पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहायक सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या 181 अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2022 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
या संवादादरम्यान विविध अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. तर या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले तेव्हा त्यांच्याशी केलेल्या संवादाची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. प्रशासकीय उतरंडीत वरपासून खालपर्यंतच्या सर्व श्रेणीतील तरुण अधिकाऱ्यांना अनुभव आधारित शिक्षणाची संधी प्रदान करणे हा सहाय्यक सचिव अभ्यासक्रमामागचा हेतू असतो असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, “नवीन भारत उदासीन दृष्टिकोनावर समाधानी राहणारा भारत नाही आणि अधिक सक्रियतेची मागणी हा नवीन भारत करतोय.” त्यांनी पुढे सांगितले की, “सर्व नागरिकांना सर्वोत्तम शक्य प्रशासन, उत्पादनाची गुणवत्ता आणि चांगले जीवनमान प्रदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” लखपती दीदी, ड्रोन दीदी, पीएम आवास योजना इत्यादी योजनांविषयी बोलताना, त्यांनी सांगितले की, “या सर्व योजनांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संपृक्त दृष्टिकोनाने काम करायला हवे. हा दृष्टिकोन सामाजिक न्याय सुनिश्चित करतो आणि भेदभाव टाळतो असे त्यांनी सांगितले. आता हे अधिकाऱ्यांच्या निवडीवर आहे की ते सेवा वितरणामध्ये वेग कमी करणारे गतिरोधक बनतील की ते एक वेगवान महामार्ग बनतील.” त्यांनी पुढे सांगितले की, अधिकाऱ्यांनी उत्प्रेरक एजंट होण्याची इच्छा बाळगली पाहिजे जेणेकरून जेव्हा त्यांच्या समोर बदल होताना दिसेल तेव्हाच त्यांना समाधान मिळेल.”
पंतप्रधान पुढे म्हणाले की, “'राष्ट्र प्रथम' हे फक्त एक घोषवाक्य नाही तर आपल्या जीवनाचे ध्येय आहे असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या सोबत या प्रवासात चालण्याचे आवाहन केले.आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर मिळालेली प्रशंसा या भूतकाळातील गोष्टी असून भूतकाळात न राहता त्यांनी भविष्याकडे वाटचाल करावी,” असेही ते म्हणाले.
या संवादादरम्यान केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि गृह आणि डीओपीटी सचिव ए.के.भल्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.