या आनंदाप्रमाणे असल्याचे विजेत्यांनी सांगितले. आपल्या कार्यात सरकारच्या विविध योजनांची खूप मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजकार्याचा आपला प्रवास आणि प्रत्यक्ष कामाबद्दल त्यांनी सखोल माहिती दिली , तसेच आपापल्या कार्यक्षेत्राशी संबंधित काही सूचना आणि सुधारणा सुचवल्या.