“हा नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि सातत्याने कार्य सिद्धीस नेण्याचा कार्यकाळ आहे ”
“एक जग, एक कुटुंब, एक भविष्य हे तत्व आज, जागतिक कल्याणाची आवश्यकता ठरले आहे”
“आज वेगाने बदलत असलेल्या जगात, भारत ‘विश्व मित्राच्या भूमिकेतून पुढे जात आहे”
“भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी आज जागतिक संस्थाही उत्साहित आहेत ”
“गेल्या 10 वर्षात करण्यात आलेल्या संरचनात्मक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेची क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढली आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे उद्घाटन झाले. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना, “भविष्यासाठीचा मार्ग” अशी असून त्यात, 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्थांचा सहभाग आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयासाठी एक व्यासपीठ म्हणूनही ह्या शिखर परिषदेचा वापर होत असून,  त्याद्वारे ईशान्य भारत प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी उद्योजकांसमोर मांडल्या जात आहेत. 

अनेक उद्योजकांनी  या परिषदेत आपले विचार व्यक्त केले. आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल, जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी, अमेरिकेतील मायक्रॉन टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, दक्षिण कोरियाच्या सिमटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ्री चन, टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलेयम, एनव्हीडिया कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, शंकर त्रिवेदी आणि जेरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कामत यांची यावेळी भाषणे झाली . या सर्वांनी त्यांच्या भविष्यातील व्यवसायिक योजनांची माहिती दिली. सर्व उद्योजकांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.

 

जपानचे आंतरराष्ट्रीय व्यवहार उपमंत्री शिन होसाका, सौदी अरेबियाचे गुंतवणूक सहाय्यक मंत्री इब्राहिम युसेफ अल मुबारक, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, दक्षिण आशिया, राष्ट्रकुल आणि संयुक्त राष्ट्रांचे राज्यमंत्री तारिक अहमद, आर्मेनियाचे अर्थमंत्री वहान केरोब्यान, आर्थिक व्यवहार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री टिट रीसालो, मोरोक्कोचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री रियाद मेझौर, नेपाळचे अर्थमंत्री प्रकाश शरण महत, व्हिएतनामचे उपपंतप्रधान ट्रान लु क्वांग, चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेट्र फियाला आणि मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी, तिमोर लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस-होर्ता यांनीही गुजरात व्हायब्रंट ग्लोबल शिखर परिषदेला संबोधित केले. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक,  शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी देखील शिखर परिषदेच्या सुरुवातीला आपले भाषण केले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना,पंतप्रधानानी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत , पुढची 25 वर्षे म्हणजे अमृत काळात देशासाठी सर्वांनी मेहनत करायची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. . हा नव्या स्वप्नांचा, नव्या संकल्पाचा आणि सातत्याने कार्य पूर्ण करण्याचा काळ आहे.” असे सांगत या अमृत काळातील गुजरात व्हायब्रंट ग्लोबल शिखर परिषद अधिक महत्वाची ठरते, असे पंतप्रधान म्हणाले.

 

व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेतील संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग विशेष आहे कारण ते भारत आणि यूएई यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे द्योतक आहे. त्यांनी व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद ही आर्थिक विकास आणि गुंतवणुकीशी संबंधित चर्चेसाठी जागतिक व्यासपीठ बनल्याचा उल्लेख केल्याने भारताप्रती त्यांचे विचार आणि समर्थन उत्साहवर्धक आणि आत्मीयतापूर्ण आहे असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. अक्षय ऊर्जा क्षेत्र, नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा आणि भारताच्या बंदर पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी भारत-युएई भागीदारी वाढविण्यावर त्यांनी प्रकाश टाकला. गिफ्ट सिटीमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या सार्वभौम संपत्ती निधीद्वारे सुरू केलेल्या क्रियान्वयनाचा आणि ट्रान्सवर्ल्ड कंपन्यांद्वारे विमान आणि जहाजे भाडेतत्वावर देण्याच्या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. भारत आणि युएई संबंधांमधील वाढत्या भागीदारीसाठी पंतप्रधानांनी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना सर्वाधिक श्रेय दिले.

मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष आणि आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी फिलिप न्युसी यांच्या ऑगस्ट मधील भारत दौऱ्याचा संदर्भ देत, भारतीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आफ्रिकन युनियनचा जी 20 चा स्थायी सदस्य म्हणून समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले की राष्ट्राध्यक्ष न्युसी यांच्या उपस्थितीने भारत-मोझांबिक तसेच भारत-आफ्रिका संबंध अधिक दृढ झाले आहेत.

 

झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान, पेत्र फियाला यांची त्यांच्या देशाचे पंतप्रधान म्हणून पहिली भारत भेट, हे चेक प्रजासत्ताकचे भारतासोबत तसेच व्हायब्रंट गुजरातशी असलेल्या जुन्या संबंधांचे द्योतक आहे. पीएम मोदींनी वाहन उद्योग, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी नोबेल पारितोषिक विजेते आणि तिमोर लेस्टेचे अध्यक्ष जोसे रामोस-होर्टा यांचे स्वागत केले आणि महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा त्यांनी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेला वापर अधोरेखित केला.

व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी नमूद केले की या शिखर परिषदेने नवीन संकल्पनांना वाव दिला आहे आणि गुंतवणूक आणि परताव्यासाठी नवीन प्रवेशद्वार निर्माण केले आहे. ‘भविष्यासाठी प्रवेशद्वार’ या यावर्षीच्या संकल्पनेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, 21व्या शतकातील भविष्य सामायिक प्रयत्नांनी उज्वल होईल. भारताच्या जी 20 अध्यक्षतेदरम्यान, भविष्यासाठी एक आराखडा सादर केला गेला आहे आणि व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेच्या दृष्टीकोनातून तो पुढे नेला जात आहे. ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वांसोबत I2U2 आणि इतर बहुपक्षीय संस्थांसोबत भागीदारी मजबूत करण्याचाही त्यांनी उल्लेख केला, जी आता जागतिक कल्याणाची पूर्वअट बनली आहे.

वेगाने बदलणाऱ्या जगात भारत ‘विश्वमित्र’च्या भूमिकेत वाटचाल करत आहे. आज भारताने समान सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्याचा विश्‍वास जगाला दिला आहे. जागतिक कल्याणासाठी भारताची वचनबद्धता, प्रयत्न आणि कठोर परिश्रम जग अधिक सुरक्षित आणि समृद्ध करत आहेत. जग भारताकडे स्थिरतेचा एक महत्त्वाचा कणा म्हणून पाहते. एक मित्र ज्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, एक भागीदार जो लोककेंद्रित विकासावर विश्वास ठेवतो, एक आवाज जो जागतिक भल्यावर विश्वास ठेवतो, जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढीचे इंजिन, उपाय शोधण्यासाठी एक तंत्रज्ञान केंद्र, प्रतिभावान तरुणांचे शक्तीस्थान आणि लोकशाही प्रदान करतो ”, पंतप्रधान म्हणाले.

"भारतातील 1.4 अब्ज नागरिकांचे प्राधान्यक्रम आणि आकांक्षा, मानव-केंद्रित विकासावरील त्यांचा विश्वास आणि सर्वसमावेशकता तसेच समानतेप्रती सरकारची बांधिलकी हा जागतिक समृद्धी आणि विकासाचा एक प्रमुख पैलू आहे", असे पंतप्रधानांनी नमूद केले.  भारत ही आज जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तर 10 वर्षांपूर्वी ती 11व्या स्थानावर रेंगाळत होती असे त्यांनी सांगितले. जगातील विविध मूल्यांकन संस्थांच्या अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत भारत जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. "तज्ज्ञ याचे विश्लेषण करू शकतात, परंतु मी हमी देतो की भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल", असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. जग अनेक भू-राजकीय अस्थिरतेचा सामना करत असताना भारत, जगासाठी आशेचा किरण बनला आहे, असे ते पुढे म्हणाले. व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत भारताच्या प्राधान्यक्रमांची झलक दिसत असून शाश्वत उद्योग, उत्पादन आणि पायाभूत सुविधा, नवीन युगातील कौशल्ये, भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा आणि सेमीकंडक्टरचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. सर्वांनी, विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गुजरातमधील व्यापार प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. महामहीम न्यूसी आणि महामहीम रामोस होर्टा यांच्यासमवेत  या व्यापार प्रदर्शनाला पंतप्रधानांनी काल भेट दिली होती. त्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, या व्यापार प्रदर्शनात ई-मोबिलिटी, स्टार्ट-अप्स, नील (सागरी) अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. या सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी सतत नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेचा आणि गतीचा आधार म्हणून संरचनात्मक सुधारणांवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. कारण या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेची क्षमता, सामर्थ्य आणि स्पर्धात्मकता वाढली आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पुनर्भांडवलीकरण आणि आय. बी. सी. मुळे बँकिंग प्रणाली मजबूत झाली आहे. सुमारे 40 हजार अनुपालन रद्द केल्याने व्यवसाय सुलभ झाला आहे. कर आकारणीची जटिलता जीएसटी ने दूर केली  आहे. जागतिक पुरवठा साखळीच्या वैविध्यतेसाठी चांगले वातावरण निर्माण केले आहे. अलीकडेच 3 मुक्त व्यापार करारावर  स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यातील एक संयुक्त अरब अमिरातीसोबत आहे; अनेक क्षेत्रे स्वयंचलित थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुले करणे, पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक आणि भांडवली खर्चात 5 पट वाढ झाली आहे असे ते म्हणाले. हरित आणि पर्यायी ऊर्जा स्त्रोतांमधील अभूतपूर्व प्रगती, अक्षय ऊर्जा क्षमतेत 3 पट वाढ, सौर ऊर्जा क्षमतेत 20 पट क्षमता, परवडणाऱ्या डेटा किंमतींमुळे डिजिटल समावेशन झाले आहे, प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर, 5G ची सुरुवात, 1 लाख 15 हजार नोंदणीकृत स्टार्टअप्ससह आपण तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. निर्यातीत झालेल्या विक्रमी वाढीचाही त्यांनी उल्लेख केला.

 

भारतात होत असलेले परिवर्तन लोकांचे जीवन सुलभ करत आहे, आणि त्यांना सक्षम बनवत आहे, याचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी नमूद केले की, गेल्या 5 वर्षांत 13.5 कोटीहून अधिक लोक गरिबीपासून मुक्त झाले आहेत, तर मध्यमवर्गीयांचे सरासरी उत्पन्न सातत्याने वाढत आहे. त्यांनी महिला कामगारांच्या सहभागात झालेल्या विक्रमी वाढीचाही उल्लेख केला , जे भारताच्या भविष्याचे निदर्शक आहे. पंतप्रधान म्हणाले, “आपण सर्वांनी याच उर्जेने भारताच्या गुंतवणुक प्रवासाचा एक भाग बनावे, असे मी आवाहन करतो.”

लॉजिस्टिक्स आणि वाहतूक सुलभतेसाठी आधुनिक धोरणात झालेल्या सुधारणांचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी, एका दशकात विमानतळांच्या संख्येत 74 वरून 149 इतकी वाढ, भारतातील राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कमध्ये दुप्पट वाढ, मेट्रो नेटवर्कची तिप्पट वाढ, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर, राष्ट्रीय जलमार्ग, बंदराच्या हाताळणी वेळेत वाढ, आणि जी 20 दरम्यान जाहीर करण्यात आलेला भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, या गोष्टी अधोरेखित केल्या. “आपल्या सर्वांसाठी गुंतवणुकीची ही मोठी संधी आहे”, ते म्हणाले.

 

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या कानाकोपऱ्यात गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी आहेत, आणि व्हायब्रंट गुजरात परिषद, हे यासाठी एक प्रवेशद्वार आहे, भविष्याचे प्रवेशद्वार आहे. “तुम्ही केवळ भारतात गुंतवणूक करत नसून, तरुण निर्माते आणि ग्राहकांची नवीन पिढी घडवत आहात. भारताच्या महत्वाकांक्षी तरुण पिढीबरोबरची तुमची भागीदारी असे सकारात्मक परिणाम दाखवू, शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल”, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिप न्युसी, तिमोर लेस्टेचे राष्ट्राध्यक्ष जोस रामोस-होर्टा, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेट्र फियाला, व्हिएतनामचे उपपंतप्रधान ट्रॅन लु क्वांग, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संकल्पित    व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद ही सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी व्यावसायिक सहयोग, माहितीची देवाणघेवाण आणि धोरणात्मक भागीदारी यासाठी सर्वात प्रतिष्ठित जागतिक मंच म्हणून विकसित झाली आहे. 10 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेली दहावी व्हायब्रंट गुजरात जागतिक  परिषद, “व्हायब्रंट गुजरातची 20 वर्षे, यशाची परिपूर्ति”, म्हणून साजरी केली जात आहे. ‘गेटवे टू द फ्युचर’, ही या परिषदेची संकल्पना आहे.

34 देश आणि 16 संस्था यंदाच्या परिषदेचे भागीदार आहेत. त्याशिवाय, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या माध्यमातून ईशान्येकडील प्रदेशांमधील गुंतवणुकीच्या संधी प्रदर्शित करेल.

व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या पार्श्वभूमीवर, इंडस्ट्री 4.0, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, शाश्वत उत्पादन, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि शाश्वत ऊर्जा आणि शाश्वततेच्या दिशेने परिवर्तन, यासारख्या जागतिक विषयांशी  संबंधित चर्चासत्र आणि परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi

Media Coverage

'You Are A Champion Among Leaders': Guyana's President Praises PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."