गांधी आश्रम स्मारकाच्या महायोजनेची केली सुरुवात
“सत्य आणि अहिंसा, देशसेवा तसेच वंचितांच्या सेवेलाच देवाची सेवा मानणे ही बापूंची तत्वे साबरमती आश्रमाने जिवंत ठेवली आहेत”
“अमृत महोत्सवाने देशाला अमृत काळात प्रवेश करण्याचा मार्ग तयार केला”
“ज्या देशाला त्याचा वारसा जपता येत नाही तो भविष्य देखील गमावून बसतो. बापूंचा साबरमती आश्रम हा केवळ देशाचा नव्हे तर मानवतेचा वारसा आहे”
“गुजरात राज्याने संपूर्ण देशाला वारशाचे जतन करण्याचा मार्ग दाखवला”
“आज, भारत विकसित होण्याच्या निर्धारासह वाटचाल करत असताना, महात्मा गांधींचे हे पवित्र मंदिर आपणा सर्वांसाठीच एक महान प्रेरणास्थान आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साबरमती आश्रमाला भेट देऊन कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या महायोजनेची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि हृदय कुंजाला भेट दिली. त्या ठिकाणी असलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला आणि रोपट्यांची लागवड केली.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, साबरमती आश्रम हे नेहमीच अतुलनीय उर्जेने सळसळते केंद्र आहे आणि येथे आपल्याला स्वतःमध्ये बापूंची प्रेरणा जाणवते. “साबरमती आश्रमाने सत्य आणि अहिंसा, देशसेवा तसेच वंचितांच्या सेवेलाच देवाची सेवा मानणे ही बापूंची तत्वे जिवंत ठेवली आहेत,” ते पुढे म्हणाले. साबरमतीला स्थलांतरित होण्याआधी गांधीजींनी कोचरब आश्रमात काही काळ वास्तव्य केले होते त्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे आज लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधानांनी या प्रसंगी पूज्य महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आणि आजच्या महत्त्वाच्या तसेच प्रेरणादायी प्रकल्पांबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 

 

आजच्या तारखेला म्हणजेच 12 मार्चला पूज्य बापूंनी दांडी यात्रेची सुरुवात केली आणि भारताच्या स्वातंत्र्य युद्धात ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की, हा ऐतिहासिक दिवस स्वतंत्र भारतातील नव्या युगाच्या प्रारंभाचा साक्षीदार आहे. 12 मार्च रोजीच देशाने साबरमती आश्रमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली ही बाब अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले त्या कार्यक्रमाने आपल्या मातृभूमीसाठी त्याग केलेल्यांचे स्मरण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीतील एकजुटीच्या वातावरणासारखेच वातावरण अमृत महोत्सवाच्या काळात निर्माण झालेले दिसले याची नोंद घेत पंतप्रधान म्हणाले, “अमृत महोत्सवाने देशाला अमृत काळात प्रवेश करण्याचा मार्ग तयार केला.” महात्मा गांधींचे आदर्श आणि श्रद्धा यांचा प्रभाव आणि अमृत महोत्सवाची व्याप्ती यावर त्यांनी अधिक भर दिला. “स्वातंत्र्याचा अमृत काळ या कार्यक्रमात 3 कोटींहून अधिक लोकांनी पंच निर्धारांची शपथ घेतली,” पंतप्रधान म्हणाले. 2 कोटींहून अधिक संख्येने रोपट्यांची लागवड केलेल्या 2 लाखांहून अधिक अमृत वाटिकांचा विकास, जल संवर्धनाच्या दृष्टीने 70,000 हून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती, राष्ट्रीय समर्पणाची अभिव्यक्ती झालेले हर घर तिरंगा अभियान तसेच स्वातंत्र्य सैनिकांना नागरिकांतर्फे आदरांजली वाहण्यासाठीची मेरी माटी मेरा देश मोहीम अशा विविध उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. त्यांनी यावेळी, अमृत काळात पायाभरणी झालेल्या 2 लाखांहून अधिक प्रकल्पांचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की यातून साबरमती आश्रम विकसित भारताच्या उभारणीच्या निश्चयाचे तीर्थस्थळ झाला.

पंतप्रधान म्हणाले, “ज्या देशाला त्याचा वारसा जपता येत नाही तो भविष्य देखील गमावून बसतो.  बापूंचा साबरमती आश्रम हा केवळ देशाचा नव्हे तर मानवतेचा वारसा आहे.” या अनमोल वारशाकडे दीर्घकाळ झालेल्या दुर्लक्षाचे स्मरण करत पंतप्रधानांनी या आश्रमाचे क्षेत्र 120 एकरावरून 5 एकरांपर्यंत संकुचित झाले असून याठिकाणी असलेल्या 63 इमारतींपैकी केवळ 36 इमारती आता शिल्लक आहेत आणि त्यापैकी केवळ 3 इमारतींमध्ये अभ्यागतांना प्रवेश दिला जातो याचा उल्लेख केला. या आश्रमाचे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन करणे ही सर्व 140 कोटी भारतीयांची जबाबदारी आहे यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.

 

आश्रमाच्या मालकीची 55 एकर जागा परत मिळवण्यात आश्रम निवासींनी दिलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, आश्रमातील सर्व इमारती त्यांच्या मूळ स्वरुपात जतन करण्याचा आमचा हेतू आहे.

इच्छाशक्तीचा अभाव, वसाहतवादी मानसिकता आणि तुष्टीकरण यांमुळे अशा स्मारकांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचा दोष पंतप्रधानांनी दिला. यासाठी काशी विश्वनाथ धाम मंदिराचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की लोकांच्या सहकार्यामुळे त्या प्रकल्पातून भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उभारण्यासाठी 12 एकर जागा मोकळी करून मिळाली आणि त्यामुळे काशी विश्वनाथ धाम तीर्थस्थळ पुनर्विकासानंतर तेथे आलेल्या 12 कोटी भाविकांची सोय झाली. त्याच धर्तीवर, अयीध्येत रामजन्मभूमी विस्तार कार्यानंतर, 200 एकर जागा मोकळी करून मिळाली. तेथे देखील गेल्या 50 दिवसांमध्ये 1 कोटी भाविक दर्शनासाठी गेले आणि त्यांना योग्य सुविधा मिळू शकल्या.

पंतप्रधान म्हणाले की, गुजरात राज्याने संपूर्ण देशाला वारशाचे जतन करण्याचा मार्ग दाखवला आहे. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेले सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी नमूद केला.चंपानेर आणि ढोलाविरा, लोथल, गिरनार, पावागड, मोढेरा आणि अंबाजी यांच्यासह अहमदाबाद शहराचा जागतिक वारसा शहर म्हणून झालेला समावेश अशी संवर्धनाची इतर उदाहरणे त्यांनी दिली.

 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित वारसा स्थळांच्या पुनरुज्जीवनासाठी चालवलेल्या विकास अभियानाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी राजपथाचा कर्तव्य पथ म्हणून पुनर्विकास आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उभारणी, अंदमान आणि निकोबार बेटांवर असेलल्या स्वातंत्र्याशी संबंधित स्थळांचा विकास, बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांचा ‘पंच तीर्थ’ स्वरुपात विकास, एकतानगर येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण आणि दांडी परिसराचा कायापालट इत्यादी कार्यांचा उल्लेख केला. साबरमती आश्रमाचा जीर्णोद्धार हे त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भर दिला.

“भावी पिढ्यांना आणि साबरमती आश्रमाला भेट देणाऱ्यांना चरख्याचे सामर्थ्य आणि त्याची क्रांतीला जन्म देण्याची क्षमता यापासून प्रेरणा मिळेल. शतकानुशतकांच्या गुलामगिरीमुळे निराशेने ग्रासलेल्या राष्ट्रात बापूंनी आशा आणि विश्वास जागता ठेवला होता, असे ते म्हणाले. बापूंची ध्येयदृष्टी भारताच्या उज्वल भविष्यासाठी स्पष्ट दिशा दिग्दर्शन करते, असे त्यांनी नमूद केले. सरकार ग्रामीण गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य देत आहे आणि महात्मा गांधींनी दिलेल्या आत्मनिर्भरता आणि स्वदेशीच्या आदर्शांचे पालन करून आत्मनिर्भर भारत अभियान राबवत आहे असे म्हणाले. सेंद्रीय शेतीचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला. गुजरातमधील 9 लाख कृषी कुटुंबांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब केला आहे, त्यामुळे 3 लाख मेट्रिक टन युरियाचा वापर कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. आधुनिक युगात वावरत असताना पूर्वजांच्या आदर्शांचे पालन करण्यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण गरीबांची उपजिविका तसेच आत्मनिर्भर अभियानाला प्राधान्य देण्यासाठी खादीचा वापर वाढवण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी यावेळी गावांच्या सक्षमीकरणाचा संदर्भ देत सांगितले की बापूंची ग्रामस्वराजाची ध्येयदृष्टी जिवंत होत आहे. त्यांनी महिलांच्या वाढत्या भूमिकेचाही उल्लेख केला. “बचतगट असोत, 1 कोटींहून अधिक लखपती दीदी असोत, ड्रोन पायलट बनण्यास तयार असलेल्या महिला असोत, हा बदल सशक्त भारत आणि सर्वसमावेशक भारताचे उदाहरण आहे असे ते म्हणाले.

 

सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. अंतराळ क्षेत्रातील भारताच्या अलीकडच्या कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला. “आज जेव्हा भारत विकासाच्या निर्धाराने पुढे जात आहे, तेव्हा महात्मा गांधींचे हे मंदिर आपल्या सर्वांसाठी एक महान प्रेरणा ठरत आहे. त्यामुळे साबरमती आश्रम आणि कोचरब आश्रमाचा विकास म्हणजे केवळ ऐतिहासिक स्थळांचा विकास नव्हे. त्यामुळे विकसित भारताच्या संकल्पावर आणि प्रेरणेवरचा आमचा विश्वासही दृढ होतो,” असे पंतप्रधान म्हणाले.  बापूंचे आदर्श आणि त्यांच्याशी निगडित प्रेरणादायी स्थाने आपल्याला राष्ट्र उभारणीच्या प्रवासात मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी गुजरात सरकार आणि अहमदाबाद महानगरपालिकेला मार्गदर्शकांसाठी स्पर्धा निर्माण करण्याचे आवाहन केले. कारण अहमदाबाद हे वारसा शहर आहे आणि शाळांनी दररोज किमान 1000 मुलांना साबरमती आश्रमात घेऊन इथल्या प्रेरणादायी महत्त्वाचा परिचय करुन देण्याचे आवाहन केले.  “कोणत्याही अतिरिक्त आर्थिक तरतुदीची गरज न भासता यामुळे ते क्षण पुन्हा जिवंत करता येतील".  भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, नवा दृष्टीकोन दिल्याने देशाच्या विकासाच्या प्रवासाला बळ मिळेल.

यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी यावेळी पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले.  1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी स्थापन केलेला हा पहिला आश्रम आहे. गुजरात विदयापीठाने तो अजूनही स्मारक आणि पर्यटनस्थळ म्हणून जतन केला आहे.  गांधी आश्रम स्मारकाच्या बृहद आराखड्याचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.

 

महात्मा गांधींनी ज्या आदर्शांचा पुरस्कार केला त्यांचे समर्थन आणि जतन करण्याचा, त्यांचे आदर्श दर्शविणारे मार्ग विकसित करण्याचा आणि त्यांना लोकांच्या अधिक जवळ आणण्याचा पंतप्रधानांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. या अंतर्गत, गांधी आश्रम स्मारक प्रकल्प महात्मा गांधींची शिकवण आणि तत्त्वज्ञान सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी पुनरुज्जीवित करण्यास मदत करेल. या बृहद आराखड्या अंतर्गत आश्रमाचे सध्याचे पाच एकर क्षेत्र 55 एकरांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.  सध्या अस्तित्वात असलेल्या 36 इमारतींचा जीर्णोद्धार केला जाईल, त्यापैकी गांधींचे निवासस्थान राहिलेल्या 'हृदय कुंज'सह 20 इमारतींचे संवर्धन केले जाईल, 13 इमारती पुनर्संचयित केल्या जातील आणि 3 पुनर्निर्मित केल्या जातील.

 

बृहद आराखड्यात नवीन इमारती ते गृहप्रशासन सुविधा, अभ्यागत सुविधा जसे की अभिमुखता केंद्र, सूतकताई, हस्तनिर्मित कागद, कापूस विणकाम आणि चामड्याच्या वस्तूंची निर्मिती तसेच सार्वजनिक उपयोगितांवर आधारित कार्यशाळा यांचा समावेश आहे.  या इमारतींमध्ये गांधीजींच्या जीवनातील पैलू तसेच आश्रमाचा वारसा दर्शविण्यासाठी परस्परसंवादी प्रदर्शन आणि उपक्रम असतील.  बृहद आराखड्यात गांधीजींच्या विचारांचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी ग्रंथालय आणि अभिलेखागार इमारत तयार करण्याचीही संकल्पना आहे.  आश्रमाचे ग्रंथालय आणि संग्रहणाचा उपयोग करणाऱ्या विद्वानांसाठी यामुळे सुविधा उपलब्ध होईल.  या प्रकल्पामुळे अभ्यागतांना विविध अपेक्षांसह आणि अनेक भाषांमध्ये मार्गदर्शन करता येणारे एक माहिती केंद्र तयार करणे देखील शक्य होईल, ज्यामुळे त्यांचा अनुभव सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या अधिक उत्साहवर्धक आणि समृद्ध होईल.

हे स्मारक भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्रोत म्हणून काम करेल, गांधीवादी विचारांना चालना देईल आणि विश्वस्त तत्त्वांद्वारे सूचित केलेल्या प्रक्रियेद्वारे गांधीवादी मूल्यांचे सार जिवंत करेल.

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage