पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी आभासी माध्यमातून संवाद साधला.
या चर्चे दरम्यान, पंतप्रधान आणि पिचाई यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कार्यक्षेत्राच्या विस्तारात सहभागी होण्याच्या गुगलच्या योजनेवर चर्चा केली.भारतात क्रोमबुक्स तयार करण्यासाठी एचपीसह गुगलच्या भागीदारीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी गुगलच्या 100 भाषांच्या उपक्रमाला अधोरेखित केले. आणि भारतीय भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साधने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.सुप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांवर काम करण्यासाठीही त्यांनी गुगलला प्रोत्साहन दिले.
गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट ) येथे जागतिक फिनटेक परिचालन केंद्र सुरु करण्याच्या गुगलच्या योजनेचे पंतप्रधानांनी स्वागत केले.
पिचाई यांनी जीपे आणि युपीआयचे सामर्थ्य आणि पोहोच वापरून भारतात आर्थिक समावेशनात सुधारणा करण्यासंदर्भातील गुगलच्या योजनांबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली.भारताच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देण्याच्या गुगलच्या वचनबद्धतेवरही त्यांनी भर दिला.
नवी दिल्ली येथे डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेसाठी आगामी जागतिक भागीदारीमध्ये योगदान देण्यासाठी पंतप्रधानांनी गुगलला आमंत्रित केले.