पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्ली-अबू धाबी कॅम्पसमधल्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याचा हा नवा अध्याय सुरू झाला, इतकेच नाही, तर दोन्ही देशांतील युवकांनाही तो एकत्र आणत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आयआयटी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दिल्लीचा एक परिसर यूएई मध्ये सुरू करण्याची कल्पना फेब्रुवारी 2022 मध्ये या देशांच्या नेतृत्वाने केली होती. हा प्रकल्प, भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली (आयआयटी-डी) आणि अबू धाबी शिक्षण आणि ज्ञान विभाग (एडीईके) यांच्या संयुक्त सहकार्याने राबवला जात आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी प्रदान करण्याचे यामागे उद्दिष्ट आहे. यामुळे उभय देशांमधील अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात भागीदारीला चालना मिळणार आहे. आयआयटी दिल्ली –अबु धाबी परिसरामध्ये ‘मास्टर्स इन एनर्जी ट्रान्झिशन अँड सस्टेनेबिलिटी’ हा पहिला शैक्षणिक कार्यक्रम जानेवारी, 2024 मध्ये सुरू झाला.