पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. ही संस्था सर्वांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय शिक्षण आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करेल. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये संस्थेचे कामकाज सुरू होईल.
चिकबल्लापूर हे आधुनिक भारताचे शिल्पकार सर एम एम विश्वेश्वरय्या यांचे जन्मस्थान आहे आणि त्यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण करण्याची आणि त्यांच्या संग्रहालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना कृतज्ञता व्यक्त केली. “या पुण्यमय भूमीपुढे मी नतमस्तक आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. चिकबल्लापूरच्या भूमीनेच सर विश्वेश्वरय्या यांना शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी अभिनव संशोधन आणि नवीन अभियांत्रिकी प्रकल्प विकसित करण्यासाठी प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्य साई ग्राम हे सेवेचे अद्भुत मॉडेल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या मिशनचे त्यांनी कौतुक केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आजच्या उद्घाटनामुळे या अभियानाला आणखी बळ मिळाले आहे, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित राष्ट्र होण्याच्या देशाच्या संकल्पाचा आणि इतक्या कमी कालावधीत इतका मोठा संकल्प पूर्ण करण्याबाबत लोकांच्या उत्सुकतेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. "यासाठी फक्त एकच पर्याय आहे, एक मजबूत, दृढ आणि संसाधनपूर्ण पर्याय म्हणजे सबका प्रयास. प्रत्येक देशवासीयांच्या प्रयत्नातून हे नक्कीच साकार होईल ,” असे पंतप्रधान म्हणाले.
‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रवासातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांची भूमिका तसेच संत, आश्रम आणि मठांच्या महान परंपरेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या सामाजिक आणि धार्मिक संस्था श्रद्धा आणि आध्यात्मिक पैलूंसह गरीब, दलित, मागास आणि आदिवासींचे सक्षमीकरण करत आहेत. "तुमच्या संस्थेने केलेले काम 'सबका प्रयास' च्या भावनेला बळ देणारे आहे," असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी श्री सत्य साई विद्यापीठाच्या ‘योगः कर्मसु कौशलम्’ या ब्रीदवाक्याचा अर्थ कृतीतील कौशल्य म्हणजे योग असल्याचे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात सरकारने केलेल्या प्रयत्नातून या ब्रीदवाक्याची सार्थता स्पष्ट होते असे पंतप्रधान म्हणाले. 2014 पूर्वी देशात 380 पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती परंतु आज ही संख्या 650 पेक्षा जास्त झाली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. एकेकाळी विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या देशातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये 40 वैद्यकीय महाविद्यालये विकसित करण्यात आली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
गेल्या 9 वर्षांत देशातील वैद्यकीय जागांची संख्या दुपटीने वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. येत्या 10 वर्षात देशात जेवढे डॉक्टर तयार होणार आहेत त्यांची संख्या स्वातंत्र्यापासून आजवर तयार झालेल्या डॉक्टर्स इतकी आहे, असेही ते म्हणाले. देशात झालेल्या विकासाचा लाभ कर्नाटकलाही मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकात देशातील सुमारे ७० वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि चिकबल्लापूर येथे उद्घाटन करण्यात आलेले वैद्यकीय महाविद्यालय हे दुहेरी इंजिन सरकारच्या प्रयत्नांचे एक उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले. यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून देशात 150 हून अधिक नर्सिंग संस्था विकसित करण्याच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. यामुळे नर्सिंग क्षेत्रात तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी वैद्यकीय शिक्षणातील भाषेच्या आव्हानाचा उल्लेख केला आणि वैद्यकीय शिक्षणात स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी अपुरे प्रयत्न केले गेले होते, अशी व्यथा मांडली. खेड्यापाड्यातील आणि मागासलेल्या भागातील तरुणांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी व्यवसायात स्थान मिळेल हे पाहण्यास हे राजकीय पक्ष इच्छुक नाहीत, अशी टीका त्यांनी केली. “आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. कन्नडसह सर्व भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
देशात प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या राजकारणात गरीबांना केवळ 'व्होट बँक' समजले जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. “आमच्या सरकारने गरिबांची सेवा करणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य मानले आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे,” असे मोदी म्हणाले. जनऔषधी केंद्रे किंवा कमी किमतीतील औषधांचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले की आज देशभरात सुमारे 10,000 जन औषधी केंद्रे आहेत, त्यापैकी 1000 हून अधिक केंद्रे कर्नाटकात आहेत. अशा उपक्रमामुळे गरिबांची औषधांवर खर्च होणाऱ्या हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भूतकाळात गरिबांना उपचारासाठी रुग्णालये परवडत नव्हती याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. सध्याच्या सरकारने गरिबांच्या या चिंतेची दखल घेत गरीब कुटुंबांसाठी रुग्णालयांची दारे खुली करणाऱ्या आयुष्मान भारत योजनेने ही समस्या सोडवली आहे असे त्यांनी सांगितले. कर्नाटकातील लाखो लोकांनाही या योजनेचा लाभ झाल्याचे अधोरेखित केले. "सरकारने गरीबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची हमी दिली आहे." असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी हृदय शस्त्रक्रिया, गुडघा प्रत्यारोपण आणि डायलिसिस इत्यादीसारख्या महागड्या शस्त्रक्रिया प्रक्रियेची उदाहरणे दिली आणि सरकारने महागडे शुल्क कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचे निदर्शनास आणले.
"आम्ही आरोग्याशी संबंधित धोरणांमध्ये माता आणि भगिनींना सर्वोच्च प्राधान्य देत आहोत", अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या मातांचे आरोग्य आणि पोषण सुधारले की संपूर्ण पिढीचे आरोग्य सुधारते हे अधोरेखित करून सरकार यावर विशेष भर देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यासाठी त्यांनी शौचालये बांधणे, मोफत गॅस जोडणी देणे, नळाद्वारे पाणी,प्रत्येक कुटुंबाला मोफत सॅनिटरी पॅड पुरवठा आणि पौष्टिक आहारासाठी थेट बँक खात्यात पैसे जमा अशा योजनांचे उदाहरण दिले. सरकार स्तनाच्या कर्करोगाकडे विशेष लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी गावागावात आरोग्य केंद्रे उघडली जात आहेत आणि अशा आजारांची प्राथमिक टप्प्यातच तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यात 9,000 हून अधिक आरोग्य केंद्रे स्थापन केल्याबद्दल पंतप्रधानांनी बोम्मईजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
एएनएम तसेच आशा कार्यकर्त्यांना बळकट आणि सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांनी कर्नाटक सरकारचे कौतुक केले. कर्नाटकातील 50 हजार एएनएम आणि आशा कार्यकर्त्यांना तसेच सुमारे १ लाख नोंदणीकृत परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्यांना आधुनिक गॅजेट्स देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच दुहेरी इंजिन सरकार त्यांना शक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
दुहेरी इंजिन सरकार आरोग्यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे पूर्ण लक्ष देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटक ही दूध आणि रेशमाची भूमी असल्याचे सांगून पंतप्रधानांनी पशुपालक शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड, जनावरांसाठी 12 हजार कोटीं रुपये खर्चाच्या लसीकरण मोहिमेची माहिती दिली. दुग्धव्यवसाय सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचाही दुहेरी -इंजिन सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांनाही सक्षम केले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. "जेव्हा देश निरोगी असेल आणि 'सबका प्रयास' विकासासाठी समर्पित असेल, तेव्हा आपण विकसित भारताचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य करू शकतो", असे पंतप्रधान म्हणाले.
भाषणाच्या शेवटी पंतप्रधानांनी भगवान साई बाबा आणि संस्थानसोबतच्या त्यांच्या दीर्घ सहवासाचे स्मरण केले. “मी येथे पाहुणा नाही, मी या जागेचा आणि भूमीचा भाग आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमच्याकडे येतो तेव्हा नात्याचे बंध नव्याने निर्माण होतात आणि दृढ संबंधांची इच्छा अंतःकरणात निर्माण होते”, असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ सी श्रीनिवास आणि सद्गुरू श्री मधुसूदन साई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमात पंतप्रधानांनी श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (SMSIMSR) या संस्थेचे उद्घाटन केले. कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी येथील सत्य साई ग्राम, येथे मानव उत्कृष्टतेसाठी श्री सत्य साई विद्यापीठाने या संस्थेची स्थापन केली आहे. ग्रामीण भागात वसलेली आणि वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेचे गैर व्यावसायीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून स्थापित, श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च ही संस्था सर्वांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय शिक्षण आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करेल. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये संस्थेचे कामकाज सुरू होईल.
PM @narendramodi pays tributes to Sir M. Visvesvaraya. pic.twitter.com/0E1p6Ug6T5
— PMO India (@PMOIndia) March 25, 2023
With 'Sabka Prayaas', India is on the path of becoming a developed nation. pic.twitter.com/v4g8Z9EJqk
— PMO India (@PMOIndia) March 25, 2023
Our effort has been on augmenting India's healthcare infrastructure. pic.twitter.com/NGI6IepxkG
— PMO India (@PMOIndia) March 25, 2023
We have given priority to the health of the poor and middle class. pic.twitter.com/Bwl9VerK2a
— PMO India (@PMOIndia) March 25, 2023