पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला गुजरात मधील दिवसभराचा भरगच्च कार्यक्रमांचा दौरा आटोपून, वाराणसी येथे पोहोचल्यावर गुरुवारी रात्री 11 वाजता शिवपूर-फुलवारिया-लहरतारा मार्गाची पाहणी केली.
या मार्गाचे नुकतेच उदघाटन झाले आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे बनारस हिंदू विद्यापीठ,बीएलडब्ल्यू यासारख्या दक्षिणी भागात राहणाऱ्या सुमारे पाच लाख लोकांना विमानतळ, लखनौ, आझमगड आणि गाझीपूर येथे जाण्याची सोय होणार आहे.
हा मार्ग बांधण्यासाठी 360 कोटी रुपये खर्च आला. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. तसेच यामुळे बनारस हिंदू विद्यापीठापासून विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा वेळ 75 मिनिटांवरून 45 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. त्याचप्रमाणे लहरतारा ते कचहरी हे अंतर 30 मिनिटांवरून 15 मिनिटांपर्यंत कमी झाले आहे.
वाराणसी मधील नागरिकांचे जीवनमान सुलभ व्हावे या उद्देशाने या प्रकल्पामध्ये रेल्वे ते संरक्षण मंत्रालयाचा आंतर-मंत्रालयीय समन्वय दिसून आला.
पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे:
“काशी मध्ये उतरल्यावर शिवपूर-फुलवारिया-लहरतारा मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे नुकतेच उदघाटन झाले आहे आणि शहराच्या दक्षिणेकडे राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होत आहे.”
Upon landing in Kashi, inspected the Shivpur-Phulwaria-Lahartara Marg. This project was inaugurated recently and has been greatly helpful to people in the southern part of the city. pic.twitter.com/9W0YkaBdLX
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2024