ख्रिस्ती समुदायाच्या नेत्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार आणि देशासाठी त्यांच्या दृष्टीकोनाची केली प्रशंसा
ख्रिस्ती समुदायाच्या योगदानाचा देशाला अभिमान आहे- पंतप्रधान
पवित्र पोप यांचा दारिद्र्य निर्मूलनाचा संदेश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासशी साधर्म्य साधणारा आहे- पंतप्रधान
विकासाचे लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत आहेत आणि कोणीही वंचित राहात नाही आहे हे आमचे सरकार सुनिश्चित करत आहे-पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळच्या निमित्ताने 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी ख्रिस्ती समुदायासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नाताळचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देखील संबोधित केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर केली.

यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना विशेषतः ख्रिस्ती समुदायाच्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देताना या अतिशय विशेष आणि पवित्र प्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. भारतीय अल्पसंख्याक मंचाने दिलेला नाताळ एकत्र साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले.  ख्रिस्ती समुदायाबरोबर प्रदीर्घ काळापासून असलेल्या घनिष्ठ आणि अतिशय जिव्हाळ्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना ख्रिस्ती समुदाय आणि त्यांच्या नेत्यांसोबत ठराविक काळाने होत असलेल्या बैठकांच्या आठवणींना उजाळा दिला. काही वर्षांपूर्वी पवित्र पोप यांच्यासोबत झालेल्या संवादाची त्यांनी आठवण केली आणि तो एक संस्मरणीय क्षण होता असे नमूद करताना, पृथ्वीला एक चांगले स्थान बनवण्यासाठी सामाजिक सौहार्द, जागतिक बंधुभाव, हवामान बदल आणि समावेशक विकास यांसारख्या मुद्यांवरील चर्चा अधोरेखित केली.

नाताळ हा सण केवळ येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याचा दिवस नसून त्यांचे जीवन, संदेश आणि मूल्ये यांचा स्मरण करण्याचाही दिवस आहे, असे नमूद करताना पंतप्रधानांनी येशू ख्रिस्त यांनी अंगिकार केलेल्या करुणा आणि सेवा या मूल्यांना अधोरेखित केले. येशू ख्रिस्त सर्वांसाठी न्याय असलेल्या समावेशक समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहिले आणि ही तीच मूल्ये आहेत जी भारताच्या विकासाच्या प्रवासात मार्गदर्शक दिव्याप्रमाणे मार्ग उजळून टाकत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान इतरांच्या सेवेवर भर देणाऱ्या पवित्र बायबलचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला एकत्र ठेवणाऱ्या, सामाजिक जीवनाच्या विविध प्रवाहांमधील मूल्यांची समानता अधोरेखित केली, “ सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे. पवित्र बायबलमध्ये सत्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे आणि असे सांगितले जाते की केवळ सत्यच आपल्याला मोक्षचा मार्ग दाखवेल,” पंतप्रधान म्हणाले. यावेळी आपल्याला मुक्ती  देणारे अंतिम सत्य  जाणून घेण्यावर भर देणाऱ्या सर्व पवित्र उपनिषदांचेही दाखले दिले.  पंतप्रधान मोदी यांनी सामाईक मूल्ये आणि वारशावर लक्ष केंद्रित करून पुढे वाटचाल करण्यावर भर दिला “21व्या शतकातील आधुनिक भारतासाठी हे सहकार्य, सुसंवाद आणि सबका प्रयासची भावना एका नव्या उंचीवर घेऊन जाईल,” पंतप्रधान म्हणाले.

 

पंतप्रधानांनी पवित्र पोप यांच्या नाताळच्या भाषणांपैकी एकाचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्यांसाठी आशीर्वादासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान म्हणाले, पवित्र पोप, गरिबीमुळे व्यक्तींच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते या कल्पनेवर विश्वास ठेवतात. हे 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास "या मंत्राला अनुरूप आहे, असे ते म्हणाले. "आमचे सरकार हे सुनिश्चित करत आहे की विकासाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही", असे पंतप्रधान म्हणाले. ख्रिस्ती समुदायाच्या अनेक लोकांना विशेषतः गरीब वर्गाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

“ख्रिश्चन समुदायाच्या योगदानाची देश अभिमानाने दखल घेतो ”, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य चळवळीतील ख्रिश्चन समुदायाच्या योगदानाची प्रशंसा केली आणि विविध विचारवंत आणि नेत्यांचे योगदान अधोरेखित केले.  सेंट स्टीफन्स महाविद्यालयाचे प्राचार्य सुशील कुमार रुद्र यांच्या आश्रयाने असहकार चळवळीची संकल्पना फलित झाली होती, हे गांधीजींनीच सांगितले होते, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  समाजाला दिशा देण्यात ख्रिश्चन समुदायाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला तसेच गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी या समुदायाच्या सामाजिक सेवेतील सक्रिय सहभागाचाही उल्लेख केला. शिक्षण आणि आरोग्य सेवा या महत्त्वपूर्ण क्षेत्रात या समुदायाने दिलेल्या योगदानाचीही त्यांनी नोंद घेतली.

2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत आणि या प्रवासात तरुणांचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी युवकांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक तंदुरुस्तीवर भर दिला.  समाजातील नेत्यांनी तंदुरुस्ती, भरड धान्य, पोषण आणि अंमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेला लोकप्रिय करण्याच्या उपक्रमांबाबत लोकांना जागरूक करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देण्याची परंपरा लक्षात घेऊन पंतप्रधानांनी येणाऱ्या पिढ्यांना निसर्ग समृद्ध वसुंधरा भेट देण्यावर भर दिला.  “शाश्वतता ही आजच्या काळाची गरज आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.  शाश्वत जीवनशैली जगणे हा भारताच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चळवळ मिशन LiFE चा मध्यवर्ती संदेश आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  ही मोहीम प्रो-प्लॅनेट लोकांना प्रो-प्लॅनेट जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करते याचा पुनरुच्चार त्यांनी केला.  त्यांनी पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया, जैविक अपघटन होणाऱ्या वस्तूंचा वापर, भरड धान्याचा स्वीकार आणि कमीतकमी कार्बन उत्सर्जन असलेल्या उत्पादनांची खरेदी करणे यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या अभियानात सामाजिक भान असलेला ख्रिश्चन समाज मोठा वाटा उचलू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

व्होकल फॉर लोकलबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केली.  “जेव्हा आपण स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतो, जेव्हा आपण भारतात बनवलेल्या वस्तूंचे दूत बनतो, तेव्हा ती देशाची सेवा असते. मी ख्रिश्चन समुदायाला देखील स्थानिक उत्पादनांना  अधिकाधिक लोकप्रिय बनवण्याचे आवाहन करतो,” असे ते म्हणाले.

सण समारंभांनी देशाला एकत्रित आणावे आणि प्रत्येक नागरिकाला एकजुट करावे आणावे, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.  “हा सण आपल्यातील विविधतेतही आपल्याला एकसंध ठेवणारा बंध दृढ करू दे.  ख्रिसमसच्या या उत्सवात आपल्या सर्वांचे जीवन आनंदाने भरावे.  येणारे वर्ष आपल्या सर्वांसाठी भरभराटीचे, आनंदाचे आणि शांतीचे जावो”, अशी कामना करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

देशभरातील ख्रिश्चन समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या संवादात सहभागी झाल्या होत्या.  कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियास, रोमन कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाचे कार्डिनल आणि बॉम्बेचे मुख्य बिशप, ज्यांनी कार्डिनल सल्लागारांच्या पोपच्या परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे, त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. हा दिवस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे, असेही कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांनी नमूद केले. आणि, इतरांच्या विकासासाठी तसेच प्रगतीसाठी कार्य करण्याच्या येशू ख्रिस्ताच्या शिकवणीशी साधर्म्य रेखाटताना सुशासनासाठीच्या वाजपेयी यांच्या उत्कटतेचेही त्यांनी वर्णन केले. कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांनी देश, ख्रिश्चन समुदाय आणि जगासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व अंजू बॉबी जॉर्ज हिने आपल्या प्रदीर्घ क्रीडा कारकिर्दीत क्रीडा क्षेत्रात झालेल्या अमुलाग्र परिवर्तनाचा उल्लेख केला.  अंजूने आपल्या काळातील क्रीडा क्षेत्राला मिळणारे क्षुल्लक प्रोत्साहन आणि आज देश तसेच देशाचे नेतृत्व आजच्या खेळाडूंच्या कर्तृत्वाचा आनंद किती उत्साहाने साजरा करतात यातील तफावत विशद केली.  खेलो इंडिया आणि फिट इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, हे अंजूने अधोरेखित केले.  या परिवर्तनाचे श्रेय तिने पंतप्रधानांच्या नेतृत्वाला दिले.  महिला सबलीकरण कसे प्रत्यक्षात येत आहे यावरही तिने भाष्य केले.  “प्रत्येक भारतीय मुलगी  यशाचे स्वप्न पाहण्यास सज्ज आहे आणि  त्यांची स्वप्ने एके दिवशी पूर्ण होतील असा विश्वास त्या प्रत्येकीला आहे”, असे अंजूने सांगितले.   2036 ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाबद्दल अंजूने आनंद व्यक्त केला.

रेव्ह. डॉ. पॉल स्वरूप, बिशप ऑफ दिल्ली डायोसीज, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया यांनी नाताळच्या  निमित्ताने पंतप्रधान  उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गॉस्पेलची कथा आणि येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आठवण करून देताना डॉ स्वरूप यांनी येशू ख्रिस्ताने लोकांसाठी केलेले बलिदान अधोरेखित केले आणि पंतप्रधान समाजासाठी आणि लोकांसाठी करत असलेल्या प्रयत्नांमध्ये साधर्म्य असल्याचे नमूद केले. त्यांनी नाताळ निमित्त पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या..

 

शैक्षणिक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले दिल्ली स्थित सेंट स्टीफन्स महाविद्यालयाचे प्राचार्य जॉन वर्गीस  यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि इतर धोरणांमध्ये देखील प्रतिबिंबित झालेल्या पंतप्रधानांची दूरदृष्टी, दृढ निर्धार आणि मनाच्या मोठेपणाची प्रशंसा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टिकोनाच्या स्थानिक आणि जागतिक असे दोन्ही पैलू अधोरेखित करून प्राचार्यानी शालेय शिक्षणावर धोरणाचा भर असल्याबद्दल प्रशंसा केली. मातृभाषेला प्रोत्साहन देणे आणि बोर्डाच्या परीक्षा इयत्ता 12 वीपर्यंत मर्यादित ठेवणे यासारख्या तरतुदी प्रगतिशील उपाययोजना असल्याचे नमूद केले.

उच्च शिक्षणासंदर्भात, त्यांनी संसाधनांची वाटणी आणि उच्च कामगिरी करणाऱ्या संस्थांसाठी स्वायत्ततेच्या आश्वासनाची प्रशंसा केली. गेल्या काही वर्षात नवोन्मेष , आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. जॉन वर्गीस यांनी सेंट स्टीफन महाविद्यालयाच्या यंग लीडर्स नेबरहुड फर्स्ट फेलोशिप कार्यक्रमाचीही माहिती दिली आणि ते पंतप्रधानांच्या शेजारी प्रथम धोरणाच्या दृष्टीकोनाला अनुरूप असल्याचे सांगितले. जी 20 शिखर परिषदेतील भारताच्या यशस्वी नेतृत्वाचा उल्लेख करत वर्गीस यांनी ग्लोबल साउथचा आवाज बनल्याबद्दल पंतप्रधानांची प्रशंसा केली.

“भारत ही एक महान संस्कृती आहे, तुम्ही केलेल्या उपाययोजना आणि धोरणांचे उत्कृष्ट परिणाम दिसून आले आहेत. भारताला जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या डिजिटल इंडिया, राष्ट्रीय शिक्षण , शेजारी प्रथम धोरणासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या युवकांना मिळणारे फायदे  एक शिक्षक या नात्याने मला दिसत आहेत,” असे ते म्हणाले. कॉलेज चॅपलमध्ये काल रात्री देशाचे नेते म्हणून पंतप्रधानांसाठी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांचे जगातील सर्वात प्राचीन भाषेबद्दल असलेले प्रेम लक्षात घेऊन, प्राचार्यानी तामिळ भाषेतून भाषणाचा समारोप केला ज्याचा पंतप्रधानांना खूप आनंद झाला.

 

दिल्लीच्या आर्कडिओसीसचे मुख्य बिशप अनिल कौटो यांनी पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी नाताळचा सण आयोजित केल्याबद्दल आभार मानले . हा केवळ ख्रिस्ती बांधवांचा सण नाही तर एक  राष्ट्रीय सण आहे हे यातून दिसून येते. शांतता, प्रेम आणि एकतेचा संदेश देत त्यांनी देशातील सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधानांच्या संदेशाच्या पूर्ततेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी अधोरेखित केले की ख्रिश्चन समुदायाने नेहमीच देशाच्या कल्याणासाठी काम केले आहे आणि भारताच्या विकास, एकता आणि प्रगतीसाठी सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन पंतप्रधानांना दिले. देशासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचे अद्भूत नेतृत्व असेच पुढे सुरु राहण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना देवाची कृपा आणि शक्ती कायम राहो असा आशीर्वाद दिला. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आणि देश आणि नागरिकांना निरंतर यश लाभो अशी प्रार्थना करत त्यांनी भाषणाचा समारोप केला. 

 

कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना,( रेव्ह. )डॉ. पॉल स्वरूप यांनी पंतप्रधानांसोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी नाताळ  साजरा केल्याच्या आनंदाचा पुनरुच्चार केला. बिशप थॉमस मार अँटोनियोस यांनी नाताळच्या शुभ प्रसंगी  पंतप्रधानांशी संवाद आणि चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस म्हणाले की, “पंतप्रधानांचे विचार प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचत आहेत आणि लवकरच आपला देश जगातील आघाडीचा देश होऊ शकतो. "सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास" या मंत्राने पंतप्रधान आपल्या देशाला जागतिक व्यासपीठावर नेतृत्व देत असल्याबद्दल आर्चबिशप अनिल कौटो यांनी आनंद व्यक्त केला.  सेंट स्टीफन्स महाविद्यालयाचे  प्राचार्य, जॉन वर्गीस यांनी पुन्हा एकदा प्रत्येक क्षेत्रात देशाचा गौरव उंचावण्याच्या सध्याच्या धोरणाची प्रशंसा केली आणि ‘जर भारत जिंकला तर जग जिंकेल’ असे नमूद केले.

मुथूट समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर जॉर्ज,यांनी राष्ट्राच्या परिवर्तनात पंतप्रधानांची महत्त्वाची भूमिका केवळ ख्रिश्चन समुदायानेच नव्हे तर भारतातील प्रत्येक समुदायाने पाहिली आहे,असे सांगितले आणि चांगल्या भविष्यासाठी पंतप्रधानांनी दिलेले वचन अधोरेखित केले. जॉयलुक्कास समूहाचे अध्यक्ष अलुक्कास जॉय वर्गीस यांनी पंतप्रधानांच्या साध्या आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. बहरीनमधील अनिवासी भारतीय व्यापारी कुरियन वर्गीस यांनी केवळ आखाती देशांमध्येच नव्हे तर जगभरात भारतासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांना एक महान नेता म्हणत, क्रीडापटू अंजू बॉबी जॉर्ज यांनी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे आणि उत्साहाचे कौतुक केले. "मला वाटते भविष्यात, आम्ही शीर्षस्थानी असू" असेही  तिने यावेळी सांगितलं.अभिनेते दिनो मोरिया यांनी भारताच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या योगदानाचे कौतुक केले आणि सांगितले की, आपल्या लोकांसह देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे. क्यूएस क्वाक्युरेली सायमंड्स मधील आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक अश्विन जेरोम फर्नांडिस म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व जगभर पसरलेले आहे आणि त्यांनी भारतविषयक मोठे आकर्षण निर्माण केले आहे.  पवित्र सी व्हॅटिकन दूतावासचे द्वितीय सचिव केविन जे. किमटीस यांनी भारतीय लोकांप्रती पंतप्रधानांचे हे समर्पण अधोरेखित केले की त्यांच्यासाठी सेवा हे सरकारचे प्राधान्य आहे. बिशप सायमन जॉन यांनी पहिल्यांदाच ख्रिश्चन समुदायाला आपल्या निवासस्थानी नाताळचा सण  साजरा करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल खूप आनंद व्यक्त केला.  अपोलो 24*7 चे मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी जेकब म्हणाले की, “ते पंतप्रधानांकडे एक दयाळू माणूस म्हणून पाहतात आणि पंतप्रधानांनी संवाद साधल्याबद्दल त्यांचे आभार मानले.” क्राइस्ट विद्यापीठाचे प्रशासक सनी जोसेफ यांनी या संधीबद्दल खूप आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, “भविष्यासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि त्यांच्या संदेशाने प्रत्येकाचे मनोबल  उंचावले आहे. दिल्ली येथील वेल्स फार्गो बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकुब मॅथ्यू  यांनी  बदलाची मागणी करणाऱ्या पंतप्रधानांच्या नेतृत्व शैलीचे स्वागत केले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi

Media Coverage

'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."