पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे.
यानंतर, एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की महर्षी वाल्मिकी यांनी रचलेले रामायण हा ज्ञानाचा मार्ग असून तो आपल्याला श्रीरामाशी जोडतो. आधुनिक भारतातील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला अयोध्या धाम आणि दैवी-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल. पहिल्या टप्प्यात हा विमानतळ दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळू शकेल आणि दुसऱ्या टप्प्यानंतर महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ वार्षिक 60 लाख प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असेल.
या अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळाच्या (एकीकृत) टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असून हा विमानतळ दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल. या एकीकृत (टर्मिनल) इमारतीचा दर्शनी भाग अयोध्येच्या आगामी श्री राम मंदिराच्या वास्तूकलेचे चित्रण दर्शवतो. या एकीकृत (टर्मिनल) इमारतीचा आतील भाग भगवान श्री राम यांचे जीवन चरित्र दर्शविणारी स्थानिक कला, चित्रे आणि भित्तीचित्रे यांनी सजवलेला आहे. अयोध्या विमानतळाच्या एकीकृत (टर्मिनल) इमारतीमध्ये विजेची बचत प्रणाली असलेली छते (इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम), एलईडी प्रकाश योजना, पर्जन्य जल संधारण, कारंजे, लँडस्केपिंग, पाण्यावर प्रक्रिया करणारी सुविधा, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (सीवेज ट्रीटमेंट प्लांट), सौर ऊर्जा यंत्रणा अशा इतर अनेक गृह-5 (GRIHA - 5) मानके वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. या नव्या विमानतळामुळे या प्रदेशातील दळणवळण सुविधेत सुधारणा होईल, ज्यामुळे पर्यटन तसेच व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळून रोजगाराच्या संधीं उपलब्ध होतील.