पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत होत असलेल्या उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांनी सशक्त उत्तराखंड नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले आणि हाऊस ऑफ हिमालयाज या ब्रँडचे उद्घाटन केले. ‘पीस टू प्रॉस्पेरिटी’(शांततेतून समृद्धीकडे) ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे.
यावेळी आघाडीच्या उद्योजकांनी देखील आपले विचार व्यक्त केले. अदानी समूहाचे संचालक आणि (ऍग्रो, ऑईल आणि वायू)चे संचालक प्रणव अदानी यांनी सांगितले की उत्तराखंडमधील राज्य सरकारचा अलीकडच्या काळात या राज्याची प्रगती आणि विकासाकरिता असलेल्या दृष्टीकोनामुळे हे राज्य खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षक स्थानांपैकी एक बनले आहे. एक खिडकी मंजुरी, स्पर्धात्मक जमीन मूल्य, परवडणारी वीज आणि कार्यक्षम वितरण, उच्च कौशल्यप्राप्त मनुष्यबळ आणि राष्ट्रीय राजधानीपासूनचे जवळचे अंतर आणि एक अतिशय स्थिर कायदा आणि सुव्यवस्थेचे वातावरण यामुळे हे घडले आहे.या राज्यात आपल्या उद्योगांचा विस्तार करण्याची आणि अधिक जास्त प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराला आकर्षित करण्याची आपली योजना असल्याचे अदानी यांनी सांगितले. उत्तराखंड राज्याला सातत्याने दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि म्हणाले की भारतातील जनतेने त्यांच्याविषयी अभूतपूर्व आत्मविश्वास आणि विश्वास दाखवला आहे.
जेएसडब्लूचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांनी उत्तराखंड राज्याबरोबर पंतप्रधानांचे असलेले घनिष्ठ संबंध अधोरेखित केले, ज्यांचा जिंदाल यांना केदारनाथ आणि बद्रीनाथ यांच्या विकास प्रकल्पांदरम्यान अनुभव आला.देशाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली आणि जीडीपी वृद्धीच्या आकडेवारीचा उल्लेख करत भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला. जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने होत असलेल्या भारताच्या प्रवासामध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे जिंदाल यांनी आभार मानले. देशभरातील तीर्थक्षेत्रांसोबतची संपर्कव्यवस्था सुधारण्यावर सरकार भर देत असल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. उत्तराखंडमध्ये 15,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची कंपनीची योजना असल्याचे सांगत त्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या ‘स्वच्छ केदारनाथ’ प्रकल्पाविषयी देखील सांगितले. त्यांनी उत्तराखंड सरकारचे त्यांच्या पाठबळाबद्दल आभार मानले आणि भारताच्या विकास प्रवासात आपल्या कंपनीचे सातत्याने पाठबळ राहील अशी ग्वाही पंतप्रधानांना दिली.
आयटीसीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी जी20 शिखर परिषदेच्या यशाच्या आठवणीला उजाळा देत पंतप्रधानांच्या जागतिक नेतृत्वक्षमतेची आणि ग्लोबल साऊथच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याच्या त्यांच्या कृतीची प्रशंसा केली. बहु-आयामी आव्हानांना तोंड देणाऱ्या जगात गेल्या काही वर्षात केलेल्या उद्देशपूर्ण धोरणांच्या उपाययोजनांमुळे भारताचे महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांमध्ये झालेला कायापालट आणि जीडीपीची आकडेवारी स्वतःच याचे दाखले देत आहेत, असे ते म्हणाले. या नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर एक अशी स्थिती निर्माण झाली आहे की हे दशक आणि काहींच्या म्हणण्यानुसार तर हे शतकच भारताचे आहे.
पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान म्हणजे विकसित भारताचे दूरदर्शी आणि भारतातील 140 कोटी नागरिकांबरोबरच जगाचे कौटुंबिक सदस्य असल्याचे सांगितले. त्यांनी पंतप्रधानांच्या भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाला अधोरेखित केले आणि गुंतवणूक आणण्यामध्ये आणि रोजगार निर्मितीमध्ये पतंजली योगदान देत आहे, असे सांगितले. यापुढील काळात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची आणि 10,000 पेक्षा जास्त रोजगारांची त्यांनी पंतप्रधानांना हमी दिली. नवभारताच्या निर्मितीबाबतचा निर्धार आणि इच्छाशक्ती याबद्दल त्यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली.राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आणि कॉर्पोरेट समूहांना राज्यात उद्योग उभारण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पर्यटन, आरोग्य, शिक्षण, कृषी, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या विकासाचेही त्यांनी कौतुक केले. भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पाला बळ देण्याचे आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे आवाहन त्यांनी गुंतवणूकदारांना केले.
इमार इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण चक्रवर्ती यांनी देशाच्या विकासाला दिशा, दृष्टिकोन आणि दूरदृष्टी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात भागीदार बनण्यासाठी कॉर्पोरेट जगत वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत-संयुक्त अरब अमिराती संबंधात नवीन चैतन्य आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. इमार चे मुख्यालय युएई मध्ये आहे. भारताकडे पाहण्याचा जागतिक दृष्टीकोनातील सकारात्मक बदल देखील कल्याण चक्रवर्ती यांनी अधोरेखित केला. त्यांनी वस्तू आणि सेवा कर तसेच फिनटेक क्रांती यांसारख्या अनेक धोरणात्मक सुधारणांचा उल्लेख केला ज्यामुळे औद्योगिक जगतासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचे अध्यक्ष आर. दिनेश यांनी पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाप्रति कंपनी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. उत्तराखंडच्या विकास यात्रेतील संस्थेच्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला आणि लॉजिस्टिक तसेच वाहन उद्योग क्षेत्रात टायर आणि सुट्या भागांचे उत्पादन करणारे कारखाने आणि सेवांची उदाहरणे दिली. उत्पादन क्षेत्र आणि गोदाम क्षमतेमध्ये आणखी गुंतवणूक करण्याच्या कंपनीच्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला ज्यामुळे समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये 7,000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत . सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे डिजिटल आणि शाश्वत परिवर्तनामध्ये आर्थिक सहाय्य आणि कौशल्य प्रशिक्षण पुरवून वाहन बाजारपेठ क्षेत्रातील भागीदारांना मार्गदर्शन करण्याची कंपनीची तयारी असल्यावर त्यांनी भर दिला. भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून 1 लाखांहून अधिक लोकांना समुपदेशन आणि सहाय्य पुरवण्यासाठी 10 आदर्श करिअर केंद्रे स्थापन करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.आदरातिथ्य, आरोग्यसेवा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांमधील 10,000 लोकांना प्रशिक्षित करण्याची क्षमता असलेले विशेष बहु- कौशल्य विकास केंद्र स्थापन करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असेल अशी माहिती त्यांनी दिली.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी देवभूमी उत्तराखंडमध्ये यायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि शतकातील तिसरे दशक हे उत्तराखंडचे दशक असल्याचे यापूर्वी म्हटले होते याचे स्मरण करून दिले. हे विधान आज प्रत्यक्षात साकार होत आहे ही समाधानाची बाब आहे असे मोदी म्हणाले. सिल्क्यारा येथील बोगद्यातून कामगारांना सुखरुपणे बाहेर काढण्याच्या यशस्वी बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे तसेच राज्य सरकारचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
उत्तराखंडशी असलेल्या आपल्या घनिष्ठ नात्याचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंड हे असे राज्य आहे जिथे एकाच वेळी देवत्व आणि विकास जाणवतो. ही भावना अधिक विशद करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांची एक कविता ऐकवली.
यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांचा उद्योग क्षेत्रातील दिग्गज असा उल्लेख करून, पंतप्रधानांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी SWOT- सामर्थ्य , उणीवा , संधी आणि धोके याबाबत केलेल्या विश्लेषणाशी साधर्म्य साधले आणि देशात हा प्रयोग करण्यावर भर दिला. आपल्याकडे SWOT विश्लेषण केले तर त्या निष्कर्षात देशात विपुल प्रमाणात आकांक्षा, आशा, आत्मविश्वास, नवोन्मेष आणि संधी असल्याचे आपल्याला आढळेल असे त्यांनी अधोरेखित केले.धोरणाभिमुख प्रशासनाचे द्योतक आणि राजकीय स्थैर्यासाठी नागरिकांच्या संकल्पाचाही त्यांनी उल्लेख केला. “आकांक्षी भारताला अस्थिरतेपेक्षा स्थिर सरकार हवे आहे” असे सांगत पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष वेधले . लोकांनी सुशासन आणि यासंबंधीच्या आधीच्या कामगिरीच्या आधारे मतदान केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कोविड महामारी आणि अस्थिर भौगोलिक-राजकीय परिस्थितीचा विचार न करता विक्रमी गतीने पुढे जाण्याची देशाची क्षमता पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली. “कोरोना लस असो किंवा आर्थिक धोरणे असो, भारताचा आपल्या क्षमतांवर आणि धोरणांवर विश्वास होता” असे पंतप्रधानांनी नमूद केले. परिणामी, जगातील इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत वेगळ्या स्थानी दिसत आहे असे पंतप्रधान म्हणाले. उत्तराखंडसह भारतातील प्रत्येक राज्याला या सामर्थ्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी दुहेरी इंजिन सरकारच्या फायद्यांचा पुनरुच्चार केला ज्याचे दुहेरी प्रयत्न सर्वत्र दिसत आहेत. राज्य सरकार स्थानिक वास्तव लक्षात घेऊन काम करत असताना, केंद्र सरकार उत्तराखंडमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. सरकारचे दोन्ही स्तर परस्परांच्या प्रयत्नांना चालना देत आहेत. ग्रामीण भाग ते चार धामपर्यंत सुरू असणाऱ्या कामाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, तो दिवस दूर नाही जेव्हा दिल्ली-डेहराडून प्रवासाचा वेळ अडीच तासांवर येईल. डेहराडून आणि पंतनगर विमानतळाच्या विस्तारामुळे हवाई संपर्क मजबूत होईल. राज्यात हेली-टॅक्सी सेवेचा विस्तार करण्यात येत असून रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यात येत आहे. या सर्वातून शेती, उद्योग, लॉजिस्टिक, साठवण, पर्यटन आणि आदरातिथ्य यासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
सीमावर्ती भागात असलेल्या ठिकाणी मर्यादित प्रवेश मंजूर करणार्या पूर्वीच्या सरकारांच्या दृष्टिकोनाच्या विरुध्द या गावांना देशाचे पहिले गाव म्हणून विकसित करण्याच्या दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांना त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी आकांक्षी जिल्हे आणि आकांक्षी तालुका कार्यक्रमाचा उल्लेख केला ज्यामध्ये विकासाच्या मापदंडांमध्ये पिछाडीवर असलेल्या गावांवर आणि प्रदेशांवर भर दिला जात आहे. उत्तराखंडच्या उपयोगात न आणलेल्या क्षमतेवर प्रकाश टाकताना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी गुंतवणूकदारांना केले.
दुहेरी-इंजिन सरकारचे लाभ मिळवणाऱ्या उत्तराखंडच्या पर्यटन क्षेत्रावर प्रकाश टाकून पंतप्रधानांनी जगभरातील तसेच देशातील लोकांचा भारत भेटीसाठी असलेला उत्साह नमूद केला. पर्यटकांना निसर्गाची तसेच भारताच्या वारशाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने संकल्पनाधारित पर्यटन सर्किट तयार करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. निसर्ग, संस्कृती आणि वारसा यांचा मिलाफ असलेले उत्तराखंड एक ब्रँड म्हणून उदयास येणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. योग, आयुर्वेद, तीर्थ आणि साहसी क्रीडा क्षेत्रातील संधींचा धांडोळा घेऊन त्या निर्माण करण्याला गुंतवणूकदारांनी प्राधान्य द्यावे यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदींनी देशातील सधन, संपन्न आणि तरुणांना ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेडिंग इन इंडिया’ ही चळवळ सुरू करण्याचे आवाहन केले. पुढील पाच वर्षांत उत्तराखंडमध्ये किमान एक विवाह सोहळा आयोजित करून तो पार पाडण्याची विनंती त्यांनी तरुणांना केली. कोणताही संकल्प साध्य करण्याची भारताची क्षमता आहे हे अधोरेखित करताना "उत्तराखंडमध्ये 1 वर्षात 5000 विवाहसोहळे संपन्न झाले तर, एक नवीन पायाभूत सुविधा निर्माण होईल आणि जगभरातील लोकांसाठी हे राज्य वेडिंग डेस्टिनेशनमध्ये परिवर्तित होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारतात परिवर्तनाचे जोरदार वारे वाहत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षांत महत्त्वाकांक्षी भारताची निर्मिती झाली आहे. पूर्वी वंचित असलेल्या लोकसंख्येचा मोठा भाग योजना आणि संधींशी जोडला जात आहे. दारिद्रयमुक्त झालेली कोट्यवधी जनता अर्थव्यवस्थेला नवी
गती देत आहे. नवमध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग दोघेही जास्त खर्च करत आहेत “आपल्याला भारतातील मध्यमवर्गाची क्षमता समजून घ्यावी लागेल. उत्तराखंडमधील समाजाची ही शक्ती तुमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ निर्माण करत आहे,” असेही मोदींनी उद्धृत केले.
हाऊस ऑफ हिमालय ब्रँड सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी उत्तराखंड सरकारचे अभिनंदन केले आणि उत्तराखंडची स्थानिक उत्पादने परदेशी बाजारपेठेत नेण्यासाठी हा एक अभिनव प्रयत्न असल्याचे म्हटले. हाऊस ऑफ हिमालयामुळे आमची व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल ही संकल्पना आणखी बळकट झाल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. भारतातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील उत्पादनांमध्ये जागतिक बनण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशात मातीची महागडी भांडी बनवली आणि वैशिष्यपूर्णरीत्या सादर केली जात असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. पारंपरिकपणे अशी अनेक उत्कृष्ट उत्पादने बनवणाऱ्या भारतातील विश्वकर्मांचे कौशल्य आणि कलाकुसर लक्षात घेऊन पंतप्रधानांनी अशा स्थानिक उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठ शोधण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशी उत्पादने जाणून घेण्याचे आवाहन केले. त्यांनी त्यांना महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक संघटनेमध्ये सहभागी होण्याच्या संधी आजमावण्याचे आवाहन केले."स्थानिक हे-जागतिक बनवण्यासाठी ही एक उत्तम प्रकारची भागीदारी असू शकते", असे त्यांनी पुढे नमूद केले.पंतप्रधानांनी देशातील ग्रामीण भागातून दोन कोटी लखपती दिदी तयार करण्याचा आपला संकल्प अधोरेखित करत,’लखपती दीदी’ या अभियानावर प्रकाश टाकत सांगितले, की हाऊस ऑफ हिमालया या ब्रँडची सुरुवात केल्याने या अभियानास अधिक गती मिळेल. या उपक्रमासाठी त्यांनी उत्तराखंड सरकारचे आभार मानले.
लाल किल्ल्यावरून केलेल्या ‘राष्ट्राचे चरित्र्य’ बळकट करण्याच्या आपल्या आवाहनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सर्वांना सांगितले, “आपण जे काही करु ते जगातील सर्वोत्तमच असले पाहिजे. आपले मापदंड जगाने पाळले पाहिजेत. आता आपल्याला निर्यात-केंद्रित उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आहे.” ते म्हणाले की महत्त्वाकांक्षी पीएलआय मोहिमेमधून महत्वपूर्ण क्षेत्रांसाठी सुयोग्य वातावरण तयार करण्याचा संकल्प दिसून येतो. नवीन गुंतवणुकींद्वारे स्थानिक पुरवठा साखळी आणि एमएसएमई मजबूत करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
स्वस्त निर्यातीच्या मानसिकतेतून बाहेर पडून क्षमता वाढीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपले पेट्रोलियमसाठी 15 लाख कोटी रुपये आणि कोळशासाठी 4 लाख कोटी रुपये आयातीवर खर्च होतात, असे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी डाळी आणि तेलबियांची आयात कमी करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली कारण आजही भारताला 15 हजार कोटी रुपयांच्या डाळींची आयात करावी लागते.
भारत भरड धान्यांसारख्या पौष्टिक अन्नाने समृद्ध असताना पौष्टिकतेच्या नावाखाली पॅकेज्ड फूडच्या विरोधात पंतप्रधानांनी सर्वांना सावध केले. त्यांनी आयुषशी संबंधित सेंद्रिय अन्न उत्पादन करण्याच्या शक्यता आणि राज्यातील शेतकरी आणि उद्योजकांना त्या उपलब्ध करून देणाऱ्या संधींवरही प्रकाश टाकला.स्थानिक उत्पादनांनी पॅकेज्ड फूडसाठी देखील जागतिक बाजारपेठेत मुसंडी मारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याचा काळ भारत, त्यांच्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी अभूतपूर्व काळ आहे, असे आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान म्हणाले. ‘भारत पुढील काही वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे, आणि यांचे श्रेय स्थिर सरकार, सहाय्यक धोरण प्रणाली, सुधारणा आणि परिवर्तनाची मानसिकता आणि विकासावरील आत्मविश्वास यांना आहे,”असे पंतप्रधान म्हणाले . गुंतवणूकदारांना उत्तराखंडसोबत चालण्याचे आणि विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन करत ते म्हणाले,“हीच वेळ आहे, योग्य वेळ हीच आहे. हीच भारताची वेळ आहे”.
उत्तराखंडचे राज्यपाल, निवृत्त. लेफ्टनंट.जनरल गुरमित सिंग आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
‘उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023’ हे उत्तराखंडला गुंतवणुकीचे नवीन ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. ही दोन दिवसीय शिखर परिषद 8 आणि 9 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली असून “शांती ते समृद्धी”या संकल्पनेवर आधारित आहे
या परिषदेला जगभरातून हजारो गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात विविध केंद्रीय मंत्री, अनेक देशांचे राजदूत यांच्यासह आघाडीच्या उद्योगपतींचा सहभाग असेल.
Uttarakhand is a state where we experience both divinity and development together. pic.twitter.com/R3kCptgsAU
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
India is full of aspirations, brimming with hope, self-confidence, innovation and opportunities. pic.twitter.com/ALNHVzYSmW
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
Every Indian feels that it is his or her responsibility to build a developed India. pic.twitter.com/MVSWlADxqA
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
Developing border villages as first villages of the country. pic.twitter.com/j8zrdwn8fj
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
Local products of every district and block have the potential to go global. pic.twitter.com/cwbDvdw0Xj
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
Strengthening national character for building a developed India. pic.twitter.com/BYTxwqGMzS
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
Encouraging investments in India through PLI scheme. pic.twitter.com/QWIMcPoHGZ
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
Strengthening supply chains to become self-sufficient. pic.twitter.com/23Znv2bfF9
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
This is India's moment. pic.twitter.com/o2XTrTgENl
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023