भारतीय महसूल सेवेच्या(सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) 74 आणि 75 व्या तुकडीशी तसेच भूतानच्या रॉयल नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
एनएसीआयएन ची भूमिका, देशात आधुनिक व्यवस्था निर्माण करणे ही आहे
“श्रीराम, सुप्रशासनाचे अत्यंत भव्य प्रतीक असून, एनएसीआयएन साठी ते एक मोठे प्रेरणास्थान ठरू शकते”
“आम्ही जीएसटीच्या रूपाने, देशाला एक आधुनिक करव्यवस्था दिली आणि प्राप्तिकर रचना सुलभ केली तसेच चेहराविरहित मूल्यांकन व्यवस्था आणली. या सर्व सुधारणांमुळे आज देशात विक्रमी कर संकलन होत आहे”
“आम्ही लोकांकडून जे काही घेतले, ते त्यांना परत केले असून, हाच सुप्रशासन आणि राम राज्याचा संदेश आहे”
“भ्रष्टाचाराविरोधातील लढाई, भ्रष्ट लोकांविरोधात कारवाईला केंद्र सरकारचे कायमच प्राधान्य राहिले आहे”
“देशातील गरिबांना जर संसाधने पुरवली, तर ते स्वतःच गरीबी निर्मूलन करतील इतके सामर्थ्य त्यांच्याकडे आहे”
“विद्यमान सरकारच्या प्रयत्नांमुळे, गेल्या नऊ वर्षात, सुमारे 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील पालसमुद्रम इथे, राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ प्रतिबंधनाच्या राष्ट्रीय अकादमीच्या नव्या परिसराचे उद्‌घाटन केले. त्यानंतर, त्यांनी, इथे लावलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली.  भारतीय महसूल सेवेच्या(सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) 74 आणि 75 व्या तुकडीशी तसेच भूतानच्या रॉयल नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशीही पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला.

पालसमुद्रम येथे राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ अकादमीचे उद्घाटन केल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले. पालसमुद्रम परिसर, आध्यात्मिकता, राष्ट्र उभारणी आणि सुशासनाशी संबंधित आहे असे सांगत, हा परिसर, भारतीय वारशाचे प्रतिनिधित्व करणारा आहे, असे वैशिष्ट्य पंतप्रधानांनी अधोरेखित केले. श्री सत्य साई बाबा यांचे जन्मस्थान असलेले  पुट्टपर्थी, महान स्वातंत्र्यसैनिक पद्मश्री कल्लूर सुब्बा राव, प्रसिद्ध कठपुतळी कलाकार दलवाई चलपती राव आणि वैभवशाली विजयनगर साम्राज्याचे सुशासन हे या प्रदेशातील प्रेरणा स्रोत असल्याचे त्यांनी नमूद केले. एनएसीआयएनचा नवीन परिसर सुशासनाला नवीन आयाम देईल आणि देशातील व्यापार आणि उद्योगाला चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आज थिरुवल्लुवर दिन असल्याचे नमूद करत, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, महान तामीळ संतांच्या वचनांचा उल्लेख केला. लोकशाहीत लोकांचे कल्याण घडवून आणणारे कर गोळा करण्यात महसूल अधिकाऱ्यांची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमाआधी पंतप्रधानांनी, लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिराला भेट दिली आणि रंगनाथ रामायणातील श्लोकांचे श्रवण केले. यावेळी पंतप्रधानांनी भाविकांसोबत, भजन कीर्तनातही सहभाग घेतला. राम जटायु संवाद या परिसराजवळच झाला असल्याची, श्रद्धा असल्याचे नमूद करत,  पंतप्रधान म्हणाले की, अयोध्या धाम येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्यांचे 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू असून,  या पवित्र काळात मंदिरात आशीर्वाद मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशात सर्वत्र आढळून येत असलेल्या  रामभक्तीमय वातावरणाची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की, श्रीरामाची प्रेरणा भक्तीच्या पलीकडे आहे. ते म्हणाले की, श्रीराम हे सुशासनाचे इतके मोठे प्रतीक असून, एनएसीआयएन साठी देखील ते मोठे प्रेरणास्थान आहेत, असे पंतप्रधान म्हणतात.

महात्मा गांधी यांचे वचन उद्धृत करत, पंतप्रधान म्हणाले की, राम राज्याची कल्पना हीच खऱ्या लोकशाहीची प्रेरणा आहे. महात्मा गांधी यांचे जीवन राम राज्याच्या विचारधारेनुसारच होते, असे सांगत, त्यांनी अशा व्यवस्थेची कल्पना मांडली, ज्यात प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येकाला त्यांचा योग्य आदर मिळेल.

रामराज्याच्या नागरिकांविषयी म्हटले जाते, पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक उद्धृत करत सांगितले, “ राम राज्यवासी तुमचे मस्तक उंच ठेवा आणि न्यायासाठी लढा द्या, प्रत्येकाला समानतेने वागवा,दुर्बलांचे रक्षण करा, धर्म सर्वोच्च स्तरावर राखा, तुम्ही रामराज्यवासी आहात”. राम राज्य या चार स्तंभांवर स्थापन झाले होते असे त्यांनी अधोरेखित केले ज्यामध्ये प्रत्येक जण आपले मस्तक उंचावून आणि सन्मानाने चालू शकेल, प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळेल, उपेक्षितांचे रक्षण होईल आणि धर्माला सर्वोच्च महत्त्व असेल. “ 21 व्या शतकात,  “  प्रशासक या आधुनिक संस्थाच्या नियमांची आणि नियामकांची अंमलबजावणी करत असताना, तुम्ही या चार उद्दिष्टांवर आपले लक्ष केंद्रित करा आणि ते आपल्या मनात ठेवा”असे पंतप्रधान म्हणाले,

पंतप्रधानांनी स्वामी तुलसीदास यांनी वर्णन केलेल्या रामराज्यातील कर प्रणालीचा देखील उल्लेख केला. रामचरित मानसचा दाखला देत पंतप्रधानांनी करआकारणीच्या कल्याणकारी पैलूची बाब अधोरेखित केली आणि जनतेकडून मिळालेल्या कराची प्रत्येक पै न पै समृद्धीला चालना देण्यासाठी लोकांच्या कल्याणाकरिता खर्च झाली पाहिजे, असे सांगितले. यावर अधिक सविस्तर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी गेल्या 10 वर्षातील कर सुधारणांविषयी विवेचन केले. आधीच्या काळातील अनेक, बिगर पारदर्शक कर प्रणालींची त्यांनी आठवण करून दिली. “आम्ही देशाला जीएसटीच्या स्वरुपात आधुनिक प्रणाली दिली आणि प्राप्तिकर सुलभ केला आणि चेहराविरहित मूल्यांकनाची सुरुवात केली.या सर्व सुधारणांचा परिणाम म्हणून विक्रमी कर संकलन होत आहे”, पंतप्रधान म्हणाले. आम्ही जनतेचा पैसा विविध योजनांच्या माध्यमातून परत देत आहोत, असे त्यांनी नमूद केले. प्राप्तिकर सवलतीच्या मर्यादेत 2 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. 2014 नंतर झालेल्या करसुधारणांमुळे नागरिकांच्या सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. करदात्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे कारण त्यांना त्यांच्या कराचा पैसा चांगल्या कारणासाठी खर्च होत असल्याचे पाहून आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले. “ आम्ही लोकांकडून जे काही घेतले, आम्ही ते लोकांना परत दिले आणि हे सुशासन आहे आणि रामराज्याचा हा संदेश आहे”, ते म्हणाले.

 

रामराज्यात साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करण्याकडे विशेष लक्ष पुरवले जात असल्याची बाब देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आधीची सरकारे प्रकल्प प्रलंबित ठेवत, गुंडाळून टाकत आणि दुसरीकडे वळवून मोठ्या प्रमाणात देशाचे नुकसान करत होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांनी प्रभू श्री रामाच्या भरतासोबत झालेल्या संवादात अशा प्रकारच्या प्रवृत्तींपासून सावध राहण्याचा इशारा दिल्याची तुलना करून दाखवली आणि म्हणाले, “ तुम्ही अशी कामे पूर्ण कराल ज्याचा खर्च कमी असेल आणि कोणताही वेळ वाया न घालवता त्यातून जास्त लाभ होईल, अशी माझी खात्री आहे”. गेल्या 10 वर्षात विद्यमान सरकारने प्रकल्पाच्या खर्चाचा विचार केला आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला असे त्यांनी अधोरेखित केले.

पुन्हा एकदा गोस्वामी तुलसीदास यांच्या वचनांचा दाखला देत पंतप्रधानांनी गरिबांना पाठबळ देणारी आणि अपात्र असलेल्यांचे उच्चाटन करणारी एक प्रणाली विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. गेल्या 10 वर्षात कागदपत्रांमधून 10 कोटी बनावट नावे काढून टाकण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आज जे पात्र आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येक पैसा पोहोचत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील लढा आणि भ्रष्टाचारी लोकांवरील कारवाई याला या सरकारचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.

या विश्वासाचे सकारात्मक परिणाम देशात करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये दिसत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. याचा दाखला देताना त्यांनी नीती आयोगाने काल प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालाबद्दल देशाला माहिती दिली, ज्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की  सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 9 वर्षांत सुमारे 25 कोटी लोकांना दारिद्रयातून बाहेर काढण्यात आले आहे.

 

विशेषत: ज्या देशात गरीबी निर्मूलनाचा नारा अनेक दशकांपासून दिला जात आहे तिथे ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरी असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून गरीबांच्या कल्याणासाठी सरकारच्या प्राधान्याचे हे फलित आहे.

या देशातील गरीबांना साधने आणि संपदा उपलब्ध करून दिल्यास गरीबीवर मात करण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. "हे वास्तव साकारताना आम्ही अनुभवत आहोत", असेही त्यांनी सांगितले. सरकारने आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगारावर खर्च करून गरिबांसाठी सुविधा वाढवल्याचं त्यांनी अधोरेखित केले. “गरिबांची क्षमता बळकट करून त्यांना सुविधा पुरवल्यावर ते दारिद्रयमुक्त होऊ लागले” ही 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीची आणखी एक चांगली बातमी असल्याचे त्यांनी नमूद केले. “भारतातील गरिबी कमी होऊ शकते ज्याद्वारे प्रत्येकाला नवीन विश्वास मिळेल आणि देशाचा आत्मविश्वास वाढेल”, अशी टिप्पणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी गरीबी कमी करण्याचे श्रेय नव-मध्यमवर्गाच्या आणि मध्यमवर्गाच्या वाढीला दिले. अर्थव्यवस्थेच्या जगतातील लोक नव-मध्यमवर्गाच्या वाढीची क्षमता आणि आर्थिक उपक्रमांमधील त्यांचे योगदान जाणतात. “अशा परिस्थितीत एनएसीआयएन ने आपली जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडली पाहिजे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रभू रामाच्या जीवनाशी तादात्म्य साधत त्यांच्या 'सबका प्रयास' चे आवाहन अधिक विस्तृतपणे मांडले.रावणाविरुद्धच्या लढ्यात श्रीरामांनी संसाधनांचा सुज्ञपणे केलेला वापर आणि त्यांचे महाशक्तीत रूपांतर केल्याचे त्यांनी स्मरण केले. त्यांनी अधिकाऱ्यांना राष्ट्र उभारणीतील त्यांची भूमिका उमजून देशाचे उत्पन्न, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी, केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

नागरी सेवा क्षमता बांधणीच्या माध्यमातून प्रशासन सुधारण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकारण्याचा दिशेने एक पाऊल म्हणून, आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात पालसमुद्रम येथे नॅशनल अकादमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स (एनएसीआयएन) चे नवीन अत्याधुनिक संकुल उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आणि ती साकार झाली. 500 एकरांमध्ये पसरलेली ही अकादमी भारत सरकारची अप्रत्यक्ष कर आकारणी (सीमाशुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि वस्तू आणि सेवा कर) आणि अंमली पदार्थ नियंत्रण प्रशासनाच्या क्षेत्रात क्षमता निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील जागतिक दर्जाची प्रशिक्षण संस्था भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) तसेच केंद्रीय सहयोगी सेवा, राज्य सरकारे आणि भागीदार राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देईल.

या नवीन संकुलाच्या समावेशासह, एनएसीआयएन हे ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी, ब्लॉकचेन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानावर आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीवर लक्ष केंद्रित करेल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg

Media Coverage

5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister urges the Indian Diaspora to participate in Bharat Ko Janiye Quiz
November 23, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today urged the Indian Diaspora and friends from other countries to participate in Bharat Ko Janiye (Know India) Quiz. He remarked that the quiz deepens the connect between India and its diaspora worldwide and was also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

He posted a message on X:

“Strengthening the bond with our diaspora!

Urge Indian community abroad and friends from other countries  to take part in the #BharatKoJaniye Quiz!

bkjquiz.com

This quiz deepens the connect between India and its diaspora worldwide. It’s also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

The winners will get an opportunity to experience the wonders of #IncredibleIndia.”