पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे सूरत हिरे बाजाराचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधानांनी पंचतत्व उद्यानाला भेट दिली, सुरत हिरे बाजार आणि स्पाइन-4 च्या हरित इमारतीची पाहणी केली तसेच तेथील अभ्यागत पुस्तिकेवर स्वाक्षरी देखील केली. आदल्या दिवशी पंतप्रधानांनी सुरत विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले.
सुरत हिरे बाजार उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी हा बाजार म्हणजे सूरत शहराच्या वैभवात नवा हिरा बसवला गेला अशी टिप्पणी केली. “हा सामान्य हिरा नसून जगातील सर्वश्रेष्ठ हिरा आहे”, असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, सूरत हिरे बाजाराची चमक जगातील सर्वात मोठ्या वास्तूंना दिपवून टाकत आहे. या बाजाराचे श्रेय पंतप्रधानांनी वल्लभभाई लखानी आणि लालजीभाई पटेल यांच्या नम्रतेला आणि एवढ्या मोठ्या मिशनच्या यशासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भावनेला दिले. पंतप्रधानांनी याप्रसंगी सूरत हिरे बाजाराच्या यशासाठी झटणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. “जगातील हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीच्या चर्चेत भारतातील सूरत हिरे बाजाराचे नाव अभिमानाने घेतले जाईल”, हे त्यांनी अधोरेखित केले. “सुरत हिरे बाजार भारतीय कलाकुसर, कारागीर, साहित्य आणि संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ही इमारत नवीन भारताच्या क्षमता आणि संकल्पांचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले. सूरत हिरे बाजाराच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिरे उद्योग, सुरत, गुजरात आणि भारतातील लोकांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी आज सकाळी सूरत हिरे बाजार इमारतीला दिलेली भेट आठवून या इमारतीच्या स्थापत्य कलेवर प्रकाश टाकत हरित इमारतीचा उल्लेख केला. ही इमारत जगभरातील पर्यावरण समर्थकांसाठी एक उदाहरण बनू शकते तसेच इमारतीची एकूण वास्तुकला विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी शिकण्यासाठी एक साधन म्हणून उपयोगी ठरु शकते असे पंतप्रधानांनी या इमारती संदर्भात बोलताना सांगितले. पंचतत्व उद्यानाचा उपयोग लँडस्केपिंगचे आदर्श उदाहरण म्हणून केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
सुरतला मिळालेल्या इतर दोन भेटवस्तूंबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सुरत येथे नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुरत विमानतळाचा दर्जा उंचावण्याचा उल्लेख केला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीची पूर्तता झाल्यामुळे सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पंतप्रधानांचा सन्मान केला. सुरत दुबई विमान सेवा सुरू झाल्याची तर हॉंगकॉंगसाठी लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. "सुरतसह, गुजरातमध्ये आता तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत", असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनचे सुरत शहराशी असलेले वैयक्तिक संबंध आणि शिकण्याची संधी देणाऱ्या अनुभवांवर प्रकाश टाकताना त्यांनी सबका साथ सबका प्रयास या भावनेचा उल्लेख केला. "सुरतची माती इतरा शहरांपेक्षा वेगळी आहे" असे ते म्हणाले. या प्रदेशात उत्पादीत कापसाची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. सुरतच्या आजवरच्या प्रवासातील चढ-उतारावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, ब्रिटिश जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हा सुरतच्या भव्यतेने त्यांना आकर्षित केले. सुरत हे जगातील सर्वात मोठे जहाज बांधणीचे केंद्र होते आणि सुरतच्या बंदरावर 84 देशांच्या जहाजांचे झेंडे फडकत असत, त्या काळाची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. "आता, ही संख्या 125 पर्यंत वाढेल", असे ते म्हणाले. शहराला भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी आरोग्यविषयक गंभीर समस्या आणि पूर यांचा उल्लेख केला तसेच शहराच्या स्फूर्तीवर कसे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते याची आठवण करून दिली. आजच्या प्रसंगाची दखल घेत पंतप्रधानांनी आत्मविश्वास व्यक्त केला आणि सूरत हे जगातील सर्वोत्कृष्ट 10 वाढत्या शहरांपैकी एक बनल्याचे सांगितले. त्यांनी सुरतची उत्कृष्ट खाऊ गल्ली, स्वच्छता आणि कौशल्य विकासावर प्रकाश टाकला. पूर्वी सन सिटी म्हणून ओळखल्या जाणार्या सुरतने येथील लोकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने स्वतःचे डायमंड सिटी, सिल्क सिटी आणि ब्रिज सिटीमध्ये रूपांतर केले आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आज लाखो तरुणांसाठी सुरत हे ड्रीम सिटी म्हणजे स्वप्न पूर्ण करणारे शहर बनले आहे”, असे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुरतच्या वाटचालीचीही त्यांनी नोंद घेतली. सुरतसारख्या आधुनिक शहराला हिरे बाजाराच्या रूपात एवढी भव्य इमारत मिळणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, “मोदींनी दिलेली हमी ही सुरतमधील जनतेच्या दीर्घकालीन परिचयाची आहे.” ते म्हणाले की हिरे बाजार हे सुरतच्या लोकांसाठी मोदींच्या हमीचे उदाहरण आहे. हिरे व्यापारातील लोकांशी केलेली चर्चा, दिल्लीत 2014 मध्ये झालेली जागतिक हिरे परिषद व या परिषदेतील हिरे व्यापारासाठी क्षेत्र अधिसूचित करण्याची घोषणा आणि त्यातून सुरतेत साकारलेला मोठा, एकछत्री हिरे बाजार या प्रवासाच्या स्मृतींना पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. “पारंपरिक हिरे व्यावसायिक, कारागिर आणि व्यापारी या सर्वांसाठी सुरत हिरे बाजार हे वन स्टॉप केंद्र ठरला आहे, ” असे पंतप्रधान म्हणाले. या बाजारात आंतरराष्ट्रीय बँकिंग, सुरक्षित तिजोऱ्या, दागदागिन्यांचा मॉल या सुविधा उपलब्ध होणार असून त्यातून 1.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
सुरतेच्या सक्षमतेबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या अर्थव्यवस्थेने जगात 10 व्या क्रमांकावरून 5 वा क्रमांक गाठल्याचा उल्लेख केला. ही अर्थव्यवस्था मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, ही मोदींची हमी असल्याचे ते म्हणाले. आपल्या सरकारकडे पुढच्या 25 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलिअन डॉलर व त्यानंतर 10 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा आराखडा तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
निर्यातवाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या हिरे व्यापाराची यात मोठी भूमिका असेल. हिरे व्यापारातील मातब्बर व्यक्तींनी सुरतहून देशाची निर्यात वाढवण्याच्या शक्याशक्यता आजमावून पाहाव्यात. भारत सध्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत अग्रणी आहे, सिल्वर कट हिरे आणि प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीसह देशाचा मौल्यवान खडे, दागिन्यांच्या निर्यातीतील वाटा फक्त 3.5% आहे. “मात्र सुरत ने ठरवले तर हा वाटा दोन अंकी संख्येवर जाईल,” असे सांगत सरकारच्या पाठबळाचा त्यांनी पुनरुच्चार केला. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हे क्षेत्र प्राधान्याचे म्हणून घोषित करणे, नक्षीसाठी पेटंटला प्रोत्साहन, निर्यातक्षम उत्पादनांमध्ये विविधता आणणे, चांगल्या तंत्रज्ञानासाठी सहकार्य, प्रयोगशाळेत हिरे उत्पादनाला, ग्रीन डायमंडला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी आदी उपाययोजना करण्याचा मानस असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगाच्या भारताकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा आणि ‘मेक इन इंडिया’ ब्रँडची वाढती लोकप्रियता यांचा हिरे क्षेत्राला फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरतच्या क्षमता वाढवण्यासाठी शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकार भर देत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे आणि हजिरा बंदरासह सुरतमधील बंदरे, खोल पाण्यातील एलएनजी टर्मिनल आणि बहुद्देशीय मालवाहतुकीसाठी बंदर यांनी सुरतला अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रांशी जोडले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जगातल्या मोजक्याच शहरांना अशी आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हिटी असल्याचे त्यांनी सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्प आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे सुरु असलेले काम यामुळे सुरतची उत्तर आणि पूर्व भारताशीही असलेली जोडणी अधिक दृढ होईल, दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गामुळे सुरतमध्ये व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, या सर्वांचा शहरवासियांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सुरतेच्या प्रगतीमुळे गुजरातची प्रगती शक्य होईल व पर्यायाने देशाचीही प्रगती होईल, असे सांगून पंतप्रधानांनी पुढच्या महिन्यात नियोजित ‘वायब्रंट गुजरात शिखर परिषदे’साठी शुभेच्छा दिल्या.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय व पुरषोत्तम रुपाला, केंद्रीय राज्य मंत्री दर्शना जरदोश, खासदार सी. आर. पाटील, सुरत हिरे बाजाराचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी, धर्मानंदन डायमंड लि.चे लालजीभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अधिक माहिती
सुरत हिरे बाजार हे जगातील अत्याधुनिक व सर्वात मोठे हिरे व दागिने व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र असेल. पॉलिश केलेले आणि न केलेले हिरे आणि आभूषणे व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल. इथे आयात व निर्यातीसाठी सीमाशुल्क विभागाचे कार्यालय, किरकोळ व्यवहारांसाठी दागिने मॉल व आंतरराष्ट्रीय बँकिंग, सुरक्षित तिजोऱ्यांची सुविधा यांचा समावेश असेल.
आज सूरत शहर की भव्यता में एक और डायमंड जुड़ गया है।
— PMO India (@PMOIndia) December 17, 2023
और डायमंड भी छोटा-मोटा नहीं है बल्कि ये तो दुनिया में सर्वश्रेष्ठ है। pic.twitter.com/To84moPzeX
The new Terminal Building of Surat Airport has been inaugurated today. With this, Surat Airport has also got the status of international airport. pic.twitter.com/yupor7oe5K
— PMO India (@PMOIndia) December 17, 2023
कामगार हो, कारीगर हो, व्यापारी हो, सबके लिए सूरत Diamond Bourse वन स्टॉप सेंटर है। pic.twitter.com/fDXVmKGwRR
— PMO India (@PMOIndia) December 17, 2023
Today, the global discourse is centered around India.
— PMO India (@PMOIndia) December 17, 2023
'Made in India' has become an influential brand. pic.twitter.com/lp6zslx5Xu