पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात ठाणे येथे 32,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. शहरी भागातील वाहतूकसुविधा वाढवणे, हे या प्रकल्पांचे विशेष उद्दिष्ट आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा केवळ महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा सन्मान नसून, भारताला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती देणाऱ्या परंपरेला दिलेली मानवंदना आहे. पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील मराठी भाषक समुदायाचे अभिनंदन केले.
नवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करताना पंतप्रधानांनी आज वाशिमला भेट दिल्याचा उल्लेख केला, जिथे त्यांनी देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत निधीचे वाटप केले आणि अनेक विकास प्रकल्प सुरू केले. ठाणे शहरात महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे नवनवीन टप्पे गाठले जात असल्याचे नमूद करून, ते म्हणाले की, आजचा प्रसंग राज्याच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवत आहे. आज 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मुंबई एमएमआर क्षेत्रातील प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली असून, 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. आजच्या विकास प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पांमुळे मुंबई आणि ठाणे शहराला आधुनिक ओळख मिळेल.
मुंबईत आरे ते बीकेसी दरम्यान ऍक्वा लाइन मेट्रो सेवा देखील आजपासून सुरू होत असल्याचे पंतप्रधानांनी घोषित केले. ते पुढे म्हणाले की, मुंबईतील नागरिक या मेट्रो मार्गाची दीर्घ काळ प्रतीक्षा करत होते. पंतप्रधान मोदी यांनी जपान सरकार आणि जॅपनीज इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने (JICA) विशेषत: ऍक्वा मेट्रो लाईनला केलेल्या सहाय्याबद्दल त्यांचे आभार मानले. म्हणूनच, ही मेट्रो लाईन भारत-जपान मैत्रीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना ठाणे शहराबद्दल विशेष स्नेह होता. ते म्हणाले की, ठाणे हे दिवंगत आनंद दिघे यांचेही शहर होते.“ठाण्याने भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, डॉ. आनंदीबाई जोशी दिल्या,” असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आजची विकास कामे या सर्व द्रष्ट्या व्यक्तींची स्वप्ने पूर्ण करत आहेत. आज सुरु झालेल्या विकास कामांसाठी पंतप्रधानांनी ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.
“विकसित भारत हे आज प्रत्येक भारतीयाचे ध्येय आहे”, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. ते म्हणाले की, आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय, संकल्प आणि स्वप्न विकसित भारताला समर्पित आहे.विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबई, ठाणे आदी शहरांना भविष्यासाठी सज्ज करणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. ते पुढे म्हणाले की, सरकारला आपले प्रयत्न दुप्पट करावे लागतील, कारण त्याला विकासाकडे लक्ष देताना मागील सरकारांच्या त्रुटींचे व्यवस्थापनही करणे आवश्यक आहे. आधीच्या सरकारांबद्दल बोलताना ते म्हणाले की, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहतूक लक्षात घेता, या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही उपाय हाती घेतले गेले नाहीत. ते पुढे म्हणाले की, वाढत्या समस्यांमुळे भारताची आर्थिक राजधानी, मुंबई ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. सध्याच्या सरकारने या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून, आज 300 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, किनारी मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन तो 12 मिनिटांवर आला आहे, तर अटल सेतूने उत्तर आणि दक्षिण मुंबईतील अंतर कमी केले आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भूमिगत बोगद्याच्या प्रकल्पानेही गती घेतल्याचे त्यांनी नमूद केले. वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, पूर्व मुक्त मार्ग, ठाणे-बोरिवली बोगदा, ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प यासारख्या शहरातील विविध प्रकल्पांचा उल्लेख करून, पंतप्रधान म्हणाले की, विविध विकास प्रकल्प मुंबईचा चेहरामोहरा बदलत असून, मुंबई आणि आसपासच्या शहरांच्या समस्या कमी झाल्यामुळे या प्रकल्पांचा मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे उद्योगांच्या वाढीबरोबरच रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील, असे ते म्हणाले.
सध्याचे राज्य सरकार महाराष्ट्राचा विकास हेच आपले एकमेव उद्दिष्ट मानत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
त्यांनी मागील सरकारच्या वेळखाऊ धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे मुंबई मेट्रोला 2.5 वर्षे विलंब झाला, आणि त्यामुळे त्याचा खर्च 14,000 कोटी रुपयांनी वाढला. “हा पैसा महाराष्ट्रातील कष्टाळू करदात्यांचा होता,” पंतप्रधान म्हणाले.
मागील सरकारचा कामाचा इतिहास विकासविरोधी असल्याचा पुरावा असल्याचे सांगून पंतप्रधानांनी अटल सेतूच्या विरोधात निदर्शने, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बंद करण्याचा कट आणि राज्यातील दुष्काळी भागातील पाण्याशी संबंधित प्रकल्प रखडवल्याची उदाहरणे दिली. पंतप्रधानांनी भूतकाळातून धडा घेण्याचा आणि तुष्टीकरणाच्या राजकारणात गुंतलेल्यांपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रामाणिक आणि स्थिर धोरणे असलेल्या सरकारच्या गरजेवर भर दिला. सध्याच्या सरकारने केवळ आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत तर सामाजिक पायाभूत सुविधाही मजबूत केल्या आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. “आम्ही महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे आणि विमानतळांच्या विकासात विक्रम स्थापित केले आहेत तसेच 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आपल्याला देशाला अजून खूप पुढे न्यायचे आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सरकारच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
या क्षेत्रात नागरी गतिशीलता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी आज सुमारे 14,120 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो लाइन - 3 च्या बीकेसी ते आरे जेव्हीएलआर विभागाचे उद्घाटन केले. या विभागात 10 स्थानके असून त्यापैकी 9 स्थानके भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाइन - 3 हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर लाईन-3 दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना प्रवासाची सोय उपलब्ध करून देईल.
सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पाची एकूण लांबी 29 किमी असून त्यात 20 उन्नत आणि 2 भूमिगत स्थानके आहेत. हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे.
सुमारे 3,310 कोटी रुपये खर्चाच्या छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते ठाण्यापर्यंत अखंड संपर्क सुविधा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, पंतप्रधानांनी सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्पाच्या टप्पा-1 ची पायाभरणी केली. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचे बांधकाम यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी यासोबतच सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही केली. ठाणे महानगरपालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालये सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे.
Click here to read full text speech
आज हर देशवासी का एक ही लक्ष्य है- विकसित भारत! pic.twitter.com/IBz8AHDLOU
— narendramodi_in (@narendramodi_in) October 5, 2024
काँग्रेस और महाअघाड़ी वाले लोग विकास के काम को ठप्प कर देते हैं। pic.twitter.com/KMVrLY3KLH
— narendramodi_in (@narendramodi_in) October 5, 2024
कांग्रेस, भारत की सबसे बेईमान और भ्रष्ट पार्टी है। pic.twitter.com/iVz1J2qg0l
— narendramodi_in (@narendramodi_in) October 5, 2024
लूट, झूठ और कुशासन का ये पूरा पैकेज कांग्रेस की पहचान है। pic.twitter.com/KAIqRyst2c
— narendramodi_in (@narendramodi_in) October 5, 2024
काँग्रेस को अब अर्बन नक्सल का गैंग चला रहा है। pic.twitter.com/Re36pzwIi4
— narendramodi_in (@narendramodi_in) October 5, 2024