पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी प्रत्येक पुरस्कार प्राप्त मुलांना स्मृतीचिन्हे दिली आणि नंतर त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला. ज्या कामगिरीमुळे या मुलांची पुरस्कारासाठी त्यांच्या निवड झाली त्या कामगिरीचा तपशील या मुलांनी पंतप्रधानांना सांगितला. संगीत, संस्कृती, सौरऊर्जा, बॅडमिंटन, बुद्धीबळ यांसारखे खेळ आदी विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.
मुलांनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न देखील विचारले, त्यापैकी एकाचे उत्तर देताना, पंतप्रधानांनी सर्व प्रकारच्या संगीतातील त्यांची आवड आणि ते त्यांना एकाग्रता राखण्यात कशाप्रकारे मदत करते याबद्दल सांगितले. काल जाहीर केलेल्या सूर्योदय योजनेबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी त्यांनी उचललेल्या पावलांची आठवण करून दिली. आणि लोकांना या योजनेचा कशाप्रकारे फायदा होईल हे देखील सांगितले.पंतप्रधानांनी मुलांशी आजच्या दिवसाच्या महत्त्वाविषयी चर्चा केली आणि त्यांना पराक्रम दिवस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारशाचा सरकार कशाप्रकारे सन्मान करत आहे याबद्दल सांगितले.
कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण या सात श्रेणींमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करते. प्रत्येक पुरस्कारप्राप्त मुलाला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. या वर्षी देशभरातील 19 मुलांची विविध श्रेणींमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -2024 साठी निवड करण्यात आली. पुरस्कार विजेत्यांमध्ये 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश होता.